महाडमध्ये टेम्पो-ट्रकची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:55 PM2019-04-08T23:55:10+5:302019-04-08T23:55:30+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात : एक ठार, सहा जखमी

Tempo truck collides in Mahad | महाडमध्ये टेम्पो-ट्रकची धडक

महाडमध्ये टेम्पो-ट्रकची धडक

Next

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव हद्दीत रविवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि ट्रकमध्ये धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला, तर दोन्ही वाहनांमधील अन्य सहा जण जखमी झाले. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी मुुंबई येथे हलविण्यात आले आहे.


रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई ते लांजा टेम्पो क्र. एमएच ०९ बीसी ४७०९ आणि ट्रक क्र. जीजे १९ एक्स ३२१८ हे दोन्ही दासगाव हद्दीत हॉटेल निसर्गसमोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत टेम्पो १०० फूट रस्त्यावरून उडाला व रस्त्याकडेला पलटी झाला. यात टेम्पो चालक कैलास गोपाळ बंडगर (३८, रा. नागाव कोल्हापूर) हा जागीच ठार झाला, तर टेम्पोमध्ये प्रवास करणारे अन्य पाच जण विजय इंगळे (४०, रा.खारघर), इक्बाल तडवी, उज्ज्वला तडवी, आलीया तडवी (४), शिवन्न्या तडवी (दीड वर्षे) तसेच ट्रकचालक संजीव भालेराव (३५, रा. सुतार पाडा ठाणे) असे सहा जण जखमी झाले. सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र ट्रकचालक भालेराव आणि टेम्पोमधील इंगळे यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.


अपघात एवढा भयानक होता की, घटना घडल्यानंतर आवाजाने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेत अडक लेल्यांना बाहेर काढले. मात्र ट्रकची समोरील बाजू चेपल्याने ट्रक चालक काही काळ अडकून पडला होता. घटनास्थळी महामार्ग पोलीस, शहर पोलीस तसेच दासगाव ग्रामस्थ पोहचून अडकलेल्या चालकास अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. त्याचबरोबर मृत अवस्थेत अडकून पडलेल्या टेम्पो चालकालाही बाहेर काढण्यास यश आले. अपघातानंतर ट्रक महामार्गाच्या अर्ध्या रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडल्याने जवळपास एक तास वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात असून बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार एस. व्ही. थवई करीत आहेत.

Web Title: Tempo truck collides in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात