Sharad Pawar felicitated on March 11 in Roha, Sunil Tatkare's press conference | शरद पवार यांचा ११ मार्चला रोह्यात सत्कार, सुनील तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

रोहा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येत्या रविवारी ११ मार्च रोजी रोह्याच्या दौºयावर येत आहेत. लोकसभा, राज्यसभा, महाराष्ट्र विधानसभा, विधानपरिषद अशा सर्व सभागृहात महाराष्ट्राचे समर्थ प्रतिनिधित्व केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा भव्य सत्कार रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी रोहा येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आमदार सुनील तटकरे, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील, अनिकेत तटकरे, शहर अध्यक्ष अमित उकडे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, गटनेते महेंद्र दिवेकर, माणगाव नगराध्यक्ष आनंद यादव आदी उपस्थित होते. रोहा शहराजवळील म्हाडा मैदानावर रविवारी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता हा सत्कार सोहळा होणार असून या सोहळ्याला सुमारे तीस ते पस्तीस हजार कार्यकर्ते उपस्थित रहातील. जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, तालुका अध्यक्ष मधुकर पाटील व अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची पूर्वतयारी चालू असल्याचे आमदार सुनील तटकरेंनी यावेळी सांगितले.
रोहा औद्योगिक वसाहतीतील नुकत्याच घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हवा व पाणी प्रदूषण, अपघात, असुरक्षिततेचे वातावरण व रोजगारासंबंधी प्रश्न यावर सभागृहात चर्चा घडवून आणणार असून शासनाला निर्णायक भूमिकेवर घेण्यास भाग पाडणार असल्याचे स्पष्ट केले. रोह्याच्या कार्यक्र माच्या निमित्ताने जिल्ह्यातील ताकदीचे एकत्रीकरण होणार असून २ एप्रिलपासून कागल येथून पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाला प्रारंभ होईल व मे महिन्यात कोकणात सिंधुदुर्ग ते पालघर हल्लाबोल आंदोलन होणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. हल्लाबोल आंदोलनातील प्रश्नांवर शासन निर्णायक भूमिका घेत नाही तोपर्यंत ते चालूच राहील असेही तटकरेंनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र ठेवण्याचा आमचा प्रयत्न असून जिल्ह्यात शेकापबरोबर आमची आधीच आघाडी आहे. राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे तटकरेंनी सांगितले. माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केलेली टीका ही वैयक्तिक व नैराश्येच्या भरात केलेली असून २८८ मतदारसंघांना समोर ठेवून आघाडी होणार असल्याने त्याबाबत त्यांचे नेते योग्य तो निर्णय घेतील अशी अपेक्षा आमदार सुनील तटकरेंनी व्यक्त केली. शरद पवारांच्या दौºयात रायगड लोकसभा वा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होणार का या प्रश्नांवर आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधलेले नाही, योग्य वेळी शरद पवार उमेदवारी जाहीर करतील असे सावध उत्तर तटकरेंनी दिले.


Web Title:  Sharad Pawar felicitated on March 11 in Roha, Sunil Tatkare's press conference
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.