रायगड जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना 'सक्षम'ची मदत; एकूण 8 हजार 46 दिव्यांग मतदार

By निखिल म्हात्रे | Published: March 25, 2024 05:08 PM2024-03-25T17:08:57+5:302024-03-25T17:09:25+5:30

रायगड मतदार संघात एकूण 8 हजार 46 दिव्यांग मतदार आहेत. यापैकी 2 हजार 933 महिला तर 5 हजार 133 पुरुष मतदार आहेत. 

Saksham help to disabled voters in Raigad district | रायगड जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना 'सक्षम'ची मदत; एकूण 8 हजार 46 दिव्यांग मतदार

रायगड जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना 'सक्षम'ची मदत; एकूण 8 हजार 46 दिव्यांग मतदार

अलिबाग - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सुरू केलेल्या 'सक्षम' अॅपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या 'सक्षम' अॅपवर दिव्यांग मतदारांसाठी दिव्यांग म्हणून नोंदणी करण्याची, नवीन मतदार नोंदणीसाठी, मत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करणे, मतदान केंद्र बदलाची व व्हील चेअरची विनंती करता येत असून मतदार यादीत नाव शोधण्याची, मतदान केंद्र जाणून घेणे, तक्रारी नोंदविणे, मतदान अधिकारी शोधणे, बूथ लोकेटर स्थिती तपासणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रायगड मतदार संघात एकूण 8 हजार 46 दिव्यांग मतदार आहेत. यापैकी 2 हजार 933 महिला तर 5 हजार 133 पुरुष मतदार आहेत. 

सक्षम अॅपवर अंधत्व, अल्प दृष्टी, बहिरेपणा, कमी श्रवणशक्ती, शारीरिक व्यंग, मानसिक आजार (मानसिक सामाजिक अपंगत्व), कुष्ठरोग, बौद्धिक अपंगत्व, सेरेब्रल पाल्सी, बौनेत्व, मस्कुलर डिस्ट्रोफी, अॅसिड हल्ल्यातील बळी, भाषण आणि भाषेतील अपंगत्व, विशिष्ट शिकण्याची अक्षमता, ऑटिझम, स्पेक्ट्रम विकार, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि पार्किन्सन रोगासह क्रॉनिक न्यूरोलॉजिकल विकार, हिमोफिलिया, थैलेसेमिया आणि सिकल सेल अॅनिमियासह रक्त विकार आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्ती नोंदणी करू शकतात.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व ठिकाणी मतदान केंद्र तळमजल्यावर असतील. तेथे पिण्याचे पाणी, प्रतिक्षा शेड, वैद्यकीय किट, सुलभ शौचालय, मतदान केंद्रांवर पुरेशी विद्युत रोषणाई, केंद्रांवर रॅम्प आणि व्हीलचेअरची सोय, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्याने प्रवेश सुविधा, स्वतंत्र रांगेची सुविधा, मानक चिन्हे आणि साइन बोर्ड. असतील. मतदान केंद्रावर स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध असणार आहे. अंध आणि अशक्त मतदारांच्या मतांची नोंद करण्यासाठी ईव्हीएम वर ब्रेल लिपीची व मदतनीसाची सुविधा देखील उपलब्ध आहे.

Web Title: Saksham help to disabled voters in Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.