हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 05:06 AM2018-12-28T05:06:24+5:302018-12-28T05:06:39+5:30

जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे. अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी

 Hanuman Koliwada waiting for rehabilitation, only promises to displaced persons in JNPT port | हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

हनुमान कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत, जेएनपीटी बंदरातील विस्थापितांना फक्त आश्वासने

Next

- मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीटी बंदरासाठी विस्थापित करून वसविण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने पोखरले आहे.
अयोग्यरीत्या पुनर्वसन करण्यात आलेल्या हनुमान कोळीवाडा गावाची बंदरासाठी संपादित करण्यात आलेली जमीन परत करावी, अथवा अन्य ठिकाणी पुनश्च पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी मागील ३२ वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. पुनर्वसन करण्याच्या मागणीवर मागील तीन तप नुसत्याच चर्चा, बैठका सुरू आहेत.
घेण्यासाठी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी फेर पुनर्वसनाची मागणी जेएनपीटी, सिडको केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. या फेर पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकार बरोबर पत्रव्यवहार केला आहे. अनेकदा चर्चाही झाल्या आहेत, अनेक बैठकाही पार पडल्या आहेत.
अनेक वर्षांपासून शासनाचे उंबरठेही झिजवून झाले आहेत. त्यानंतर कें द्र सरकारने गावाच्या पुनर्वसनासाठी ५ कोटी ६९ लाख रुपये मंजूरही केलेले आहेत. मात्र, त्यानंतरही हनुमान कोळीवाडा गाव पुनर्वसनापासून वंचित राहिला आहे.
जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा आणि शेवा ही दोन गावे विस्थापित करण्यात आली आहेत. १९८५ साली जेएनपीटी बंदर उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन उरण शहरानजीक असलेल्या बोरी-पाखाडी (भवरा) गावाजवळ करण्यात आले. चिखल आणि वाळवीग्रस्त मातीच्या जागेत भराव करून नव्याने हनुमान कोळीवाडा गाव उभारण्यात आले आहे. पुनर्वसन करताना ग्रामस्थांना आवश्यकतेनुसार जमीनही उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे अपुऱ्या जागेत उभारण्यात आलेल्या घरातच ग्रामस्थ दाटीवाटीने राहत आहेत. हनुमान कोळीवाडा गावात वास्तव्यासाठी आलेल्या १०५ कुटुंबासाठी सव्वासहा हेक्टर जागा पुनर्वसनासाठी आवश्यक होती. त्यासाठी जेएनपीटीने जागा आरक्षितही ठेवली आहे. मात्र, पुनर्वसन करताना फक्त दोन हेक्टर जागेतच पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन करण्यात आलेल्या १०५ घरांच्या वस्तीच्या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले आहे.
वाळवीमुळे ग्रामस्थांना घरात वास्तव्य करणेही कठीण होऊन बसले आहे. गावातील अनेक कुटुंब गाव सोडून गेली आहेत. काही गावाबाहेर भाड्याने राहत आहेत, तर घरभाडे परवडत नसल्याने आणि मासेमारीच उपजीविकेचे साधन बनलेली उर्वरित अनेक कुटुंबे वाळवीग्रस्त घरातच जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत.

अनेक वर्षांपासून हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनासाठी आवश्यक जागा गावाशेजारीच उपलब्ध आहे. मात्र, पुनर्वसनाच्या आड स्थानिक राजकारण येत आहे. काही स्थानिक राजकीय नेतेच जेएनपीटी, सिडको आणि राज्य सरकारमध्ये दलालीचे काम करीत आहेत.
- गौरव कोळी,
सरपंच, हनुमान कोळीवाडा

हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाच्या कामावर खर्च कुणी करावा, यावरच जेएनपीटी, सिडको, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आहे. पुनर्वसनासाठी १७ हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे, अशी जागा जेएनपीटी परिसरात उपलब्ध नाही. गावाशेजारी आवश्यक जागा उपलब्ध असतानाही मागील ३२ वर्षांपासून पुनर्वसनापासून केंद्र व राज्य सरकारने वंचित ठेवले आहे.
- नरेश कोळी, अध्यक्ष, ग्रामविकास मंडळ

गावाच्या पुनर्वसनासाठी जेएनपीटीकडे जागा उपलब्ध आहे. मात्र, जागेचा निर्णय घेण्यास जेएनपीटी चालढकलपणा करीत आहे. जेएनपीटीमुळेच पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला आहे.
- जयवंत कोळी, माजी सरपंच, हनुमान कोळीवाडा

Web Title:  Hanuman Koliwada waiting for rehabilitation, only promises to displaced persons in JNPT port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड