ई-रिक्षा देत नसल्याने माथेरानमध्ये हातरिक्षा सेवा बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 02:08 PM2024-03-09T14:08:39+5:302024-03-09T14:08:54+5:30

यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Hand-rickshaw services stopped in Matheran as e-rickshaws are not available | ई-रिक्षा देत नसल्याने माथेरानमध्ये हातरिक्षा सेवा बंद 

ई-रिक्षा देत नसल्याने माथेरानमध्ये हातरिक्षा सेवा बंद 

माथेरान : न्यायालयाचे आदेश असतानाही वारंवार मागणी करूनही माथेरानमध्ये सुरू असलेल्या ई-रिक्षांची सेवा हातरिक्षा चालकांना चालवण्यास दिली जात नाही. त्यामुळे हातरिक्षा चालक आक्रमक झाले असून, त्यांनी शुक्रवारपासून (दि. ८) हात रिक्षांची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे पूर्वीपासून हातरिक्षा व घोड्यांद्वारे वाहतूक केली जात आहे. येथील हातरिक्षा चालकांनी या अमानवीय प्रथेतून सुटका करून माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करावी व ती हातरिक्षा चालकांना चालवण्यास द्यावी यासाठी लढा दिला आहे. त्यानुसार न्यायालयानेही ई-रिक्षा सुरू करीत हात रिक्षा चालकांना द्याव्यात, असे आदेश दिले आहेत. मात्र, ई-रिक्षांची सेवा ही अजूनही प्रायोगिक तत्त्वावर चालवत ती नगरपालिकेच्या माध्यमातून ठेकेदाराकडून सुरू आहे. त्यामुळे  रिक्षाचालकांत संताप आहे. त्यांनी यासाठी वारंवार ई-रिक्षांची संख्या वाढवत या रिक्षा आम्हाला चालवायला द्या, अशी मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी संनियंत्रण समितीला आदेश दिले आहेत की, या ई-रिक्षा हातरिक्षा चालकांना द्याव्यात. फक्त या ई-रिक्षांची मार्गिका कशी असावी, याबाबत समितीने लक्ष केंद्रित करावे. न्यायालयाच्या आदेशात असे कुठेही नमूद केलेले नाही की, या ई-रिक्षा ठेकेदाराला द्याव्यात; परंतु ही समिती जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देत आहे. ही निष्क्रिय समिती बरखास्त करावी.
- रूपेश गायकवाड, हात रिक्षा चालक

९४ हातरिक्षा परवाने
सद्य:स्थितीत माथेरानमध्ये एकूण ९४ हातरिक्षांचे परवाने असून, ते सेवा देत आहेत. या सर्व परवानाधारकांना ई-रिक्षांचा परवाना द्यावा, अशी त्यांची मागणी असून, तसे त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे. मात्र, ई-रिक्षासेवा त्यांना देण्यास टाळाटाळ होत आहे.

राज्य सरकारने मागणी केल्याप्रमाणे तीन महिन्यांचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला व तसा अहवाल सरकारने न्यायालयाला सादर केला आहे. आणखी एक वर्ष ठेकेदारच चालविणार असल्याने हात रिक्षा चालकांची उपासमार होणार आहे.
- शकील पटेल, अध्यक्ष, हात रिक्षा संघटना, माथेरान

Web Title: Hand-rickshaw services stopped in Matheran as e-rickshaws are not available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.