'सण, उत्सवाचा उपयोग राजकीय कारणांसाठी केल्यास कारवाई'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:44 PM2019-03-14T23:44:41+5:302019-03-14T23:45:02+5:30

विजय सूर्यवंशी यांचा पत्रकार परिषदेत इशारा

'Festive, Festive Use In Action For Political Points' | 'सण, उत्सवाचा उपयोग राजकीय कारणांसाठी केल्यास कारवाई'

'सण, उत्सवाचा उपयोग राजकीय कारणांसाठी केल्यास कारवाई'

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड लोकसभा मतदार संघात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाली असून रायगड जिल्ह्याच्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी असणाऱ्या चेक पोस्ट्सवर तपासणी प्रभावी करण्यात आली आहे. विशेषत: मद्याची वाहतूक, मोठ्या प्रमाणावर होणारी संभाव्य रोकड ने-आण होते का यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यंत्रणेला देखील अवैध दारूचे अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेऊन पोलीस व इतर यंत्रणांना डॉ.सूर्यवंशी यांनी निर्देश दिले. आगामी काळात रायगड लोकसभा मतदार संघात साजऱ्या होणाºया महत्त्वाच्या धार्मिक व सामाजिक सण व उत्सवांत उमेदवार वा राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी होवू शकतात, मात्र या सण-उत्सवांचा वापर करून कोणीही राजकीय स्वरूपाची भाषणे करू नये. याबाबतीत निवडणूक यंत्रणा विशेष लक्ष ठेवून असणार आहे. विशेषत: शिमगोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी, चवदार तळे येथील कार्यक्र म यामध्ये राजकीय नेते सहभागी होऊ शकतात मात्र त्यांना त्या उत्सवांच्या अनुषंगानेच भाषणे करता येणार नाहीत. असे प्रसंग आढळल्यास त्याबाबत सत्वर कडक कारवाई करण्याचा इशारा डॉ.सूर्यवंशी यांनी दिला आहे.

निवडणूक काळात मद्य आणि पैसे मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने दिले जातात, हे प्रकार रोखण्यात येतील असे स्पष्ट करून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, प्रसंगी चेकपोस्टवर वाहने तपासण्यात येतील. एवढेच नव्हे तर नियोजित वेळेपूर्वी व वेळेनंतर सुरु असणारी मद्याची दुकाने, मागच्या दराने होणारी मद्य विक्र ी, अचानक वाढलेले मद्याचे उत्पादन, बारमध्ये दारू विक्रीत अचानक झालेली वाढ या गोष्टी देखील काटेकोर तपासून, त्याबाबत समर्पक खुलासा प्राप्त झाला नाही तर सर्व संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते.

२८ विशेष समित्या आणि सतर्क भरारी पथके
निवडणुकीसाठी २८ विविध समित्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करुन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या समित्या व विविध पथक प्रमुख अधिकाºयांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर पथके, भरारी पथके, व्हिडीओ पथके आणि निवडणूक खर्चविषयक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदार याद्या मतदानापूर्वी दहा दिवस अगोदरपर्यंत अद्ययावत होणार आहेत.
सभा, रॅली, पदयात्रा, लाउड स्पीकर आदींच्या परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ सुविधा सुरू केली असून, निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सुविधा’ नावाच्या अ‍ॅपवरून आॅनलाइन पद्धतीने परवानग्या दिल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या ‘सि-व्हिजील’ अ‍ॅपद्वारे मतदार अथवा नागरिकांकडून निवडणूक आचारसंहिता काळात येणाºया तक्रारींचे निराकरण तातडीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी सुविधा
निवडणूक विषयक सर्व अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ४ हजार दिव्यांग व्यक्ती ज्या व्यवस्थित चालू शकत नाही, त्यांच्याकरिता देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदान केंद्रे अंधारलेली नसावीत याची काळजीही घेण्यात येत आहे. सोशल मीडियावरील सर्व मजकुरावर २४ तास लक्ष ठेवण्याकरिता एक एजन्सी तैनात करण्यात आली असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.

४१ गुन्हेगारांना केली अटक
रायगडच्या समुद्र किनारी रायगड पोलिसांच्या १३ तपासणी चौक्या असून पुलवामा हल्ल्यानंतर त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहेच, त्या शिवाय विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या ५३६ गुन्हेगारांपैकी आतापर्यंत ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. ३२ गुन्हेगार फरारी असून त्यावरही कारवाई करण्यात येत असल्याचे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी १० गंभीर गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत. कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नाही तरी देखील पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार आहे. पोलीस कर्मचाºयांना मोबाइलच्या माध्यमातून निवडणुकी दरम्यानच्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे पारसकर यांनी सांगितले.

Web Title: 'Festive, Festive Use In Action For Political Points'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.