कर्जतमध्ये १२२ कुपोषित बालके; जिल्हा प्रशासन सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:10 AM2019-05-12T00:10:51+5:302019-05-12T00:11:08+5:30

कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पाअंतर्गत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कर्जत तालुक्यासाठी देण्याची मागणी दिशा केंद्र या संस्थेने केली आहे.

 122 malnourished children in Karjat; District Administration Alert | कर्जतमध्ये १२२ कुपोषित बालके; जिल्हा प्रशासन सतर्क

कर्जतमध्ये १२२ कुपोषित बालके; जिल्हा प्रशासन सतर्क

Next

- कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील कुपोषणाने शंभरी पार केली असून कुपोषण रोखण्याचे मोठे आव्हान रायगड जिल्हा प्रशासनासमोर आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला बालकल्याण समिती सभापती यांनी कर्जत तालुक्याला भेट देऊन कुपोषित बालकांची पाहणी केली. दरम्यान, कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन प्रकल्पाअंतर्गत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर कर्जत तालुक्यासाठी देण्याची मागणी दिशा केंद्र या संस्थेने केली आहे.
मागील महिन्यात कम्युनिटी अ‍ॅक्शन फॉर न्यूट्रिशन या प्रकल्पांतर्गत कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात जाऊन अंगणवाडीतील बालकांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कुपोषित मुलांची संख्या वाढल्याचे समोर आले. याबाबतची माहिती दिशा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना देण्यात आली.
कर्जत तालुक्यात कुपोषणाने शंभरी ओलांडल्याचे उघड होताच रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या सभापती उमा मुंढे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड आणि कर्जत तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह टेंबरे भागात जाऊन कुपोषित बालकांची पाहणी केली होती. यावेळी मुंढे यांनी अंगणवाडी सेविकांची झाडाझडती
घेतली.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवरुषी यांनीही ग्रामीण आणि आदिवासी भागात जाऊन कुपोषित बालकांची पाहणी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र गाठले. त्यावेळी अंगणवाडीतील बालकांची वजने घेतली, उंची मोजली आणि अशा कुपोषित बालकांना अतितीव्र कुपोषित आणि तीव्र कुपोषित गटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून कुपोषित बालकांची तपासणी करणाऱ्या दिशा केंद्र संस्थेचा अहवालही शासनाने तपासला. त्यात अंगणवाडीमध्ये एकात्मिक बालविकास कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षक यांच्या भेटी दर महिन्याला होत नाहीत, आरोग्य तपासणी देखील वेळेवर होत नाही, असे अहवालात नमूद केले आहे. या सर्व तक्रारी आणि समस्यांबाबत देवरुषी यांनी कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
एप्रिल महिन्यात कुपोषणात मोठी वाढ झाल्याने सतर्क राहण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.

७० टक्के बालके पोषक आहारास वंचित
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कडाव येथील अंगणवाडी केंद्रावर दिलेल्या भेटीत जवळपास ७० टक्के बालके अंगणवाडीत येतच नसल्याचे दिसून आले, तर जांभूळवाडीतील अंगणवाडी केंद्रात कोणीही बालके येत नसल्याचे पोषक आहारापासून वंचित असल्याचे आढळले.

एप्रिल २०१९ मध्ये कर्जत तालुक्यात २४ अतितीव्र कुपोषित आणि ९८ तीव्र कुपोषित बालके असल्याचे समोर आले आहे. उन्हाळा असल्याने एकात्मिक बालविकास विभागाने आपल्या भागात सतर्क राहून कुपोषित बालकांकडे लक्ष द्यावे.
- प्रकाश देवरुषी,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
रायगड जिल्हा परिषद

कर्जत तालुक्यातील वाढते कुपोषण ही नेहमीची समस्या आहे. रायगड जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कर्जत तालुक्यासाठी एनआरसी सुरू करावी आणि कर्जत येथे कायमस्वरूपी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर यांची नेमणूक करावी.
- अशोक जंगले,
सदस्य दिशा केंद्र

Web Title:  122 malnourished children in Karjat; District Administration Alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड