‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:32 PM2019-11-29T12:32:39+5:302019-11-29T12:33:12+5:30

‘गीतरामायण’ ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली सर्वोत्तम कलाकृती आहे..

Why not given Dnyanpeeth award to 'Geetramayana'? | ‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का नाही ?

‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का नाही ?

Next
ठळक मुद्दे ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित मधु पोतदार लिखित ‘गदिमान’ या पुस्तक प्रकाशन

पुणे : ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्य आणि माणसाला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. गदिमा हे गीतकारच नव्हते तर, उत्तम कवीही होते. मराठी भाषेवर गदिमांचे अनंत उपकार आहेत. ‘गीतरामायण’ ही मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली सर्वोत्तम कलाकृती आहे, असे असताना ‘गीतरामायणा’ला ज्ञानपीठ का मिळू नये? असा प्रश्न माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी उपस्थित केला. 
मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने गीतरामायणाचे शिल्पकार ग. दि. माडगूळकर यांच्या जीवनावर आधारित मधु पोतदार लिखित ^‘गदिमान’ या पुस्तकाचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विलास पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शिरीष चिटणीस, मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे प्रवीण वाळिंबे आणि प्रतिष्ठानच्या सचिव करुणा पाटील या वेळी उपस्थित होते. मधू पोतदार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.
देशमुख म्हणाले, मराठी भाषा किती अर्थवाही आणि किती सुंदर आहे, हे गदिमांच्या लिखाणातून दिसते. त्यांनी मातृभाषेत गीत लेखन रुजविले. गदिमांना इतर भाषेत का यश मिळाले नाही, हे गौण आहे़ त्यांच्या प्रतिभेला तोड नाही. शांता शेळके, पी. सावळाराम, जगदीश खेबूडकर आणि गदिमा ही मराठीतील उत्तम गीतकारांची चौकडी होती. गदिमांची  गीते मनात रूंजी घालतात. मात्र, त्यांच्या प्रतिभेवर कमी लेखन झाले आहे. त्यांच्यावर समग्र चिकित्सा झाली पाहिजे. त्याचा मोठेपणा आपण लोकांसमोर आणायला हवा. त्यांच्या लिखाणाचा समग्र अभ्यास व्हायला हवा. प्रसिद्ध लेखक वि. स़ खांडेकर यांच्या ‘ययाति’ला ज्ञानपीठ पुरस्कार मिळतो, मग गदिमांच्या ‘गीतरामायण’ला का मिळू नये? 
विलास पाटील म्हणाले, गदिमा यांनी चित्रपट क्षेत्र समृद्ध केले. त्यांची कविता प्रत्येकाला हवीहवीशी वाटायची. गीतरामायण हे वैभव त्यांनी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला नाही, हे नवलच आहे. यासारखी खंत नाही. गदिमा हे मराठीतील एक चमत्कार आहेत. वास्तवता मराठीत आणण्याचे काम त्यांनी केले़
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण वाळिंबे यांनी केले तर धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
............
पावसात भिजवत शिकवली कविता
पुस्तकामागची भूमिका मधू पोतदार यांनी विशद केली. ते म्हणाले, १९५६ मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये  सहाव्या इयत्तेत शिकत होतो. अत्रे शिक्षकांनी गदिमांची ‘मृग’ नावाची कविता शिकवायला घेतली. वर्गाच्या कोंडवड्यात न शिकविता त्यांनी आम्हाला पावसात भिजवत कविता शिकवली. 
.......
४ती गदिमांशी झालेली पहिली ओळख. शाळेत भाषा आणि साहित्याचे संस्कार झाले. त्यानंतर त्यांचा चैत्रबन आणि जोगीया काव्यसंग्रह वाचनात आला. त्यांचा प्रभाव माझ्यावर आहे. माझ्या चित्रपट अभ्यासाचे मूळ गदिमांची गाणी आहेत. माडगूळकर अफाट प्रतिभेचा माणूस होता. गदिमा हे हुकूमाचा एक्का असलेले गीतकार होते.
.......
५०च्या दशकातील ते जादूई गीतकारांपैकी एक असल्याने ते चित्रपट क्षेत्रात प्रत्येकाला हवेहवेसे वाटायचे. आता अभिरुची बदलली आहे. गीत लिहिण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. मात्र, गीतकार म्हणून गदिमा यांनी चित्रपटसृष्टीला जे दिले ते अमूल्य आहे.

Web Title: Why not given Dnyanpeeth award to 'Geetramayana'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.