उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत, ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने ज्ञानसाधनेतून साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 03:47 AM2018-01-03T03:47:02+5:302018-01-03T03:47:13+5:30

सनातन म्हणजे जी पूर्वापार चालत आली आहे ती संस्कृती. तीमध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. अगदी हिंदू धर्माचाही नाही. मात्र, याची फारशी माहिती नसल्याने रूढी-परंपरांच्या नावाखाली मूठभर लोकांमुळे वाट्टेल त्या गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जात असून, धर्माधर्मांत देश विभागला गेला आहे.

Upanishads of Chapters in Raipur, 82-year-old retired Engineer has started an ambitious project | उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत, ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने ज्ञानसाधनेतून साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प

उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण मराठीत, ८२ वर्षीय निवृत्त अभियंत्याने ज्ञानसाधनेतून साकारला महत्त्वाकांक्षी प्रकल्प

Next

पुणे - सनातन म्हणजे जी पूर्वापार चालत आली आहे ती संस्कृती. तीमध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही. अगदी हिंदू धर्माचाही नाही. मात्र, याची फारशी माहिती नसल्याने रूढी-परंपरांच्या नावाखाली मूठभर लोकांमुळे वाट्टेल त्या गोष्टींचे समाजात स्तोम माजवले जात असून, धर्माधर्मांत देश विभागला गेला आहे. गीता असो किंवा उपनिषदे सगळीकडे मानवधर्माचीच शिकवण देण्यात आली आहे. याकरिताच ज्ञानेश्वरी, गीता किंवा उपनिषदांमध्ये नक्की काय सांगितले आहे, हे पोहोचविण्याचा विडा ८२ वर्षांच्या शिवराम श्यामराव ऊर्फ शि. शा. कुलकर्णी यांनी उचलला असून, गेल्या १० वर्षांपासूनच्या ज्ञानसाधनेतून त्यांनी उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण तसेच गीता, ज्ञानेश्वरीतील सद्गुरू स्तवन, अष्टावक्रसंहिता आणि पतंजलींच्या योगसूत्राचा अनुवाद त्यांनी मराठीमध्ये अत्यंत सोप्या शब्दांत केला आहे. मूळचे सांगलीचे असलेले कुलकर्णी पाटबंधारे विभागात अभियंता होते. निवृत्तीनंतर त्यांनी धर्म-अभ्यासाला वाहून घेतले. कुलकर्णी यांचे वय आता ८२ असून, गेल्या १० वर्षांत केलेल्या कठोर अभ्यास आणि संशोधनातून त्यांनी धर्मवाङ्मयाचा सोप्या शब्दांत आणि चाल लावता येईल, अशा वृत्तामध्ये अनुवाद केला आहे. या प्रकल्पाविषयी ‘लोकमत’ प्रतिनिधीने यांच्याशी संवाद साधला.
कुलकर्णी म्हणाले, ‘‘लहानपणापासून मला गीतेचे अध्याय तोंडपाठ होते; मात्र अर्थस्पष्टता नव्हती. गीतेचा अर्थ कळावा, याची एक जिज्ञासा निर्माण झाली. नोकरी सुरू असताना अभ्यास सुरू होताच; पण निवृत्तीनंतर या अभ्यासाला वाहून घेतले. गीता हे उपनिषदांचे सार असल्यामुळे उपनिषदांमध्ये नेमके काय आहे, याबाबत कुतूहल वाढले. त्यातून पुढे उपनिषदांचा अभ्यास सुरू केला. उपनिषदांच्या रसग्रहणाचे तीन खंड प्रसिद्ध केले असून, ब्रह्मसूत्राचा अभ्यास सुरू आहे. उपनिषदांच्या रसग्रहण खंड १ मध्ये ईशावास्य, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, माण्डुक्य, तैत्तिरेय, ऐतरेय, श्वेताश्वतर या उपनिषदांचे श्लोकबद्ध रसग्रहण आहे. खंड २ मध्ये छान्दोग्योपनिषद आहे. खंड ३ मध्ये बृहदारण्यकोपनिषदाचे रसग्रहण करण्यात आले आहे. पुस्तकाच्या डाव्या बाजूला उपनिषदे आणि उजव्या बाजूच्या पानावर रसग्रहण असे स्वरूप आहे. गीता, ज्ञानेश्वरी, अष्टावक्रसंहिता आणि पतंजलींचे योगसूत्र यांचा अनुवाद करण्यात आला आहे. हे मराठीतील रसग्रहण शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये शब्दबद्ध करण्यात आले आहे.

धर्माचे ज्ञान रूढीतून पुढे जाते. त्यामध्ये अभ्यास नसतो. धर्माचा अभ्यास करून काही लिहायचे असेल, तर प्रकाशक मिळत नाहीत. वाचक ही पुस्तके खरेदी करत नाहीत. माझा अभ्यास केवळ माझ्यापुरता राहू नये म्हणून मी स्वखर्चाने हे खंड प्रसिद्ध केले आहेत. ज्ञानाची नोंद झाल्याने अभ्यासकांना निश्चित उपयोग होईल. हे ज्ञान पहिल्यांदाच मराठीत आणल्याचा आनंद आहे. - शि. शा. कुलकर्णी
 

Web Title: Upanishads of Chapters in Raipur, 82-year-old retired Engineer has started an ambitious project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी