पालिकेच्या इमारतीतच अनधिकृत बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:27 AM2018-02-05T00:27:32+5:302018-02-05T00:27:40+5:30

महापालिकेच्या मालकीच्या मुख्य इमारतीपासून शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालये, सांस्कृतिक भवने, हॉस्पिटलसह अन्य अनेक इमारतींमध्येच अनधिकृत बांधकामे करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडूनच स्पष्ट करण्यात आले.

Unauthorized constructions in the buildings of the Municipal Corporation | पालिकेच्या इमारतीतच अनधिकृत बांधकामे

पालिकेच्या इमारतीतच अनधिकृत बांधकामे

Next

पुणे : महापालिकेच्या मालकीच्या मुख्य इमारतीपासून शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालये, सांस्कृतिक भवने, हॉस्पिटलसह अन्य अनेक इमारतींमध्येच अनधिकृत बांधकामे करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडूनच स्पष्ट करण्यात आले. यामध्ये बांधकामाचे व अग्निशमन विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अनेक इमारतींमध्ये बेकायदेशीर अंतर्गत फेरबदलदेखील करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेच्या बांधकाम नियमावलीनुसार शहरामध्ये कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने परवानगी देण्यात येते. ही बांधकाम परवानगी देताना भविष्यात एखादी आपत्तीची परिस्थिती उद्भवल्यास मदतीसाठी यंत्रणेला पोहोचता यावे यासाठी साईट मार्जिन, फ्रंट मार्जिन सोडण्याचे बांधनकारक करण्यात येते. परवानगी दिली त्यानुसारच बांधकाम केल्यास पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. तसेच बांधकाम पूर्ण झाल्यास इमारतीमध्ये काही बदल करण्यासाठीदेखील पुन्हा बांधकाम विभागाची व अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागते. महापालिकेची परवनागी न घेता कोणी बांधकाम केल्यास अथवा अतंर्गत, बाह्य फेरबदल केल्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने अशा बांधकामांवर कारवाई केली जाते.
मुंबई येथे हॉटेलला आग लागून झालेल्या दुर्घटनेत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने गेल्या दीड महिन्यात शहरात अनधिकृत हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करत हजारो चौ. फुटांची बांधकामे पाडून टाकली आहेत. याशिवाय शहरामध्ये इतर अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाच्या वतीने नियमित कारवाई करण्यात येते. शहराच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्यानुसार ज्यांना अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याचे अधिकार दिले तेच अनधिकृत बांधकाम करू लागले तर त्याच्यावर कोण कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
>प्लायवुडचे केबिन : अन्य इमारतीतही फेरबदल
महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये पहिला मजला, दुसरा मजला येथे पॅसेजमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे प्लायवूड ठोकून केबिन करण्यात आली आहेत. इतरही अनेक बेकायदेशीर फेरबदल करण्यात आले आहेत. यासाठी अग्निशामक विभागाचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. परंतु आपल्याला कोण विचारणार, या आविर्भावात अशा स्वरूपाचे बेकायदेशीर फेरबदल केले आहेत. मुख्य इमारतीबरोबरच शहरातील महापालिकेच्या मालकीच्या अन्य इमारतींमध्येदेखील अशा स्वरूपाचे बदल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसचे फ्रंट मार्जिन, साईड मार्जिनच्या नियमाचेदेखील उल्लघंन झाले आहेत. परंतु याबाबत महापालिकेच्या बांधकाम आणि भवन विभागाची माहिती उपलब्ध नसून, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
>सध्या महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यामुळे मुख्य इमारतीमध्ये जागेच्या कमतरतेमुळे तात्पुरत्या स्वरूपाचे प्लायवूडचे केबिन तयार करण्यात आली आहे. नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर ही प्लायवूडची केबिन काढून टाकण्यात येणार आहे. तर शहरातील अन्य इमारतींमध्ये बांधकामांच्या नियमाचे उल्लघंन झाले आहे का, पार्किंगमध्ये बांधकाम केले आहे का, साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन सोडले आहे किंवा कसे याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.
- शिवाजी लंके,
कार्यकारी अभियंता, भवन विभाग
>पुणे महापालिकेच्या मालकीच्या मुख्य इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्लायवूड पार्टिशन उभारून जागेचा वापर करण्यात आला आहे. परंतु यासाठी अग्निशमन विभागाकडून कोणत्याही स्वरूपाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ देण्यात आलेले नाही. अशा स्वरूपाचे फेरबदल करणे बेकायदेशीरच आहे.
- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी

Web Title: Unauthorized constructions in the buildings of the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे