विद्यापीठ चौकातील सगळेच प्रयोग फसल्याने वाहतूक कोंडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 09:58 PM2018-05-09T21:58:25+5:302018-05-09T21:59:38+5:30

विद्यापीठ चौकामध्ये वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. त्यामुळे या चौकातून रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

traffic problem always because all Experiment failed | विद्यापीठ चौकातील सगळेच प्रयोग फसल्याने वाहतूक कोंडी कायम

विद्यापीठ चौकातील सगळेच प्रयोग फसल्याने वाहतूक कोंडी कायम

Next
ठळक मुद्देपुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उड्डाणपूलाची रचना चुकल्याची कबुलीविद्यापीठ चौकात असलेले मुख्य प्रवेशव्दार गणेशखिंड रस्त्यावरील कस्तुरबा मार्केट येथे हलविण्यात येणार

पुणे : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचा मानल्या गेलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. मात्र ते सगळेच प्रयोग फसल्याने या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उग्र बनत चाललेला आहे. उड्डाण  
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी या चौकात मेट्रोसह तीनमजली उड्डाणपूल बांधण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तो लवकरात लवकर प्रत्यक्षात यावा याची प्रतिक्षा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
विद्यापीठ चौकामध्ये शिवाजी नगर, पाषाण, बाणेर, औंध, चतु:श्रृंगी मंदिर, विद्यापीठ आदी अनेक ठिकाणचे रस्ते एकत्र येऊन मिळतात. त्यामुळे या चौकात वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २००६ मध्ये या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आला. मात्र या पुलाच्या उद्घाटनाच्या दिवशीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उड्डाणपूलाची रचना चुकल्याची कबुली दिली होती. 
उड्डाणपूलाच्या माध्यमातून शिवाजीनगर कडून येणारी वाहने थेट पाषाण, बाणेर, औंधला जाण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र पाषाण, बाणेर, औंधकडून येणाऱ्या वाहनांना शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पूलावरून एकही मार्ग उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी जैसे थे राहिली आहे. त्यामुळे या चौकात दररोज सकाळी आणि सायंकाळी मोठयाा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मार्ग काढणाऱ्या वाहनचालकांची दमछाक होते.
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल करून वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. मात्र या बदलांमुळे कोंडी सुटण्याऐवजी आगीतून फुफाटयात पडल्यासारखी अवस्था झाल्याने ते प्रयोग गुंडाळावे लागले आहेत. विद्यापीठ चौकात पाषाण, बाणेर, औंध या भागातून येणाºया वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर कडून औंध, बाणेरकडे जाणाऱ्या पुलाच्या रस्त्याचे दोन भाग करून दुहेरी वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पूर्णपणे अपयशी ठरला. काही दिवसांपूर्वी पाषाणकडून येणाºया वाहतुकीमध्ये उड्डाणपुलाचा खांब येतो, त्याच्या दोन्ही बाजूने वाहने जातात. त्यावर उपाय म्हणून खांबाच्या एका बाजूने तात्पुरते बॅरिगेट्स लावून वाहतूक बंद करण्यात आली. मात्र या बदलामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यामुळे काही तासांतच हा बदल मागे घ्यावा लागला.

पादचाऱ्यांचा संपेना त्रास
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाच्या परिसरामध्ये काही शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची तेथून सतत ये-जा असते. मात्र, या चौकातून रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हा चौक आकाराने खूप मोठा आहे. मध्यंतरी झेब्रा क्रॉसिंगमध्ये बदल करून तुलनेने चौकातील अंतर कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे. पादचाऱ्यांना सुरक्षितरीत्या चौक ओलांडण्यासाठी छोटे-छोटे आयलँड बांधण्याचा पर्यायही पुढे आला. मात्र अजूनही पादचाऱ्यांचा सोसावा लागणारा त्रास संपलेला नाही.

.......................

विद्यापीठाचे मुख्य प्रवेशव्दार हलविणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात असलेले मुख्य प्रवेशव्दार गणेशखिंड रस्त्यावरील कस्तुरबा मार्केट येथे हलविण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. या चौकामध्ये होणारे भविष्यातील मेट्रो स्टेशन, तीन मजली उड्डाणपूल आदींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: traffic problem always because all Experiment failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.