महाराष्ट्राला मोठा दिलासा... धोकादायक 'निपाह व्हायरस'चा राज्याला धोका नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 05:38 PM2018-05-22T17:38:00+5:302018-05-22T17:45:58+5:30

निपाह या विषाणूचा महाराष्ट्रात सध्यातरी कुठलाही रुग्ण अाढळला नसला, तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे अावाहन अाराेग्य विभागाकडून करण्यात अाले अाहे.

there is no threads of nipah virus to maharashtra, precautionary order given | महाराष्ट्राला मोठा दिलासा... धोकादायक 'निपाह व्हायरस'चा राज्याला धोका नाही!

महाराष्ट्राला मोठा दिलासा... धोकादायक 'निपाह व्हायरस'चा राज्याला धोका नाही!

Next

पुणे : केरळ येथील कोझिकोडे मध्ये निपाह या विषाणूमुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर राज्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. महाराष्ट्राला या आजाराचा फारसा धोका नसला तरी खबरदारी म्हणून निपाह सदृश्य आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरावर करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संस्थेने सर्तकतेचा इशारा दिला आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) 3 नमुन्यांची तपासणी केल्यानंतर निपाह विषाणू आढळल्याची घोषणा केली आहे. यासाठी राज्यभरात प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना आखण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.  राज्य आरोग्य विभागाकडून जिल्हास्तरीय आरेग्य अधिका-यांना काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
     ‘लोकमत’शी बोलताना राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘केरळ येथे निपाह विषाणूमुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या तरी राज्याला या विषाणूचा धोका नसला तरी खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात हा आजार नेमका काय आहे, कसा पसरतो, काय खबरदारी घ्यावी, हे सांगण्यात आले आहे. एखाद्या रुग्णामध्ये लक्षणे आढळल्यास निपाह विषाणूची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. हा विषाणू मुख्यत्वे केरळ, ईशान्य भारत, बांग्लादेश, पश्चिम बंगाल या ठिकाणांवरुन पसरत असल्याने तेथून आलेल्या नागरिकांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या विषाणूसाठी कुठलीही लस नसल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. 
      ताप, डोकेदुखी, झोपाळलेपणा, मानसिक गोंधळ उडणे, शुद्ध हरपणे अशी लक्षणे असणारा कोणताही रुग्ण, तसेच जपानी मेंदूज्वर अथवा इतर मेंदूज्वरा करिता निगेटिव्ह असणारा, मागील 3 आठवड्यात केरळ मधील कोझिकोडे परिसरात, ईशान्य भारतात अथवा बांग्ला देशा सीमेलगतच्या भागात प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्ण यांना संशयित निपाह विषाणू रुग्ण म्हणून गृहित धरुन या रुग्णास स्वतंत्र कक्षात भरती करुन त्याचा नमुना पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पाठविण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. 

निपा विषाणूचा प्रसार 
    निपा विषाणूचा प्रसार हा मुख्यत्वे फळांवर जगणा-या वटवाघुळांच्या मार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांनाही बाधा होऊ शकते. 1998 च्या मलेशियातील उद्रेकात वराह पालन करणारे शेतकरी मुख्यत्वे बाधित झाले होते. निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. वटवाघळाच्या स्त्रावामुळे दूषित झालेला खजूराच्या झाडाचा रस पिल्याने देखील या विषाणूचा प्रसार होतो.

लक्षणे
 निपा विषाणू आजारात ताप, अंगदुखी, डोकेदुखी, झोपाळूपणा, मानसिक गोंधळ उडणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. आजवरील उद्रेकात मृत्युचे प्रमाण 40 ते 70 टक्के एवढे आहे.

उपचार 
 निपा विषाणू आजारावर कोणतेही विशिष्ट औषध नाही. रॅबाविरिन हे विषाणू विरोधी औषध वापरले जात असले तरी मुख्यत्वे लक्षणाधारित उपचार आणि साह्यभूत शुश्रूषा यावर भर दिला जातो. 

निदान
 निपा विषाणूच्या निदानासाठी अार टी पी सी अार पद्धतीने घसा व नाकाचे स्त्राव, मूत्र, रक्त या नमुण्यांची तपासणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था येथेकरण्यात येते. 
------------------------------------
नागरिकांनी वटवाघूळ, डुक्कर यांच्या संपर्कात येऊ नये. या विषाणूची लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल व्हावे. महाराष्ट्रात सध्या तरी या विषाणूचा रुग्ण आढळला नसला तरी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. 
- डॉ. मुकुंद डिग्गीकर, सह संचालक, राज्य आरोग्य विभाग

Web Title: there is no threads of nipah virus to maharashtra, precautionary order given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.