खडकवासल्याच्या पाण्यावरून संघर्ष पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:22 AM2019-01-30T02:22:22+5:302019-01-30T02:22:52+5:30

इंदापूर, बारामती, दौंड, हवेली तालुक्यांतील ६५ हजार हेक्टर शेती संकटात

There is a conflict between the water of the rocks | खडकवासल्याच्या पाण्यावरून संघर्ष पेटणार

खडकवासल्याच्या पाण्यावरून संघर्ष पेटणार

Next

- सतीश सांगळे 

कळस : खडकवासला धरणसाखळीतील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड व हवेली या तालुक्यांमधील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यात पुणे शहर व ग्रामीण हा वाद विकोपाला जाणार आहे. या निर्णयामुळे पाण्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. इंदापूर, बारामती, दौंड व हवेली या तालुक्यांमधील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती सिंचनासाठी या कालव्यावर अवलंबून आहे. शहराच्या वाढत्या पाणीमागणीमुळे या भागातील फळबागा व शेती अडचणीत आल्या असून, दर वर्षी उन्हाळ्यात आवर्तन देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप या तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. महत्त्वाच्या या पाणीप्रश्नी कायम सापत्नभावाची वागणूक ग्रामीण भागाला मिळत असल्याने येत्या काळात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटणार आहे.

वाढत्या आवर्तनामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. यामुळे यावर्षी ही उन्हाळ्यात पाणी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गतवर्षीपेक्षा पाच टीएमसी पाणी कमी असल्याचे कारण पुढे करून उन्हाळ्यात आवर्तन सोडण्यात येणार, असा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा रासप यांच्याकडून या संवेदनशील पाणीप्रश्नावर एकत्रित मार्ग काढण्याची गरज निर्माण झाली आहे. जानाई व शिरसाई उपसा सिंचन प्रकल्प, तसेच दौंड व इंदापूर शहराचा पाणीपुरवठा व शेकडो ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना धोक्यात येणार आहेत. भीमा पाटस, कर्मयोगी इंदापूर, अनुराज यवत, दौंड शुगर, बारामती अँग्रो, छत्रपती भवानीनगर, या साखर कारखाना पट्ट्यातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. तसेच कारखान्यांनाही याची झळ सोसावी लागणार आहे.

इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्यावरील ३६ गावांमधील सुमारे २० हजार हेक्टर वरील शेती व्यवस्था बारमाही सिंचनाअभावी संकटात आहे. या भागातील द्राक्षे, डाळींब, ऊस फूलशेती नेहमीच अडचणीत असते. तसेच, पिण्याच्या पाण्याचीही अवस्था गंभीर आहे. सिंचनासाठी या ठिकाणी कालव्याच्या कामाला १९६७ मध्ये सुरुवात करण्यात आली. १९८९ मध्ये हे काम पूर्ण होऊन शेटफळगढेपासून बेडशिंगेपर्यंत सुमारे ३६ गावांमधील २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, १९९१ मध्ये प्रत्यक्षात या भागात पाणी आले असले, तरी आजही आठमाही जास्त शेती ही सिंचित होत नाही. कालव्यावर अवलंबून असलेली द्राक्षे, डाळींब, ऊस, फूलशेती ही पिके धोक्यात येतात.

धरणसाखळीत कमी पाणी व पुणे शहराचा धरणावर अवलंबून असलेला पाणीपुरवठा यामुळे गेली काही वर्षांपासून येथील शेतीला उन्हाळी आवर्तन दिलेच जात नाही. त्यामुळे शेती संकटात आली आहे. खडकवासला धरण साखळीमधील पानशेत, वरसगाव, टेमघर व खडकवासला या धरणांची पाणीक्षमता सुमारे २९ टीमसी आहे. मात्र, पुणे शहराची पिण्याच्या पाण्याची मागणी ही वाढत असल्यामुळे उन्हाळी आवर्तनच दिले जात नाही. यामुळे या गावांमधील सुमारे ४२ पाझर तलाव हे पाण्याअभावी कोरडेच राहतात. पिण्याच्या पाण्याचे संकटही आहे. त्यामुळे येथील शेती व्यवस्था नेहमीच संकटात आहे.

तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्राला खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या लाभ होतो. कालवा व त्यावरील वितरिकांच्या माध्यमातून शेतकºयांना शेतीसिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सध्या कालव्याला आवर्तन दिले आहे. पण, तलाव भरून देणे गरजेचे आहे, खडकवासला कालव्याचा पट्टा हा अवर्षण प्रवण क्षेत्र म्हणूनही ओळखला जातो. या पट्ट्यात तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पर्जन्यमान कमी असते. यामुळे या भागाला खडकवासला कालव्याचा मोठा आधार आहे. मात्र, कालव्याला पाणी कधीच वेळेवर येत नसल्याने या भागातील शेतकरी संतप्त आहे

खडकवासला धरण शेतीसाठी बांधण्यात आले आहे. यांच्या माध्यमातून हजारो हेक्टर शेती सिंचित झाली आहे. मात्र, पुणे शहराला नेहमीच वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी उन्हाळी आवर्तन कमी केले जात आहे. यापुढे असले प्रकार चालू देणार नाही. खडकवासला धरणामधील पाण्यावर आमचा हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत उन्हाळी आवर्तन घेतले जाईल, वेळप्रसंगी जनआंदोलन उभारण्यात येईल.
- दत्तात्रय भरणे, आमदार

Web Title: There is a conflict between the water of the rocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.