टेक्नॉलॉजी करणार वणव्यांचा सामना, उन्हाळ्यामुळे आगीच्या घटना वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:03 AM2019-03-20T02:03:39+5:302019-03-20T02:03:58+5:30

उन्हाळा सुरू झाल्याने टेकडी, वन विभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तळजाई टेकडीवर आणि सोमवारी म्हातोबा टेकडीवर आग लागली.

Technology will create firefight due to climate change and summer | टेक्नॉलॉजी करणार वणव्यांचा सामना, उन्हाळ्यामुळे आगीच्या घटना वाढणार

टेक्नॉलॉजी करणार वणव्यांचा सामना, उन्हाळ्यामुळे आगीच्या घटना वाढणार

Next

- श्रीकिशन काळे

पुणे  - उन्हाळा सुरू झाल्याने टेकडी, वन विभागाच्या परिसरात आगी लागण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तळजाई टेकडीवर आणि सोमवारी म्हातोबा टेकडीवर आग लागली. त्यात टेकडीचे नुकसान तर झालेच; पण जैवविविधतेसाठी आवश्यक घटक कीटक, किडे, छोटे प्राणी, पक्ष्यांचे घरटे यांचाही त्यामध्ये बळी गेला. दरम्यान असे वणवे विझविण्यासाठी वन विभागातर्फे विविध यंत्रांचा उपयोग करण्यात येत आहे. वणव्यांचा सामना करण्यासाठी संपूर्णपणे वन विभाग सज्ज झाले आहे. त्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे.

वणवे किंवा आगी लागायचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे नैसर्गिक व दुसरे मानवनिर्मित असते. नैसर्गिक वणव्यांचे अथवा आगी लागण्याचे प्रमाण केवळ १२ ते १५ टक्के एवढेच आहे, तर मानवनिर्मित बाबींचे सर्वसाधारण प्रमाण ८० ते ८५ टक्के असते.
नैसर्गिक आगी ही झाडे किंवा बांबू यांच्या घर्षणाने लागू शकतात अथवा वीज पडून, शॉर्टसर्किट होऊन आदी गोष्टींमुळे आग लागू शकतात. परंतु मानवनिर्मित आग किंवा वणवे हे अनेक वेळा समाजकंटक, विकृत लोकांकडून लावले जातात. यामध्ये सिगरेट, बीडी, काडेपेटीचे थोटके जंगलात, डोंगरात फेकून दिले जातात. त्यामुळे आग लागते. वणवे हे अनेक वेळा गैरसमजुतीमधून लावले जातात. वणवे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडून दरवर्षी अनेक हेक्टर जागेतील देशी झाडे, औषधी झाडे, अनेक जातीचे पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे, बेडूक, साप यांचा मोठा अधिवास असतो.

तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक होतो. साधारणत: जानेवारी ते मे अखेरपर्यंत आगीचे प्रमाण किंवा वणव्याचे सत्र मोठे असते, अशी माहिती टेल्स आॅर्गनायझेशनचे लोकेश बापट यांनी ‘लोकमत’ला दिली.

शहरात आणि जिल्ह्यात ज्या ठिकाणी वणवे लागण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे आम्ही शोधली आहेत. त्या ठिकाणी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांसाठी एक मजूर नेमण्यात आला आहे. तो वणव्यावर लक्ष ठेवेल. जिथे आग लागली असेल, त्याची माहिती तो वन विभागाला देईल. तसेच वणवे ज्या ठिकाणी लागतात, त्या ठिकाणी जाळपट्टी टाकली आहे. शक्य त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. जेणेकरून त्वरित आगीवर पाणी टाकून विझवता येईल. अनेक नागरिक दुपारी टेकडीवर फिरायला येतात. त्यातील बरेचजण बिअर पितात, पत्ते खेळतात, सिगारेट ओढतात. त्यातून आग लागल्याच्या घटना घडतात. त्यावरही आमचे लक्ष आहे, असे सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील टेकड्यांवर किंवा वन विभागाच्या परिसरात वणवा पेटल्यानंतर नागरिकांनी १९२६ वर कॉल केल्यास त्वरित मदत मिळेल, असेही भावसार यांनी सांगितले.

वणवा लागला तर १९२६ वर कॉल करा
राज्यात कुठेही वनक्षेत्राला वणवा लागला, कुठे अतिक्रमण होत असेल, वन्यजीव जखमी असेल किंवा वन विभागाशी संबंधित काही समस्या असेल तर त्वरित कारवाई होण्यासाठी वन विभागाने १९२६ हा २४ तास कॉल सेंटर नंबर सुरू केला. नागरिकांनी वणवा लागला किंवा वन विभागाच्या इतर समस्येबाबत यावर माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले.

वणवा लावल्याने पुढील वर्षी गवत चांगलं येते, जमीन सुपीक राहते, झाडे चांगली येतात. प्रथम हा गैरसमज दूर केला पाहिजे. निसर्गामधील वृक्ष, वेली, झाड, कीटक, प्राणी हे निसर्गचक्र व्यवस्थित ठेवण्याचे काम माणसापेक्षा कितीतरी जास्त चांगलं करीत असतात. आपण मात्र उगीचच मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत राहतो. वणवे लावल्याने जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. पहिल्याच पावसात गवत जळून गेल्याने त्याच्या आजूबाजूची सर्व माती मोकळी होते व हीच माती डोंगरदऱ्यात वाहून धरणामध्ये जाते. तिथे गाळ मोठ्या प्रमाणात साठत राहतो.
- लोकेश बापट, टेल्स आॅर्गनायझेशन

म्हातोबा टेकडीवर सोमवारी खूप मोठा वणवा लागला. हा वणवा चांगलाच वाढला होता. त्याबाबत वनविभागाला कॉल केला होता. परंतु, त्यांचे कोणीही घटनास्थळी आले नाही. स्थानिक नागरिकांनीच इकडून-तिकडून पाणी आणले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला.
- अ‍ॅड. विंदा,
स्थानिक नागरिक

आग विझविण्यासाठी अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी
फायर ब्लोअर हे अ‍ॅडव्हान्स यंत्रही आम्ही वापरत आहोत. ते मजुराकडे दिले असून, हे यंत्र पाठीवर ठेवून आग विझवता येते. त्यातून हवेचा मोठा झोत बाहेर येतो आणि आग विझते. छोटे छोटे फायर बिटरही उपलब्ध करून दिले आहेत. पूर्वी झाडाच्या फांद्या किंवा माती टाकून आग विझविली जात असे. परंतु, नागरिकांना त्यासाठी आगीच्या जवळ जावे लागे आणि त्यात अनेकदा ते भाजले जात असत. त्यामुळे आम्ही आता हाताने वापरता येतील, असे यंत्र उपलब्ध केली आहेत. ग्रास कटर हे यंत्र, कर्मचाऱ्यांना फायर प्रुफ ड्रेस देत आहोत, असे सहायक वनसंरक्षक महेश भावसार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Technology will create firefight due to climate change and summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.