Tara Bhawalkar presidents of first pasaydan vichar sahitya sammelan | पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर
पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

ठळक मुद्दे१३, १४ आणि १५ एप्रिलला आळंदीत होणार संमेलन मराठी विश्वकोश,मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही बहुमोल योगदान

पुणे : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे होणार आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 
'पाच दशकांहून अधिक काळ नाटक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला यांच्या अभ्यासात रमलेल्या भवाळकर यांनी लोकसंस्कृती तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. त्यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ, चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठ ठरावा असे आहे. मराठी विश्वकोश,मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. डॉ. श्रीधर व्यकंटेश केतकर, वि. का. राजवाडे,धमार्नंद कोसंबी, दुर्गाबाई भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे या महाराष्ट्रातील व्रतस्थ ज्ञानोपासकांचे ऋण मानणा-या भवाळकर यांनी त्यांची परंपरा समर्थपणे पुढे चालवली आहे. अशा व्रतस्थ लेखिकेची पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड करताना मनात आनंदाची आणि समाधानाची भावना आहे, असे लक्ष्मीकांत देशमुख आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे. 
....................
    डॉ. तारा भवाळकर यांची ग्रंथसंपदा 
मायवाटेचा मागोवा, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, महामाया, मिथक आणि नाटक, लोकनागर रंगभूमी, लोकसंचित, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, माझिये मातीचा, मराठी नाट्यपरंपरा :शोध आणि आस्वाद, मधुशाला (हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याचा स्वछंद अनुवाद), लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे, लोकांगण, लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह , प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा) 


Web Title: Tara Bhawalkar presidents of first pasaydan vichar sahitya sammelan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.