खडकी : चिखलवाडीतील माता रमाबाई आंबेडकर शाळेच्या पटांगणात विद्यार्थी कवायत करीत असताना स्कूल व्हॅनने कवायत करणा-या विद्यार्थ्यांना जोरात धडक दिली. गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेत सहा विद्यार्थी जखमी झाले.

या प्रकरणी व्हॅन चालक मोईन शेख व रिक्षाचालक रशीद कुरेशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत हकीकत अशी की, सकाळी साडेनऊच्या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांचा पीटीचा तास सुरू असल्याने मैदानामध्ये विद्यार्थी कवायत करीत होते. त्या वेळेस व्हॅन चालक ( एमएच १२ क्यू ए ४०५१) मोईन शेख हा रिक्षाचालक रशीद शेख याला व्हॅन चालवण्यास शिकवत होता. त्यावेळी व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने मैदानात कवायत करणा-या विद्यार्थ्यांना व्हॅनने धडक दिली. त्यात आफताब शेख या विद्यार्थ्यांच्या पायावरून व्हॅनचे चाक गेल्यामुळे पायाला गंभीर दुखापत झाली.

यश जाधव या विद्यार्थ्यांच्या डोक्याला जबर मार लागला. तर प्रियश साळवे, स्वप्नील वाल्हेकर, वैभव रस्ते, इरफान शेख हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करीत व्हॅन चालक व रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. अपघाताचे वृत्त समजताच नगरसेवक विजय शेवाळे, बंडू ढोरे नगरसेविका सुनीता वाडेकर, माजी नगरसेविका अर्चना कांबळे , माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुणे महापालिका शिक्षण मंडळ दुर्लक्षपणामुळेच असे प्रकर घडू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केल्या. खडकी पोलीस पुढील तपास करीत आहे .