स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 06:48 PM2021-07-15T18:48:35+5:302021-07-15T19:39:38+5:30

महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

Shivsena help Rs 10 lakh to Swapnil Lonakar's family; Visited by Eknath Shinde | स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून १० लाखांची मदत सुपूर्त; एकनाथ शिंदेंनी घेतली भेट 

Next

हडपसर : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करत आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिंदे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली.

स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून फुरसुंगी येथे राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं होतं. त्याच्या कुटुंबीयांची गुरुवारी ( दि. १५ ) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार तानाजी सावंत यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, उपाध्यक्ष आकाश शिंदे ,राजाभाऊ होले व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वप्नील लोणकरचे वडील सुनिल लोणकर, आई छाया लोणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिंदे म्हणाले, शिवसेना तुमच्यासोबत आहे.तुम्ही धीर सोडू नका.स्वप्नीलची बहीण पूजा हिने शिक्षण पूर्ण केले असेल तिची नोकरीची इच्छा असेल तर आम्ही  स्वतः लक्ष घालून तिला नोकरी मिळवून देऊ असे आश्वासनही दिले.

एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने ३१ जुलै २०२१ अखेरपर्यंत १५,५०० हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली आहे. याबाबतची कार्यवाही देखील सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 

यावेळी शिंदे यांनी एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असं आश्वासनही दिलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारलं असता पावसाळी अधिवेशात याबाबत चर्चा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 

डॉ. निलम गोऱ्हे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे लक्ष स्वप्नीलच्या कुटुंबावर आहे.तुम्ही धीर सोडू नका.अशा शब्दांत लोणकर कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वप्नीलची लहान बहीण पूजा हिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कशी मदत करता येईल, यासाठी सरकार पातळीवर आम्ही नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार तानाजी सावंत यांच्या वतीने ५ लाख रुपये रोख व ५ लाख रूपयांचा धनादेश अशी एकूण दहा लाख रुपयांची आर्थिक मदत लोणकर कुटुंबियांना देण्यात आली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने ५० हजार  व शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य शंकर नाना हरपळे यांच्या माध्यमातून ५० हजार रुपये अशी एक लाख रुपयांची आर्थिक मदतही यावेळी करण्यात आली. काल बुधवारी शिवसेनेचे माजी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ होले यांच्या लोककल्याण पतसंस्थेच्या माध्यमातून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत स्वप्नीलच्या कुटूंबियांना देण्यात आली आहे.

 

Web Title: Shivsena help Rs 10 lakh to Swapnil Lonakar's family; Visited by Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.