भांडारकर संस्थेत रंगणार  ‘संत तुकाराम’ महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:10 PM2020-03-11T12:10:19+5:302020-03-11T12:11:06+5:30

४० चित्रे व शिल्पे ‘संत तुकाराम’ महोत्सवादरम्यान आयोजित चित्रप्रदर्शनात मांडली जाणार

Sant Tukaram Festival will be held at Bhandarkar Institute | भांडारकर संस्थेत रंगणार  ‘संत तुकाराम’ महोत्सव

भांडारकर संस्थेत रंगणार  ‘संत तुकाराम’ महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्दे व्याख्याने, परिसंवाद, भजन-कीर्तन, चित्रप्रदर्शन यांसारखे विविध कार्यक्रम

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव, संत नामदेव आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीने ‘संत तुकाराम’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तुकोबा आणि प्रार्थना समाज यांच्यावरील व्याख्याने, परिसंवाद, भजन-कीर्तन, चित्रप्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांमधून हा महोत्सव रंगणार आहे.  
तुकाराम बीजेच्या निमित्ताने येत्या १३ ते १५ मार्चदरम्यान भांडारकर संस्थेत होणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटनासह विख्यात चित्रकार भास्कर हांडे यांच्या तुकोबांच्या अभंगांवरील चित्रप्रदर्शनाचेदेखील उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे यांनी दिली. या वेळी संत ज्ञानदेव अध्यासनाचे प्रमुख प्रा. मुकुंद दातार, संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. अभय टिळक, भांडारकर संस्थेचे सचिव प्रा. सुधीर वैशंपायन व कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. भूपाल पटवर्धन हे उपस्थित होते.  
उद्घाटन सत्रानंतर संत तुकाराम अध्यासनाचे प्रमुख डॉ. अभय टिळक यांचे   ‘श्री तुकाराम चरित्र’ व ‘संत तुकाराम आणि प्रार्थना समाज’ या विषयावर डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान होईल. शनिवारी (दि. १४) दुपारी ३ वाजता प्रा. डॉ. दिलीप धोंडगे ‘प्रार्थना समाजाचे तुकाराम चर्चा मंडळ’ या विषयावर विचार व्यक्त करणार असून, त्यानंतर डॉ. दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग आणि सहकारी यांचे ‘प्रार्थना संगीत’ सादर होईल. रविवारी (दि. १५)  दुपारी ३ वाजता ‘संत आणि समकालीन परिवर्तने’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यामध्ये डॉ. रूपाली शिंदे, सचिन पवार आणि राजा अवसक हे सहभागी होतील. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. राजा दीक्षित भूषविणार आहेत. त्यानंतर नमिता मुजुमदार यांच्या ‘हरिकीर्तनाने’ या संत तुकाराम महोत्सवाचा समारोप होईल. हे कीर्तन भांडारकरमधील जुन्या पिंपळ्याच्या झाडाखाली रंगणार आहे.  
..........
मी तीस वर्षांपूर्वी ’तुझे रूप माझे देणे’ हा संत तुका
राम महाराजांच्या अभंगावरील चित्र आणि शिल्पांचा एक प्रकल्प हाती घेतला होता. त्यामध्ये जवळपास ४०० चित्रे मी रेखाटली. या चित्रांचे १९९२मध्ये पहिले प्रदर्शन हॉलंडमध्ये भरले होते. त्यानंतर विविध ठिकाणी हे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते. 
यामधील  ४० चित्रे व शिल्पे ‘संत तुकाराम’ महोत्सवादरम्यान आयोजित चित्रप्रदर्शनात मांडली जाणार आहेत. ही सर्व मराठी शैलीतील चित्रे असून, त्यातील काही शिल्पे औंधच्या  ‘वैश्विक कला आणि पर्यावरण कलादालनात ठेवण्यात आली आहेत. पुण्यात या चित्रांसाठी कायमस्वरूपी कलादालन व्हावे, अशी इच्छा चित्रकार भास्कर हांडे यांनी व्यक्त केली.
.........
तत्त्वज्ञान हा प्रार्थना समाजाचा पाया... 
डॉ. रामकृष्ण गोपाल भांडारकर हे विख्यात प्राच्यविद्या तज्ज्ञ, संस्कृतचे गाढे विद्वान तसेच प्रार्थना समाज या महत्त्वाच्या धार्मिक चळवळीचे अध्वर्यू होते. संत तुकाराम महाराज आणि त्यांचे तत्त्वज्ञान हा प्रार्थना समाजाचा पाया होता. डॉ. भांडारकर तुकोबांना गुरुस्थानी मानत. - डॉ. सदानंद मोरे, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Web Title: Sant Tukaram Festival will be held at Bhandarkar Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.