अशास्त्रीय गतिरोधकांच्या भडिमारामुळे रस्ते धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 01:10 AM2018-11-30T01:10:36+5:302018-11-30T01:10:54+5:30

लोकमत पाहणी : ‘इंडियन रोड काँग्रेस’च्या निकषांचे उल्लंघन

Road risky due to the spread of non-stop movement | अशास्त्रीय गतिरोधकांच्या भडिमारामुळे रस्ते धोकादायक

अशास्त्रीय गतिरोधकांच्या भडिमारामुळे रस्ते धोकादायक

Next

पुणे : शहरातील बहुतेक रस्त्यांवर अशास्त्रीय गतिरोधकांचा भडिमार करण्यात आला असल्याचे ‘लोकमत’ पाहणीत आढळून आले. इंडियन रोड काँग्रेस (आयआरसी)च्या गतिरोधकाबाबतच्या निकषांचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच, अनेक गतिरोधकांची स्थितीही चांगली नाही. त्यामुळे वाहनांची गती कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले गतिरोधक वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. त्यात गटाराच्या झाकणांमुळे तयार झालेल्या ‘कृत्रिम गतिरोधकां’ची भर पडली आहे.


रस्त्यावरील वाहनांचा वेग कमी करणे, हा गतिरोधकाचा मुख्य उद्देश असतो. ‘आयआरसी’च्या निकषानुसार गतिरोधकांची उंची ०.१० मीटर, तर रुंदी ३.७ मीटर असणे अपेक्षित आहे. तसेच गतिरोधकाच्या दोन्ही बाजूंना काळे-पांढरे पट्टे असायला हवेत. पण, शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर हे निकष पायदळी तुडविले गेले आहेत. याबाबत ‘लोकमत’ने शहरातील विविध रस्त्यांवर पाहणी केली. सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, सिंहगड रस्ता, गणेशखिंड रस्ता, सातारा रस्ता, नेहरू रस्ता या रस्त्यांवर गतिरोधकांची स्थिती पाहण्यात आली.


शहरातील अनेक ठिकाणी गतिरोधकांची उभारणी करताना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. काही ठिकाणचे गतिरोधक हे खूपच छोटे आहेत, तर काही ठिकाणचे खूपच मोठे. प्रत्येक गतिरोधकाचा आकार हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या लांबी, उंचीमध्ये फरक आहे. त्यामुळे चालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना वाहन चालवताना त्रास होतो. गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लॅस्टिक पेंट पट्ट्या, पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे. शिवाय, वाहनचालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचनाफलकही रस्त्यावर असणे अपेक्षित आहे. पण, या बाबींकडे बहुतेक रस्त्यांवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गतिरोधकांना न जुमानता वाहनचालक सुसाट वाहन दामटत असल्याचे आढळले.

Web Title: Road risky due to the spread of non-stop movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.