पुणे विद्यापीठात एसएफआयकडून तोडफोड; वसतिगृहात अनवधानाने काच फुटल्याचा अध्यक्षांकडून खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 04:05 AM2018-04-19T04:05:25+5:302018-04-19T04:08:00+5:30

विद्यापीठाकडून तक्रार दाखल : वसतिगृहात अनवधानाने काच फुटल्याचा अध्यक्षांकडून खुलासा

Pune University disrupts SFIs; | पुणे विद्यापीठात एसएफआयकडून तोडफोड; वसतिगृहात अनवधानाने काच फुटल्याचा अध्यक्षांकडून खुलासा

पुणे विद्यापीठात एसएफआयकडून तोडफोड; वसतिगृहात अनवधानाने काच फुटल्याचा अध्यक्षांकडून खुलासा

Next


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाचा (एसएफआय) विभागाध्यक्ष सतीश देबडे याच्याकडून मंगळवारी रात्री वसतिगृहातील काचांची मोडतोड करण्यात आली तसेच त्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला, अशी तक्रार विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून पोलिसांकडे करण्यात आली आहे. मात्र, अनवधानाने आपल्याकडून रूमची काच फुटली असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) मुद्दाम आपली बदनामी करण्यात आल्याचा खुलासा एसएफआयच्या अध्यक्षाकडून करण्यात आला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक ९च्या खोली क्रमांक ४०२ मध्ये हा प्रकार घडला. सतीश देबडे हा वर्षभरापासून एसएफआयचा विद्यापीठ विभागाध्यक्ष म्हणून काम पाहतो. तो राज्यशास्त्र विभागामध्ये पी.एच.डी करीत आहे. शनिवारी रात्री सतीशचा मित्रासोबत किरकोळ वाद झाला. त्यातून त्याने रागाच्या भरात त्याच्या रूमच्या काचा फोडल्या. यामध्ये त्याच्या हाताला काच लागून त्याला जखम झाली आहे.
वसतिगृह क्रमांक ९ मध्ये सुरू असलेल्या या गोंधळाची माहिती मिळताच सुरक्षा विभागाचे कर्मचारी व वसतिगृह प्रमुखांनी तिथे धाव घेतली. त्या वेळी त्यांनी चौकशी केली असता त्यांच्या प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी सुरक्षा विभागाने चतु:शृंगी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी अभाविपनेही यामध्ये उडी घेतली आहे. एसएफआयच्या अध्यक्षाने दारू पिऊन जो गोंधळ घातला, तो निंदनीय असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सतीश देबडे याने खुलासा केला, ‘‘माझ्या हातातून वसतिगृहातील माझ्याच खोलीची काच अनवधानाने फुटली. याप्रकरणी विद्यापीठाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. मात्र, अभाविपने जाणीवपूर्वक मी दारू व गांजा पिऊन गोंधळ घातला अशा प्रकारचे खोटे मेसेज पसरविले आहेत. त्यांनी सूडबुद्धीने माझी व संघटनेची बदनामी केली आहे. याबाबत मी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. वसतिगृहामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.’’

रोहित वेमुलासारखे दुसरे प्रकरण घडू नये, याची दक्षता घ्यावी
४सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात यावी. विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एका विशिष्ट संघटनेकडून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका संशोधक विद्यार्थ्यावर जाणीवपूर्वक संस्थात्मक हल्ला करण्याचा हा प्रकार आहे. प्रशासनाने योग्य ती चौकशी करूनच कार्यवाही करावी. रोहित वेमुलासारखा दुसरा प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी, अशी मागणी एनएसयूआयचा विद्यापीठ अध्यक्ष सतीश गोरे यांनी केली आहे.

Web Title: Pune University disrupts SFIs;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.