जलवाहिनी फुटल्याने जनता वसाहतीत संसार उघड्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:25 PM2019-04-19T17:25:04+5:302019-04-19T17:27:40+5:30

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामधून पद्मावती पंपिंग स्टेशनला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने जनता वसाहतीमधील जवळपास सात घरांचे नुकसान झाले.

public homes on road due to water pipeline break in janata colony | जलवाहिनी फुटल्याने जनता वसाहतीत संसार उघड्यावर 

जलवाहिनी फुटल्याने जनता वसाहतीत संसार उघड्यावर 

Next
ठळक मुद्देदहा घरांचे नुकसान : जनता वसाहतीमध्ये भिंती पडल्या, नागरिक झाले हवालदिल

पुणे : पर्वती जलशुद्धीकरण केंद्रामधून पद्मावती पंपिंग स्टेशनला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने जनता वसाहतीमधील जवळपास सात घरांचे नुकसान झाले. जमिनीखालून मोठ्या प्रमाणावर पाणी वर येऊ लागल्याने घरांमध्ये पाणी साठले. या प्रवाहामुळे भिंती पडल्या. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत उपलब्ध करुन देत अनेकांना घराबाहेर काढले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे जनता वसाहतीमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अंदाजे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 


पर्वती टेकडीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनता वसाहतीमध्ये गल्ली क्रमांक २९ च्या समोर असलेल्या घरांखालून १८ इंच व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे. ही जलवाहिनी तीन ते चार दशके जुनी असून त्यावर याठिकाणी घरे उभी आहेत. रात्री स्थानिक नागरिक जेवण वगैरे करुन झोपण्याच्या तयारीत होते. भरत जयवंत काशिद हे पत्नी व मुलींसह घरामध्ये झोपलेले होते. साडेबारा-पाऊण वाण्याच्या सुमारास जमिनीखालून अचानक पाण्याचा लोंढा वर आला. घरातील फरशीमधून पाणी येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, झोपेत असल्याने कोणाच्याही ते लक्षात आले नाही. पाण्याचा प्रवाह वाढताच भूकंप झाल्याप्रमाणे जमिनीखालून पाण्याचा फवारा वर आला. या फवाºयासोबतच भरत काशिद आणि त्यांच्या पत्नी संगिता वर उडाल्या. हा फवारा थेट छताला लागत होता. घरामध्ये पाणीच पाणी झाले होते. हे पाणी दार बंद असल्याने घरातच साठून राहिले होते. पाण्याची पातळी वाढू लागली होती. घरातील दिवाण पाण्यामध्ये तरंगू लागला होता. त्याला धरलेले काशिद, पत्नी संगिता आणि मुलगा सिद्धार्थही तरंगत होते. 
त्यांनी आरडाओरडा करताच स्थानिक नागरिक मदतीला धावले. त्यांनी दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे सिमेंट विटांची भिंत कोसळली. ही भिंत शेजारी राहणाऱ्या उमेश भागोजी चव्हाण यांच्या दुकानावर कोसळली. ही भिंत सामाईक असल्याने दोन्ही घरांचे नुकसान झाले. चव्हाण यांचे पुढील बाजूस दुकान असून पाठीमागे असलेल्या दोन खोल्यांमध्ये सर्व कुटुंबिय झोपलेले होते. पाण्याच प्रवाह तसाच पुढे शेजारच्या घरांमध्ये घुसायला सुरुवात झाली. त्यामुळे काही घरांच्या भिंतींना तडे गेले. तसेच अनेकांच्या घरांमध्ये पाणीच साचले होते. त्यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले.
-====
नुकसान झालेल्या घरांमध्ये आक्रोश... अश्रू आणि हतबलता याशिवाय काहीच उरले नव्हते. या दुर्घटनेत संगिता भरत काशिद, जयश्री विशाल चव्हाण, प्रशांत गणपत प्रभू, विजय बापू जाधव, रेखा रमेश जाधव, महेश सुरेश जाधव, उमेश भागोजी चव्हाण आदींच्या घरांचे नुकसान झाले. सर्वांनी कपडे, भांडी, संसारोपयोगी साहित्य असे जमेल तेवढे सामान वाचविण्याचा प्रयत्न केला. 
====
भरत काशिद यांची मुलगी अश्विनी हिच्या लग्नाची तयारी घरामध्ये सुरु आहे. दोन महिन्यांनंतर लग्न करण्याचे काशिद कुटुंबियांचे नियोजन होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहासोबत घरामधील कपडे आणि २६ तोळे सोन्याच्या मौल्यवान वस्तू व १५ लाख रुपये वाहून गेल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. या धावपळीमध्ये काशिद यांच्या पायाला मार लागला असून ते जखमी झाले आहेत.
====

घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे, कर्मचारी कुलदीप सपकाळ आदी घटनास्थळी धावले. निरीक्षक घेवारे आणि त्यांचे सहकारी बचाव कार्य करण्यासाठी घरामध्ये घुसले. चिखल तुडवित सर्व राडारोडा बाहेर काढण्यास सुरुवात केली. शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरज लोखंडे, स्थानिक मंडळाचे अध्यक्ष समिर पवार यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरांमध्ये कंबरेएवढे पाणी होते. पाण्यामध्ये वीजेचा करंट उतरु लागल्याने तत्काळ महावितरणशी संपर्क साधून वीज प्रवाह बंद करण्यात आला. तसेच पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधून पाणी बंद करण्यात आले. पीडितांची जवळच्याच अंगणवाडी आणि समाजमंदिरामध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
====
आम्ही घरामध्ये झोपलेलो असताना जमिनीखालून पाण्याचा जोरदार फवारा उडाला. त्यासोबत आम्हीपण वर उडालो. अचानक घरामध्ये पाणीच पाणी झाले. पाण्याची पातळी वाढत चालली होती. मदतीची आरडाओरडा केल्यावर स्थानिकांनी आम्हाला घराबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान, घराची भिंत कोसळल्यामुळे पाणी वाहून गेले. आम्हाला सर्वांनी बाहेर काढले. अन्यथा आमच्यावर काळच आला होता. आमचे सर्वकाही वाहून गेले असून काहीही शिल्लक राहिले नाही. 
- संगिता भरत काशिद, पीडित
====
आमचे घर तीन खोल्यांचे असून पुढील बाजूस दुकान आहे. तर पाठीमागील बाजूस दोन खोल्यांमध्ये तीन मुले आपापल्या कुटुंबियांसह राहतात. मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास अचानक भिंत पडल्याचा आवाज झाला. आम्ही घाबरुन उठलो. स्थानिकांनी मदत करुन आम्हाला बाहेर काढले. लहान मुलांसह आम्ही सर्वजण घाबरुन गेलो होते. आमचे खूप नुकसान झाले आहे.  
- उमेश भागोजी चव्हाण, पीडित
====
पोलिसांनी महावितरण, पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानुसार अग्निशामक दलाचे अधिकारी मांडवकर, पाणी पुरवठा विभागाचे लाईनमन चंद्रप्पा धनगर, महावितरणचे लाईनमन प्रशांत चिकने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यूत पुरवठा बंद करत घरातील टीव्ही, फ्रीज, दिवाण, कपडे, संसारोपयोगी साहित्य बाहेर काढण्यास मदत केली. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य करत नागरिकांना धीर देण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: public homes on road due to water pipeline break in janata colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.