PMC: आचारसंहितेमुळे महापालिकेची निविदांची लगीनघाई; स्थायीपुढे १२९ कोटींचे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 10:41 AM2024-03-14T10:41:19+5:302024-03-14T10:41:50+5:30

शहरातील विविध महत्त्वाच्या कामाबरोबर समाविष्ट गावामधील विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे....

PMC: Municipal tenders rush due to code of conduct; 129 crore proposal before standing | PMC: आचारसंहितेमुळे महापालिकेची निविदांची लगीनघाई; स्थायीपुढे १२९ कोटींचे प्रस्ताव

PMC: आचारसंहितेमुळे महापालिकेची निविदांची लगीनघाई; स्थायीपुढे १२९ कोटींचे प्रस्ताव

पुणे : लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने स्थायी समितीच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत १२९ कोटींच्या ४७ निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात येत आहेत. शहरातील विविध महत्त्वाच्या कामाबरोबर समाविष्ट गावामधील विविध प्रकल्पांचा यात समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १५ मार्चनंतर कधीही लागू शकते. त्यामुळे स्थायी समितीच्या होणाऱ्या बैठकीसाठी निविदा मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यात घोरपडी येथील पुणे मिरज रेल्वे लाइनवर रेल्वे उड्डाणपूल बांधणे आणि मुकुंदराव चौक येथे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्यासाठी मे. एस. एस. सी. इन्फ्रास्ट्रकचर प्रा. लि. यांची ९५ कोटी २१ लाख रुपयांची निविदा आली आहे.

पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी ९३ लाख ३५ हजारांची निविदा आली आहे. सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ येथील रस्ते डांबरीकरण करणे, विठ्ठलराव तुपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल येथे विविध स्थापत्यविषयक कामे केली जाणार आहेत. चर्च ते वांजळे चौकापर्यंतचा डीपी रस्ता विकसित करणे, कै. रामचंद्र बनकर क्रीडा संकुलामध्ये विविध स्थापत्यविषयक कामे केली जाणार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात डायसप्लॉट, भवानी पेठ, लुल्लानगर परिसरात वॉटर लाइन टाकणे आणि दुरुस्तीविषयक कामे करण्यात येणार आहेत.

हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागामध्ये टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी ९९ लाख ९९ हजारांची निविदा काढली आहे. हडपसर साडेसतरा नळी साधना बँक ते स. नं. १७६, १७७, २४१, २४२ येथील नाल्यावरील अस्तित्वातील पाइप कल्व्हर्टचे ठिकाणी आर.सी.सी. कल्व्हर्ट पुलाचे काम करणे यासाठी १ कोटी ७१ लाख ५५ हजार रुपयांची निविदा आली आहे. शंकरशेठ रस्ता ते गुरुनानकनगर फुटपाथ आणि सायकल ट्रॅक विकसित करण्याकामी निविदा मागविली आहे. शहरातील विविध कामांसाठी वर्गीकरणाचेही प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

दाखल मान्यसाठी अनेक प्रस्ताव येणार :

शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किंवा तातडीचा विषय असेल तर तो स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी दाखल करून मान्य करण्यात येतो. मात्र, या नियमाचा दुरुपयोग केला जात आहे. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर महत्त्वाचे विषय आणले तर त्याची चर्चा होते; पण आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे स्थायी समितीच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत अनेक विषय दाखल मान्यतेसाठी येण्याची शक्यता आहे.

Web Title: PMC: Municipal tenders rush due to code of conduct; 129 crore proposal before standing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.