हिंदीतून उलगडतेय ज्ञानेश्वरी चे तत्वज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:42 PM2018-05-14T14:42:53+5:302018-05-14T14:42:53+5:30

किसनमहाराज साखरे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी साखरे यांचे ज्ञानेश्वरी प्रसार आणि ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. गेली चार वर्षे दररोज दहा तास काम करून त्यांनी हिंदी अनुवादाचे कार्य नुकतेच पूर्ण केले आहे.

Philosophy of Dnyaneshwari in Hindi | हिंदीतून उलगडतेय ज्ञानेश्वरी चे तत्वज्ञान

हिंदीतून उलगडतेय ज्ञानेश्वरी चे तत्वज्ञान

googlenewsNext
ठळक मुद्देकिसनमहाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरी विषयावर आतापर्यंत ८० ग्रंथांचे लेखन अनुवादाचा यशस्वी प्रयत्न : किसनमहाराज साखरे यांचा पुढाकार

पुणे : अठरा अध्यायांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत  भगवदगीतेवर केलेले भाष्य, ओव्यांच्या माध्यमातून सोप्या भाषेत उलगडलेले विश्वाचे तत्वज्ञान हा प्रत्येक पिढीसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, सांख्ययोग, भक्तीयोग अशा विविध योगांच्या निरुपणातून ज्ञानेश्वरी उलगडत जाते. ज्ञानेश्वरीरुपी ग्रंथातील मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषिकांना कळावा, आत्मसात करता यावा यासाठी ज्ञानेश्वरीचा हिंदीतून अनुवाद करण्याचे शिवधनुष्य ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसनमहाराज साखरे यांनी पेलले आहे. अनुवादाच्या माध्यमातून वयाच्या ऐंशीव्या वर्षीही साखरे यांनी ज्ञानेश्वरी प्रसार आणि  ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरु ठेवले आहे. त्यांनी केलेल्या अनुवादामुळे हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ अभ्यासक, विद्यार्थी आणि वाचकांना हिंदीतून उपलब्ध झाला आहे. 
ज्ञानेश्वरीचा अनुवाद करताना त्यांनी अनेक संस्कृतोद्भव शब्दांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे हिंदीमध्ये अनेक नवे शब्द तयार केले आहेत. यापूर्वी त्यांनी ‘अमृतानुभव’चा हिंदी अनुवाद केला असून ‘भाव पराग’ या छोटेखानी हिंदी पुस्तकाद्वारे ज्ञानेश्वरी साररूपाने सांगितली आहे. आता संपूर्ण ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवादाचा संकल्प सिद्धीस गेला असल्याने हे कार्य पूर्ण झाल्याची कृतार्थतेची भावना त्यांच्या मनात आहे, अशी माहिती किसनमहाराज साखरे यांचे पुत्र यशोधन साखरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी सप्तशताब्दी वर्षाचे औचित्य साधून किसनमहाराज साखरे यांनी ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी दृकश्राव्य माध्यमात इंटरनेटवर उपलब्ध करुन दिली आहे. उत्तर प्रदेशातील साधू निश्चलदास यांच्या ‘विचारसागर’ आणि ‘वृत्ती प्रभाकर’ या मूळ ग्रंथांचा अनुवाद केलेला असल्यामुळे किसन महाराज साखरे यांचे मराठी आणि संस्कृतप्रमाणेच हिंदी भाषेवरही प्रभुत्व आहे.  साखरेमहाराज यांच्यापासून घराण्यामध्ये ज्ञानेश्वरी अभ्यासाची परंपरा सुरू झाली. त्यांचे पुत्र नानामहाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरी प्रवचनाची प्रथा सुरू केली. दादामहाराज साखरे आणि तात्यामहाराज साखरे यांच्यानंतर ही धुरा किसनमहाराज साखरे यांच्याकडे आली. किसनमहाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरी विषयावर आतापर्यंत ८० ग्रंथांचे लेखन केले आहे. ह्यमावळवित विश्वाभासूह्ण या ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील पहिल्या ओवीवर एक हजार पृष्ठांचा ग्रंथ लिहिला आहे. ‘नवरसी भरवी सागरू’ या ग्रंथातून ज्ञानेश्वरीतील रसविचार आणि ‘उचित रत्नांची अलंकारू’ या ग्रंथातून ज्ञानेश्वरीतील अलंकार विचारावर रसाळ शैलीत भाष्य केले आहे. 
-----------
ज्ञानेश्वरी अभ्यासाची गुरू-शिष्य परंपरा असलेल्या साखरेमहाराज घराण्यातील किसनमहाराज साखरे यांनी अमृतमहोत्सवी सांगता वर्षात ज्ञानेश्वरीच्या हिंदी अनुवादाचा संकल्प सोडला होता. त्यानंतर गेली चार वर्षे दररोज दहा तास काम करून त्यांनी हिंदी अनुवादाचे कार्य नुकतेच पूर्ण केले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी साखरे यांचे ज्ञानेश्वरी प्रसार आणि ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवाद आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

Web Title: Philosophy of Dnyaneshwari in Hindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे