आरक्षण, संरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:43 AM2018-09-10T01:43:08+5:302018-09-10T01:43:26+5:30

संविधानात नमूद नियमानुसार कुठलाही भेदभाव न करता सर्वांकरिता समान न्याय समाजातील सर्वघटकांना मिळावा

Mumar Morcha of Muslim community for reservation, protection | आरक्षण, संरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

आरक्षण, संरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

Next

पुणे : संविधानात नमूद नियमानुसार कुठलाही भेदभाव न करता सर्वांकरिता समान न्याय समाजातील सर्वघटकांना मिळावा, याबरोबरच अल्पसंख्याक म्हणून ओळख असलेल्या मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या निमित्ताने पुन्हा नवीन ओळख मिळावी, यासाठी रविवारी पुण्यात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा काढण्यात आला. अतिशय शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात हा मोर्चा पार पडला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वस्तरातील मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला.
साधारण सकाळी साडेअकरा वाजता कॅम्पमधील गोळीबार मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी दीडच्या सुमारास विधानभवनावर मोर्चाचा समारोप झाला. मूक मोर्चा सेव्हन लव्हज चौकातून उजवीकडे वळून सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, केईएम रुग्णायल, नरपतगिरी चौकातून पुन्हा उजवीकडे वळून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते साधू वासवानी चौक ते विधानभवनासमोर पोचला. सहभागी युवती व मुस्लिम मूक मोर्चा समितीच्या कार्यकर्त्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मुस्लिम तरुणींच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सकाळी सुरुवातीला गोळीबार मैदान येथे मुस्लिम बांधवांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली.
केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपºयातून मुस्लिम बांधव मोर्चाला उपस्थित होते. तरुणांनी विविध मागण्यांचे फलक हाती घेतले होते. मोर्चाकरिता तीन हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले होते. मोर्चामध्ये कुठल्याच घोषणा दिल्या गेल्या नाहीत. मोर्चाच्या नेतृत्वात सर्वांत पुढे मुली, त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण तर सर्वांत शेवटी राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
>खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
मुस्लिम मोर्चादरम्यान सहभागी मुस्लिम बांधवांकरिता पाणी वाटप करण्याकरिता वेगवेगळ्या संघटनांनी पुढाकार घेत सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. यात भारतीय मायनॉरिटिज सुरक्षा महासंघ, दलित सेवा
संघ याशिवाय शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनीदेखील पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले.
>शंभरहून अधिक पक्ष, संघटनांचा पाठिंबा
मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, रिपाइं, बसपा, जनता दल, दलित पँथर यासह शंभरहून अधिक पक्ष व संघटनांनी पाठिंबा देत सहभाग घेतला.
विशेष म्हणजे मोर्चा मार्गावर विविध पक्ष, संघटनांकडून पिण्याची पाण्याची सोय केली होती. मोर्चाच्या सुरुवातीला
शीख समाजाने मुस्लिम
समाजाचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. संत कबीर चौक येथे मराठा
क्रांती मोर्चाचे राजेंद्र कोंढरे यांनीदेखील मोर्चाचे
स्वागत केले.

Web Title: Mumar Morcha of Muslim community for reservation, protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.