'...तर आमची तुम्हाला साथ असेल'; बारामतीत शरद पवारांचा CM शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:35 PM2024-03-02T15:35:34+5:302024-03-02T15:42:53+5:30

तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो असे शरद पवारांनी सांगितले. 

MP Sharad Pawar said that there is a need to create employment, we support the government on this issue | '...तर आमची तुम्हाला साथ असेल'; बारामतीत शरद पवारांचा CM शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

'...तर आमची तुम्हाला साथ असेल'; बारामतीत शरद पवारांचा CM शिंदेंसह राज्य सरकारला शब्द

राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल. रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राज्यात रोजगार निर्माण करण्याची गरज आहे. राजकारण बाजुला राहिले. पण, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी बारामतीमध्ये राज्य सरकारकडून आयोजित नमो महारोजगार मेळाव्यात बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करताना मला आनंद होत आहे. ही संस्था १९७१ साली स्थापन झाली, आज ३० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या संस्थेत शिकतात. रोजगाराच्या संबंधित हा कार्यक्रम आहे. राज्य सरकारांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की, आज रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि राज्य सरकार ते काम करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण- तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकार तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो असे शरद पवारांनी सांगितले. 

आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे. आता विद्या प्रतिष्ठानमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरु होत आहे. राजकारण आपल्या जागी होत असते. पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये या संस्थेतून जी मुलं बाहेर पडली त्या इंजिनियरच्या १५०० मुलांना नोकरी मिळाली आहे. १ लाखांपेक्षा जास्त मुलींना नोकरी मिळाली आहे. अनेक कंपन्यांमध्ये या संस्थेतील मुलं काम करत आहेत. संस्थेमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी वेगळा विभाग सुरु केला आहे. तसेच जगातील पाऊलं ओळखून एआयचा देखील आम्ही वापर सुरु करणार आहोत असं शरद पवार म्हणाले.

'...त्यासाठी आमची तुम्हाला साथ असेल'- शरद पवार

शरद पवार म्हणाले की, राज्य सरकार महत्त्वाची पाऊलं टाकतंय ही समाधानाची गोष्ट आहे. राजकारण बाजुला राहिलं. जिथं नवीन काही करत आहेत. तरुणांना आधार देत आहेत अशी भूमिका असेल तर सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. तीच भूमिका घेऊन आम्ही मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो की, तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे जे कराल त्यासाठी आमची तुम्हाला साथ असेल असेही शरद पवारांनी सांगितले.

Web Title: MP Sharad Pawar said that there is a need to create employment, we support the government on this issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.