Minor child kidnapping for money at yerwada | येरवड्यात कर्जाऊ रकमेसाठी पुतण्याचे अपहरण
येरवड्यात कर्जाऊ रकमेसाठी पुतण्याचे अपहरण

ठळक मुद्देयेरवडा पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची सुटका, तिघांना अटक 

विमाननगर : कर्जाऊ घेतलेली रक्कम परत करत नाहीत या कारणासाठी कर्जदाराच्या अल्पवयीन पुतण्याचे अपहरण करून त्याला पळवून नेल्याची घटना मंगळवारी(दि.१२जुलै) रात्री येरवड्यात घडली आहे. किसन धोंडिबा जाधव (वय ५०, रा. डॉ. आंबेडकर हाउसिंग सोसायटी, येरवडा)यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक असून त्यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशाल दत्तात्रय ढोले(वय २५ रा.सणसवाडी शिक्रापूर), स्वप्नील शांताराम तांबे (वय २५ रा. गणेगाव वरुडे, शिरूर) सचिन बंडू थिटे (रा. सणसवाडी शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,विशाल ढोले यांचा भाऊ निखिल ढोले यांच्याकडून किसन जाधव यांनी दोन लाख रुपये व्यवसायासाठी घेतले होते .या कर्जाऊ रकमेसाठी ढोले यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता . मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास किसन यांचा सतरा वर्षांचा पुतण्या घराबाहेर फिरत असताना त्याला आरोपींनी बोलावून घेतले. एका चारचाकी गाडीत बसवत त्याला पळवून नेले. रात्री उशिरापर्यंत पुतण्या घरी न आल्यामुळे जाधव यांनी याची माहिती येरवडा पोलिसांना दिली .येरवडा पोलिसांनी याप्रकरणी सीडीआर व तपास पथकामार्फत माहिती घेण्यास सुरुवात केली .या तिघांनी सदरच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून टाटा गार्ड रूम येथे त्याला लपवून ठेवले असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार बाळासाहेब बहिरट ,पोलीस हवालदार हरिश्चंद्र मोरे, हनुमंत जाधव यांच्या पथकाने अपहरण केलेल्या बालकाची सुटका केली. तिघाही आरोपींना चारचाकी झेन कार (एमएच ०२ पीए ९५१६) सह ताब्यात घेण्यात आले .अधिक तपासात त्यांनी अल्पवयीन बालकाचे कर्जाऊ रक्कम परत न केल्यामुळे अपहरण केल्याचे कबूल केले. याप्रकरणी येरवडा पोलीस गुन्हयाचा पुढईल तपास करत आहे. 


Web Title: Minor child kidnapping for money at yerwada
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.