माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा १६ नोव्हेंबरला; हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्यास होणार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 07:31 PM2017-11-01T19:31:54+5:302017-11-01T19:35:58+5:30

श्री ज्ञानोबारायांच्या ७२१ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास कार्तिक वैद्य अष्टमीला (दि.११) सकाळी गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Mauli's Sanjeevan Samadhi Divas on 16th November; Stephuban's footsteps will start with the ceremony | माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा १६ नोव्हेंबरला; हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्यास होणार सुरुवात

माऊलींचा संजीवन समाधी दिन सोहळा १६ नोव्हेंबरला; हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्यास होणार सुरुवात

Next
ठळक मुद्देकार्तिकी उत्सव चालणार आठ ते नऊ दिवसचालू वर्षी भाविकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता

शेलपिंपळगाव : ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२१ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदी यात्रेस ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. कार्तिक वैद्य अष्टमीला (दि.११) सकाळी गुरु हैबतबाबांच्या पायरीपूजनाने या सोहळ्यास सुरुवात होणार असून, मुख्य पहाटपूजा १४ नोव्हेंबरला तर माऊलींचा संजीवन सोहळा १६ नोव्हेंबरला पार पडणार आहे.                      
गुरुवारी (दि.९) व शुक्रवारी (दि.१०) कीर्तन, प्रवचन असा दैनंदिन कार्यक्रम मंदिरात होईल. शनिवारी (दि.११) कार्तिक वैद्य अष्टमीला पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या शुभहस्ते सकाळी सात वाजता गुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर योगीराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांच्या वतीने कीर्तन आणि रात्री वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल. 
रविवारी (दि.१२) कार्तिक वैद्य नवमीला बाबासाहेब देहूकर आणि वासकर महाराज यांचे विना मंडपात कीर्तन तर सोमवारी (दि.१३) कार्तिक वैद्य दशमीला गंगुकाका शिरवळकर, धोंडोपंतदादा शिरवळकर, वासकर महाराज यांचे कीर्तन तर रात्री वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (दि. १४) कार्तिकी वैद्य एकादशीला मध्यरात्रीपासून अकरा ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात माउलींच्या संजीवन समाधीवर पवमानपूजा, दुग्धाभिषेक केला जाईल. पहाटपूजेनंतर भाविक झ्र भक्तांच्या महापूजा बंद ठेवण्यात येणार असून समाधी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
त्यानंतर माऊलींची पालखी दुपारी एक वाजता नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. संपूर्ण नगरप्रदक्षिणेनंतर पालखी रात्री आठ वाजता मंदिरात विसावल्यानंतर परंपरेनुसार मंदिर प्रदक्षिणा व त्यानंतर धुपारती घेण्यात येईल. बुधवारी (दि. १५) द्वादशीनिमित्त पहाटे चारच्या सुमारास खेड प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांच्या शुभहस्ते शासकीय पूजा पार पडेल. त्यानंतर साडेचार ते सकाळी साडेअकरापर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. 
दुपारी परंपरेप्रमाणे गोपाळपुरा येथे माऊलींची पालखी सजविलेल्या रथात ठेवून भव्य नगरप्रदक्षिणा होईल. नगरप्रदक्षिणा पूर्ण करून पालखी मंदिरात आल्यानंतर रात्री अकरा वाजता फडकरी, दिंडेकरी, मानकरी यांचा मंदिर देवस्थानच्या वतीने श्रीफळ प्रसादाचा कार्यक्रम होईल. यावेळी हरिभाऊ बडवे आणि केंदूरकर यांच्या वतीने कीर्तन होईल. गुरुवारी (दि.१६) कार्तिक वैद्य त्रयोदशीला पहाटे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते माउलींच्या समाधीवर पवमान अभिषेक व पूजा पार पडल्यानंतर माऊलींच्या मुख्य संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. 
प्रथा-परंपरेनुसार संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या हस्ते माऊलींच्या समाधीची महापूजा होईल. त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत वीणा मंडपात भाविकांच्या उपस्थितीत नामदास महाराज यांचे माऊलींच्या समाधी प्रसंगाचे हरीकीर्तन होईल. दुपारी बारा वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होईल. समाधी दिनाच्या दिवशी गुरुवार असल्याने माउलींची पालखीची मंदिर प्रदक्षिणा होईल. त्यानंतर आरफळकर यांच्या वतीने जागराचा कार्यक्रम होईल. त्यांनतर १८ नोव्हेंबरला रात्री माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणा पूर्ण करेल. छबिना मिरवणुक व फटाक्यांच्या आतषबाजीने कार्तिकी वारी सोहळ्याची सांगता करण्यात येईल.

श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अर्थात कार्तिकी उत्सव आठ ते नऊ दिवस चालणार आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून असंख्य भाविक-भक्तांची मांदियाळी हा आनंददायी सुख सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवण्यासाठी अलंकापुरीत हजेरी लावणार आहे. चालू वर्षी भाविकांच्या उपस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.   

Web Title: Mauli's Sanjeevan Samadhi Divas on 16th November; Stephuban's footsteps will start with the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे