मालगाडी घसरल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द, मुंबई -पुणे रेल्वे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 07:51 PM2017-09-07T19:51:34+5:302017-09-07T19:51:41+5:30

मंकी हिल ते खंडाळादरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने पुणे -मुंबई रेल्वेमार्ग ठप्प झाला असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या कोकण व इगतपुरीमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

Many trains canceled due to collapsing, Mumbai-Pune railway jam | मालगाडी घसरल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द, मुंबई -पुणे रेल्वे ठप्प

मालगाडी घसरल्याने अनेक रेल्वेगाड्या रद्द, मुंबई -पुणे रेल्वे ठप्प

Next

पुणे, दि. 7 - मंकी हिल ते खंडाळादरम्यान मालगाडीचे डबे घसरल्याने पुणे -मुंबई रेल्वेमार्ग ठप्प झाला असून अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या काही गाड्या कोकण व इगतपुरीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. त्यात सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, सह्याद्री एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, लातूर एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्स्प्रेस, शिर्डी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या अपघातामुळे 10 गाड्या रद्द करण्यात आल्या असून 5 गाड्या वाटेत थांबविण्यात आल्या तर 3 गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. 

खंडाळा घाटात गुरुवारी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी मालगाडीचे डबे घसरले. त्यामुळे मुंबईहून येणा-या सर्व गाड्यांवर परिणाम झाला आहे.  मुंबईहून निघालेली सिंहगड एक्सप्रेस कर्जतपासून पुन्हा परत मुंबईला पाठविण्यात आली आहे. मुंबई बिजापूर, साईनगर( 51029) ही शिर्डी फास्ट पॅसेंजर, कोल्हापूर -मुंबई सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. पुण्याहून सायंकाळी मुंबईला रवाना होणारी डेक्कन एक्सप्रेस वाटेतून पुन्हा पुण्यात आणण्यात आली आहे. याशिवाय पुणे -मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मुंबई -हैदराबाद (12701) हुसेनसागर, कोल्हापूर -मुंबई (11024) सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई -सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस (12115) ही गाडी मुंबई -पुणे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. बंगळुरु -मुंबई उद्यान एक्सप्रेस ही गाडी पुण्यात थांबविण्यात आली असून हीच गाडी पुण्यातून सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस म्हणून रवाना करण्यात येत आहे. कोल्हापूर -मुंबई कोयना एक्सप्रेस (11030) ही गाडी पुण्यातच रद्द करण्यात आली असून शुक्रवारी ती तिच्या निर्धारित वेळेत पुण्याहून कोल्हापूरकडे रवाना होईल. इंदूर -पुणे एक्सप्रेस सुरत येथे रद्द करण्यात आली. दादर -म्हैसूर शरावती एक्सप्रेस (11035) रद्द करण्यात आली. बिजापूर, साईनगर -मुंबई ही शिर्डी फास्ट पॅसेंजर पुण्याहून रद्द करण्यात आली आहे. 

अन्य मार्गाने वळविल्या  गाड्या 

लोकमान्य टिळक टर्मिनल -हुबळी ही गाडी पनवेल, मडगाव, वास्को, हुबळी कोकण रेल्वे मार्गावरून वळविण्यात आली आहे. दादर -चिन्नई इगमोर (12163), लोकमान्य टिळक टर्मिनल - मदुराई एक्सप्रेस (11043) आणि भगत की कोटी -बंगळुरु (16507) या गाड्या रोहा, मडगाव, वास्को मार्गे कोकण रेल्वेमार्गे वळविण्यात आल्या आहेत. राजकोट -सिकंदराबाद एक्सप्रेस (17017) ही गाडी कल्याण, इगतपुरी, मनमाड, अकोला यामार्गे वळविण्यात आली आहे. पनवेल -नांदेड (17613), मुंबई -कन्याकुमारी (16381), मुंबई -भुवनेश्वर (11019) कोर्नाक एक्सप्रेस, मुंबई -चिन्नई सेंट्रल (11041) या गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाडमार्गे वळविण्यात आल्या आहेत. निजामउद्दीन -पुणे (12264) ही दुरांतो एक्सप्रेस जळगाव, मनमाड, दौंडमार्गे पुण्यात येणार आहे.

शुक्रवारीची प्रगती, डेक्कन क्वीन रद्द

मुंबईहून गुरुवारी येणा-या प्रगती, डेक्कन क्वीन या रद्द करण्यात आल्याने पुण्याहून शुक्रवारी सकाळी सुटणा-या प्रगती एक्सप्रेस, डेक्कन क्वीन रद्द करण्यात आल्या आहेत़ 

हेल्पलाईन नंबर

या अपघातामुळे गाड्यांविषयी माहिती देण्यासाठी रेल्वेने पुणे रेल्वे स्टेशनवरील हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत.
०२०- २६१०५१३०, २६१०५८९९, २६०५९००२

Web Title: Many trains canceled due to collapsing, Mumbai-Pune railway jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.