भूगाव : जिल्ह्यामध्ये आंब्यांच्या कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. आता चांगल्या थंडीस सुरुवात झाल्यामुळे आणखी मोहोर येण्याची शक्यता आहे. मुळशी तालुक्याच्या पश्चिमेकडील खेचरे - मांदेडे, भादस, कोळवण खोरे आहे. या खोऱ्याची ओळख ‘मुळशीची आमराई’ म्हणून आहे. या भागात पायरी, हापूस, तोतापुरी, रायवळ जातीचे आंबे भरपूर प्रमाणात आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात मोहोर पाहायला मिळतो.
आंब्याची फुले १० ते ४० सेंटिमीटर लांबीच्या गुच्छामध्ये येतात. प्रत्येक फुलाला पाच पाकळ्या असून त्यांची लांबी साधारणपणे ५ ते १० मिलिमीटर एवढी असते. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो.
आंब्यांच्या रोपांची पुरुष-दीड पुरुष वाढ झाल्यानंतर त्यांच्यावर हापूस-पायरीची कलमे केली जातात. साधारण मे महिन्याच्या अखेरीस या खोऱ्यातील आंबा पुण्याच्या बाजारात येतो. कोकणातील हापूसच्याही तोंडात मारेल, अशी मुळशीच्या आमराईतील आंब्यांची चव आहे. बाजारात कोकणच्या आंब्याला पाचशे रुपये डझनाचा भाव मिळत असताना, मुळशीच्या या आंब्यांना फक्त १०० ते १५० रुपये डझनाने होत आहे. त्यातूनही या भागातील शेतकरी लाखो रुपये उत्पन्न मिळवतात.

यावर्षी आंब्यांना मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे. यंदा आंब्यांतून भरपूर नफा मिळेलच, असे दिसते. परंतु मोहोरांवर तुडतुड्याचा थोड्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. यावर कृषी खाते मार्गदर्शन शिबिर आयोजित करते.
- लक्ष्मण गावडे, (प्रसिद्ध आंबा उत्पादक शेतकरी, हुलावळेवाडी)