खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:29 AM2019-01-11T02:29:05+5:302019-01-11T02:29:50+5:30

आधी कामे पूर्ण करण्याची मागणी : फ्री पास देऊन सूट द्या

Local residents also recovered Khed-Shivapur Tollanaak | खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली

खेड-शिवापूर टोलनाक्यावर स्थानिकांकडूनही वसुली

Next

भोर : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम १४ वर्षांपासून संथ गतीने सुरू असून अद्यापही बरीच कामे रखडलेली आहे. असे असतानाही ४० टक्के टोलवाढ करून ४ वर्षांपासून प्रवाशांकडून टोलवसुली सुरू आहे. यात स्थानिकांना सूट असूनही गेल्या १५ दिवसांपासून भोर, वेल्हे या तालुक्यांतील वाहनधारकांकडून टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकांच्या भावना तीव्र असून त्याचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे भोर, वेल्हे हे तालुके टोलवसुलीमधून वगळावेत किंवा टोल फ्री पास द्यावेत. मात्र, याकडे महामार्ग प्रधिकरण व संबंधित कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे खेड-शिवापूर येथील टोलनाका कायमचा हटवावा, अशीही मागणी पुढे येत आहे.

पुणे-सातारा महामार्गाच्या देहू रोड ते सातारा या १४० किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी सन १९९९मध्ये ६० मीटरचे भूसंपादन करण्यात आले. पाच वर्षांनंतर २००४मध्ये चौपदरीकरणाचे काम प्रत्याक्षात सुरू झाले. ते पूर्ण झाल्यावर २०१०मध्ये सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. डीबीएफओटी (डिझाईन बिल्ट फायनान्स आॅपरेट अँड ट्रान्सफर) या तत्त्वावर केंद्र सरकारने रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला सदर कामाचा १ हजार ७२४ कोटी रुपयांचा ठेका दिला. त्याबदल्यात खेड-शिवापूर व आणेवाडी येथील टोलवर २०३४ पर्यंत टोलवसुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या टोलवसुलीतून दर वर्षी महामार्ग प्रधिकरणाला ९० कोटी रुपये प्रिमीयम मिळणार आहे. शिवाय, दर वर्षी यात ५ टक्के वाढ होणार आहे. रस्त्याचे काम मार्च २०१३पर्यंत पूर्ण करण्याची अट घातली होती. मात्र, २०१९ साल उजाडले ५ वर्षे अधिक झाली, तरी काम पूर्ण नाही आणि काम पूर्ण होण्याअगोदरच ४० टक्के टोलवाढ करून त्याची वसुली सुरू आहे. मात्र, ना रस्ता चांगला, ना सुखकर प्रवास; तरीही याचा भुर्दंड विनाकारण वाहनचालकांना बसत आहे.

दरम्यान, भोर, वेल्हे या तालुक्यांच्या लोकसंख्येचा विचार करता खेड-शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हे या तालुक्यांतील फ क्त ३ हजार वाहनधारकांना फ्री पास देण्यात आले आहेत. मात्र, त्यातील काही पास वापरात नसल्याने ते रद्द केले आहेत. यापूर्वी भोर, वेल्हे या तालुक्यांतील लोकल वाहनांना एखादा पुरावा दाखविल्यावर टोलवरून सोडले जात होते. मात्र, मागील १५ दिवसांपासून वाहनांना अडवून मानसिक त्रास देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने टोलवसुली सुरू आहे.
 

Web Title: Local residents also recovered Khed-Shivapur Tollanaak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे