पक्ष्यांच्या अस्तित्वावरच घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 02:21 AM2018-07-23T02:21:17+5:302018-07-23T02:21:45+5:30

मुठा नदीकाठचे अनेक पक्षी झाले गायब

Insert on the existence of birds | पक्ष्यांच्या अस्तित्वावरच घाला

पक्ष्यांच्या अस्तित्वावरच घाला

googlenewsNext

- श्रीकिशन काळे

पुणे : नदीकाठ हे पक्ष्यांसाठी घर असते. हेच घर मानवाकडून नष्ट होत आहे. त्यामुळे शहरातील मुठा नदीकाठचे अनेक पक्षी गायबच झाले आहेत. ते पक्षी नदीकाठी येतच नसल्याने अनेक पक्षी गायब झाले आहेत. या पक्ष्यांचा अधिवास टिकविण्याची गरज निर्माण झाली आहे.

नदीवर पक्ष्यांची अन्नसाखळी आपणाला पाहायला मिळते. जर पाणी चांगले असेल, तर त्यात मासे असतात आणि मासे असतील, तर विविध प्रकारचे पक्षी पाहावयास मिळतात. परंतु, पाणीच चांगले नसेल, तर सर्व अन्नसाखळीच बिघडते. हीच स्थिती सध्या मुठा नदीची झालेली आहे. येथील अन्नसाखळी विस्कळीत झालेली असल्याने अनेक पक्षी या ठिकाणी दुर्मिळ बनले आहेत. नदी काठावर केवळ पाणपक्षी असतात, असे नव्हे तर इतर पक्षीही जीवन जगत असतात.

मुठा नदीकाठी स्थानिक पक्षी वंचक (बिटर) नावाचा बगळ्यासारखा दिसणारा पक्षी जवळपास नाहीसा झाल्यासारखा आहे. तो या ठिकाणी दिसून येत नाही. दहा वर्षांपूर्वी तो अधूनमधून दिसत असे. परंतु, आता दिसत नाही.
कवड्या (पाईड किंगफिशर) या पक्ष्याच्या तीन जाती आहेत. हा देखील कमी होत आहे. सध्या खूप कमी प्रमाणात हा पक्षी पाहायला मिळतो. नदीतील पाणी काळे झाल्याने यांना अन्न मिळणे अवघड झाले आहे. कारण हा स्वच्छ पाण्यात मासे पाहून तो टिपत असतो. परंतु, सध्या नदीचे पाणी प्रचंड घाण आणि काळे बनले आहे की त्यात या पक्ष्याला अन्न शोधता येत नाही. हा पक्षी आपलं घरटं नदी काठातील दलदलीत बनवत असतो. तिथे अंडी घालतो. सध्या नदीकाठाचा भागच खरवडून काढला जातो. त्यामुळे अंडी नष्ट होत आहेत. परिणामी हा पक्षी दुर्मिळ झाला आहे.
टिटवीला नदीकाठचा भाग भुसभुसीत हवा असतो. परंतु, तसा भाग मुठा नदी काठी राहिला नाही. त्यामुळे टिटवी कमी होत आहे. खरं तर आता ही दिसतच नाही. कमलपक्ष्याचेही तेच झाले आहे. हा देखील नाहीसा झाला आहे. चित्रबलाक, पांढऱ्या मानेचा करकोचा आदी पक्षी गायब होत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
स्थलांतरित पक्ष्यांचीही मुठाईकडे पाठ
परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून अनेक पक्षी आपल्याकडे येतात. त्यांना आपण चांगले वातावरण देणे आवश्यक आहे. परंतु, सध्या मुठा नदीकाठी स्थलांतरीत पक्षी येणे बंदच झाले आहे. या पक्ष्यांमध्ये हिरवा तुतारी (ग्रीन सॅँडपायपर), ठिपकेवाला तुतारी (स्पॉटेड सॅँडपायपर), रंगीत पाणलावा (पेंटेंड स्नाईप), तरंग बदक, तलवार बदक, शेंडीवाल्या बदकाचा समावेश
आहे, असे धर्मराज पाटील
यांनी सांगितले. नाईट हेरॉन हा
पक्षी रात्रीच्या वेळी फिरतो. तो ग्रुपने राहतो. त्यांची कॉलनीदेखील अडचणीत आली आहे. अनेक ठिकाणचे त्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. कवडी पाट या ठिकाणी कधीकधी दिसतात.

कमलपक्षी, नीलकमल गायबच
मुठा नदीच्या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी सुमारे शंभरहून अधिक विविध पक्ष्यांची नोंद झालेली आहे. त्यात जमिनीवरील, झाडांवरील, हवेत राहणाºया पक्ष्यांचा समावेश आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये नदीकाठचा आणि नदीतील पाण्याची प्रचंड प्रमाणावर हानी झाली आहे. नदी स्वच्छ राहिली नसून, गटारासारखीच बनली आहे. तसेच काठावरील पक्ष्यांचे अधिवासही नष्ट झालेले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये कमलपक्षी, नीलकमल, हिरवा बगळा, काणूक बदक, लाल बगळा, दलदल ससाणा, तपकिरी पाणकोंबडी हे पक्षी दिसलेच नाहीत.

नदीतील अन्नसाखळीच धोक्यात
खंड्या (किंगफिशर) पक्ष्याचे अन्न मासे असतात. त्याला नदीत मासे मिळाले, तर नदी चांगली आहे आणि नदीतील अन्नसाखळी चांगली समजली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये नदीत कारखान्यांचे रासायनिक टाकाऊ पदार्थ सोडले जात आहेत. तसेच नदीच्या पाण्यात घाण पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीतील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन नदीची परिसंस्था कोलमडून पडली आहे.

नदीसुधार प्रकल्पात अधिवासावर लक्ष हवे
नदीसुधार प्रकल्पात मुठा नदीचा समावेश झालेला आहे. त्यासाठी मोठा निधी मिळाला आहे. या निधीमधून पक्ष्यांचे अधिवास टिकवण्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
कारण एक तर अगोदरच काही अधिवास नष्ट झालेले आहेत. त्यातल्या त्यात विठ्ठलवाडी मंदिराच्या ठिकाणी ‘जीवित नदी’च्या सदस्यांनी हा अधिवास टिकवून ठेवला आहे. अशी ठिकाणे शोधून ती जपले पाहिजेत.
तसेच नवीन ठिकाणी अधिवास तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे धर्मराज पाटील यांनी सांगितले.

Web Title: Insert on the existence of birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे