कच्च्या कैैद्यांना सुटकेची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 02:21 AM2018-04-24T02:21:35+5:302018-04-24T02:21:35+5:30

सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : खितपत पडलेल्या ५ जणांना मोकळी हवा

Hope to be released | कच्च्या कैैद्यांना सुटकेची आशा

कच्च्या कैैद्यांना सुटकेची आशा

Next

पुणे : न्यायालयाने जामीन मंजूर केलाय, निर्दोष मुक्तताही झालीय; पण न्यायालयीन कामकाजाची पूर्तता करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ ७ हजार रुपये नाहीत. असे अनेक कच्चे कैदी कारागृहात खितपत पडले होते. नातेवाईक किंवा मित्रही मदतीसाठी पुढे येत नव्हते. या बंद्यांसाठी रॉयल ग्रूप आशेचा किरण बनून आला आहे. त्यांच्या मदतीने आतापर्यंत अशा ५ कैद्यांची सुटका झाली असून, आणखी १० जणांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू आहे़
एखाद्या गुन्ह्यात एकाला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर त्याची न्यायालयीन कोठडीत तुरुंगात रवानगी होते़ किरकोळ गुन्हे असतील, तर अशा कैद्यांना जामिनावर सोडावे, अशा उच्च न्यायालयाच्या सूचना आहेत़ कारागृहातील कच्च्या कैद्यांची संख्या वाढल्याने याबाबत न्यायालयानेही चिंता व्यक्त केली होती़ अशा कैद्यांची सुटका व्हावी, यासाठी आता स्वयंसेवी संस्था पुढे आली आहे़
रॉयल ग्रुप आॅफ कंपनीचे प्रफुल्ल कोठारी यांनी सांगितले, की कारागृह विभागाचे प्रमुख भूषणकुमार उपाध्याय यांची एकदा भेट घेतली. त्यांनी, ज्यांचा जामीन झाला; परंतु न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अजूनही कारागृहात खिचपत पडले आहेत अशा कच्च्या कैद्यांना मदतीसाठी एखादी स्वयंसेवी संस्था शोधत असल्याचे सांगितले़ आमची संस्था याबाबत पुढाकार घेईल, असे सांगून हे काम हाती घेतले़ त्यांनी ज्यांचा जामीन झाला आहे, अशा ५० कच्च्या कैद्यांची यादीच दिली़ सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र जोशी यांच्या मदतीने पाठपुरावा सुरू केला़ न्यायालयीन बाजू पूर्ण करण्यासाठी चार वकिलांची नेमणूक केली़ त्यातूनच ४ फेब्रुवारीला या कामाला सुरुवात झाली़ राजेंद्र सुनसुने याला अवैध दारू बाळगल्याबद्दल २ फेब्रुवारी २०१६ रोजी कारागृहात ठेवण्यात आले होते़ तो २८ मार्च २०१८ पर्यंत कारागृहात होता. त्याच्या खटल्याचा निकाल लागला असता तर त्याला ३ ते ४ महिन्यांची शिक्षा झाली असती़ परंतु, त्याचे कोणीही नातेवाईक केवळ ७ हजार रुपये भरण्यासाठी पुढे न आल्याने तो जवळपास २ वर्षे कारागृहात होता़
चोरीप्रकरणात फरासखाना पोलिसांनी अटक केलेल्या जितू शहदानपुरी याचीही नुकतीच कारागृहातून सुटका करण्यात आली़ अशाच प्रकारे दोन जणांना लोकअदालतीमध्ये सोडण्यात आले आहे़ तर, काही जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़ परंतु, न्यायालयीन प्रक्रिया आणि त्याची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्याने ते कारागृहात अनेक महिने पडून होते़ अशा ५ जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली आहे़
जितू शहदानपुरी म्हणाले, ‘‘रॉयल ग्रुपने मदत केली नसती, तर अजून बाहेर येऊ शकलो नसतो़ ते माझ्या दृष्टीने देवासारखे धावून आले़’’

राज्यभरात २१ हजार ४४८ कच्चे कै दी
राज्यभरामधील कारागृहातील २१ हजार ४४८ कच्चे कैदी आहेत़ त्यातील ३ हजार ४१२ जणांना ३ वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेले आहेत़ ३ हजार ९०० कैद्यांना ३ ते ७ वर्षे शिक्षा झाली आहे़ राज्यातील ४३३ कच्चे कैदी असे आहेत, की त्यांच्या जामिनाची रक्कम ते अथवा त्यांचे नातेवाईक भरू शकत नाहीत़ त्यांच्या सुटकेसाठी कारागृह प्रशासनाकडून आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत़

Web Title: Hope to be released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा