त्यांनी ८२ व्या वर्षी नृत्यमुद्रा करून जिंकली मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:43 AM2018-12-17T01:43:09+5:302018-12-17T01:43:29+5:30

पं. बिरजू महाराजांना रसिकांची उभे राहून मानवंदना

He won by winning the dance drama at 82 years | त्यांनी ८२ व्या वर्षी नृत्यमुद्रा करून जिंकली मने

त्यांनी ८२ व्या वर्षी नृत्यमुद्रा करून जिंकली मने

Next

पुणे : ज्येष्ठ कथ्थक कलाकार पं. बिरजू महाराज यांचे पंधरा वर्षांनंतर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या मंचावर पाऊल पडले अन् रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उभे राहून मानवंदना दिली... माझ्या शिष्यांनी नृत्य सादर केले तरी नाचलो शेवटी 'मीच', अशी भावना त्यांनी व्यक्त करताच 'वाह' असे शब्द रसिकांच्या ओठी उमटले... वयाच्या ८२ व्या वर्षी शरीर थकले तरी नृत्य सादर करण्याची ऊर्मी कायम आहे याची प्रचिती त्यांनी रसिकांना दिली. बैठकीच्या नृत्याद्वारे देहबोली आणि डोळ्यांतील उत्कट भावातून त्यांनी नृत्यरचना सादर करीत सर्वांनाच थक्क केले.

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या शेवटच्या दिवशीचा उत्तरार्ध या ‘चिरतरुण’ कलाकाराच्या आविष्काराने अविस्मरणीय केला. बिरजू महाराजांनंतर शाश्वती सेन आणि पंडित बिरजू महाराज यांची नात रागिनी यांच्या उत्कृष्ट पदलालित्याने रसिकांना खिळवून ठेवले. महोत्सवाच्या दुसऱ्या सत्राचा प्रारंभ मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग पूर्वी सादर केला. भक्तिरसातील काही स्वरचित रचना त्यांनी प्रस्तुत केल्या. त्यांनी राग शुद्ध बराडीदेखील सादर केला. संत तुकारामांचा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल हा अभंग स्वरचित चालीत सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अश्विनी मिसाळ (तानपुरा), धनंजय म्हसकर व बिलिना पात्रा (गायनसाथ), अपूर्व द्रविड (टाळ) यांनी साथसंगत
केली. सुरुवातीलाच २५ वर्षांपूर्वी या महोत्सवात आलो होतो जरा उशीरच झाला आहे. महोत्सवाला आलेले सर्व रसिक चांगले आहेत, अशा मराठमोळ्या भाषेत प्रसिद्ध सतारवादक प्रतीक चौधरी यांनी संवाद साधत रसिकांची मने जिंकली. हनुमंत हा सव्वापाच मात्रेचा ‘धिंना धिना तिना तीन’ नवा ताल त्यांनी निर्मित केला आहे. रसिकांना या मात्रेमध्ये समवर कसे यायचे याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखविले. मिया तानसेन घराण्यापासून चालत आलेल्या १७ तारांच्या पारंपरिक सतारीचे धृपद गायकीच्या अंगाने सादरीकरण करून त्यांनी रसिकांना एक अद्वितीय अनुभूती दिली. सतार आणि तबला यांची अनोखी जुगलबंदी रसिकांनी अनुभवली. ६६व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांच्या अभिजात गायकीने झाला. जयजयवंती रागाची प्रस्तुती त्यांनी केली.

बिरजू महाराजांनी गायले पंडितजींचे भजन
आज पंडितजींची खूप आठवण येत आहे.. कुछ गाकर सुनाओ असे मला पंडितजी नेहमी म्हणायचे; पण गाणं तुम्हालाच शोभते असे मी पंडितजीना म्हणालो असता ‘तूही चांगलं गातोस’ अशी पावती दिली असल्याची आठवण पं. बिरजू महाराज यांनी सांगितली. ‘जाने दो मैको’ ही ठुमरी आणि ‘बोलत नंदकिशोर’ ही रचना त्यांनी बैठकीच्या नृत्याद्वारे सादर केली. पंडितजींची आवडते ‘तूच कर्ता आणि करविता, शरण तुला भगवंता’ हे भजन स्वत: बिरजू महाराजांनी गायले. त्यांच्या या गायनाला उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली.
 

Web Title: He won by winning the dance drama at 82 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे