लष्करात अधिकारी असल्याचे खोटे पुरावे दिले; भरती करण्याचे सांगून तरुणांकडून ६० लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 04:49 PM2021-06-21T16:49:22+5:302021-06-21T16:49:29+5:30
बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईची फसवणूक करुन केले लग्न, पत्नीच्या भावालाही घातला गंडा
पुणे: लष्करात अधिकारी असल्याचे बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईला फसवून लग्न केले. पत्नीच्या भावाला लष्करात भरती करतो, असे सांगून २ लाख रुपयांना लुबाडले. तसेच त्यांच्या गावाकडील तरुणांना बनावट भरतीचे पत्र देऊन ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी योगेश दत्तु गायकवाड (रा. किशोरे, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आळंदी येथील एका २१ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडीत जानेवारी २०२० मध्ये घडला होता.
महिलेच्या आईला रक्तदाब व मधुमेहाचा आजार असल्याने त्यांना बिबवेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या होत्या. प्राथमिक उपचार करुन त्या हॉस्पिटलसमोर रिक्षाची वाट पहात होत्या. त्यावेळी योगेश गायकवाड तेथून जात असताना त्याच्या पँटच्या खिशातून आधार कार्ड पडले. ते महिलेने पाहिल्यावर ते देण्यासाठी त्यांनी आवाज दिला. गायकवाड याने त्यांच्याशी जवळीक साधून लष्करात अधिकारी असल्याचे सांगितले. लष्कराच्या गणवेशातील फोटो, बनावट आयकार्ड दाखवून महिला आणि यांच्या आईवडिलांचा विश्वास संपादन केला.
२१ वर्षीय महिलेशी खोटे बोलून लग्न केले. त्यानंतर त्याने महिलेला लष्करात मोठी भरती निघाल्याचे सांगितले. मुले भरण्यासाठी महिलेच्या वडिलांकडून त्यांच्या भावास भरती करण्यासाठी २ लाख रुपये घेतले. तसेच त्यांच्या गावातील व बाहेरील गावातील मुलांचा विश्वास संपादन करुन त्यांना लष्करामध्ये भरती करुन देतो, असे सांगून त्यांच्याकडून ५० ते ६० लाख रुपये घेतले. त्यांना लष्करात भरती झाल्याबाबत बनावट भरती पत्र देऊन त्यांची फसवणूक केली़.
आरोपीविरुद्ध अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे फसवणूक केल्याचा गुन्हा २०१९ मध्ये दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. उसगांवकर यांनी सांगितले की, आरोपीने फसवणूक केल्याचे फिर्यादीसह १० जणांच्या तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. आरोपींने त्यांच्यापैकी काही जणांकडून १ ते ३ लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले आहेत. आरोपीने जवळपास ५० ते ६० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारदारांनी सांगितले आहे.