गणेश कला क्रिडा मंच ऐन हंगामात बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 02:32 PM2018-04-14T14:32:02+5:302018-04-14T14:32:02+5:30

सभागृह बंद का आहे याबाबत महापालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापन विभागात चौकशी केली असता तिथे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Ganesh kala krida manch closed in season | गणेश कला क्रिडा मंच ऐन हंगामात बंद 

गणेश कला क्रिडा मंच ऐन हंगामात बंद 

Next
ठळक मुद्देगणेश कला क्रिडा मंच सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव तसेच अंदाजपत्रकात तरतुद

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या मालकीचे एकमेव असलेले गणेश कला क्रिडा मंच हे विविध कार्यक्रमांसाठीचे सभागृह महापालिकेने बंद ठेवले आहे. संपुर्ण नुतनीकरणाची गरज असताना तिथे किरकोळ कामे केली जात आहेत. त्याचेही नियोजन नसल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात सभागृह बंद असल्याने जाहीर कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या संस्था, संघटनांची अडचण होत आहे. मात्र, त्यांच्या मागणीकडे महापालिका लक्ष द्यायला तयार नाही.
व्यावसायिक नाट्यप्रयोगांसाठीची अनेक नाट्यगृहे शहरात आहेत. मात्र शाळा तसेच संस्था, संघटना यांना लागणारे मोठे सभागृह शहरात नव्हते. तसेच ही मोठी सभागृहे कायमच बूक असल्याने, त्याचे भाडे जास्त असल्याने संस्था, संघटना यांना परवडतही नाही. त्यासाठीच महापालिकेने गणेश कला क्रिडा मंच तयार केले आहे. आता या मुळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
माजी आमदार मोहन जोशी या सभागृहाच्या दुरावस्थेकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधत असतात. हे मध्यवर्ती सभागृह संपुर्ण वातानुकूलित करावे अशी मागणी त्यांनी नुकतीच आयुक्तांकडे केली आहे. सध्या या सभागृहात वॉटर कुलींग यंत्रणा आहे. त्याचा आवाज होऊन सुरू असलेल्या कार्यक्रमांचा रसभंग होतो. यंत्रणा बंद ठेवली तर उष्मा वाढतो. अशा स्थितीत महापालिकेने सभागृह वातानुकुलित करावे असे जोशी यांनी सुचवले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने काही वर्षांपूर्वी तसा ठराव केला. मात्र, प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही असे जोशी यांचे म्हणणे आहे. तसे त्यांनी आयुक्तांना कळवले आहे.
सभागृह बंद का आहे याबाबत महापालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापन विभागात चौकशी केली असता तिथे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सभागृहातील आसने खराब झाली आहे. त्यांची रचना जुनी आहेत. तिथे नव्या आधुनिक रचनेची करण्याची गरज आहे. फ्लोअरिंग जुने झाले आहे. स्वच्छतागृहाची अवस्था वाईट आहे. त्यांची संख्या वाढवण्याची व सुधारणा करण्याची गरज आहे. ही कामे सोडून तिथे अत्यंत किरकोळ कामे सुरू आहेत व त्यासाठी म्हणून सभागृह बंद ठेवण्यात आले आहे. 
जोशी यांनी सांगितले, शहराच्या मध्यवर्ती भागात हे एकमेव सभागृह आहे. त्यामुळे त्याचा वापर शाळांच्या स्नेहसंमेलनांसाठी, विविध संस्था, संघटनांच्या सांस्कृितक कार्यक्रमांसाठी होत असतो.

.......................................

गणेश कला क्रिडा मंच सभागृहाच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. तसेच अंदाजपत्रकात तरतुद केली आहे. त्यानुसार कामे करण्यात येतात. सध्या रंगमंचावर करावी लागणारी काही आवश्यक कामे केली जात आहेत. त्यामुळे सभागृह बंद ठेवण्यात आले आहे. आणखी काही दिवसांनी ते सुरू करण्यात येईल. नुतनीकरणाच्या प्रस्तावात सगळ्या बदलांची माहिती दिली आहे. तो प्रस्ताव मान्य होऊन अपेक्षित तरतुद करण्याती आली तर नुतनीकरणही करण्यात येईल असे अमराळे यांनी सांगितले. प्रकाश अमराळे, महापालिका नाट्यगृह व्यवस्थापन विभागाचे प्रमुख

Web Title: Ganesh kala krida manch closed in season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.