नगरसेवक, अधिकाऱ्यांचीही ‘फाइव्ह स्टार ट्रीटमेंट’ बंद! पालिकेच्या दवाखान्यातच घ्यावे लागणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 01:01 PM2024-03-14T13:01:15+5:302024-03-14T13:01:34+5:30

‘काॅम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ स्कीम’ अर्थात ‘सीएचएस’ या याेजनेद्वारे सध्या आजी-माजी नगरसेवक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व प्रकारचे उपचार महापालिकेशी संलग्न खासगी रुग्णालयांत केले जातात...

'Five star treatment' of corporators, officials too! Treatment should be taken in the municipal hospital | नगरसेवक, अधिकाऱ्यांचीही ‘फाइव्ह स्टार ट्रीटमेंट’ बंद! पालिकेच्या दवाखान्यातच घ्यावे लागणार उपचार

नगरसेवक, अधिकाऱ्यांचीही ‘फाइव्ह स्टार ट्रीटमेंट’ बंद! पालिकेच्या दवाखान्यातच घ्यावे लागणार उपचार

पुणे :पुणे महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आजवर सर्व प्रकारचे उपचार पंचतारांकित खासगी हाॅस्पिटलमध्ये माेफत केले गेले. त्यासाठी दरवर्षी काेट्यवधी रुपयांची तरतूद देखील केली गेली. यापुढे अशा प्रकारांवर निर्बंध येणार असून, उपचारासाठी थेट खासगी रुग्णालयात न जाता आधी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागणार आहेत. तेथे उपचार हाेऊ शकत नसतील तरच त्यांना खासगी रुग्णालयांची चिठ्ठी दिली जाणार आहे.

‘काॅम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ स्कीम’ अर्थात ‘सीएचएस’ या याेजनेद्वारे सध्या आजी-माजी नगरसेवक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सर्व प्रकारचे उपचार महापालिकेशी संलग्न खासगी रुग्णालयांत केले जातात. त्यासाठी दरवर्षी काही काेटी रुपयांची तरतूद महापालिका करते. दुसरीकडे महापालिकेच्या आराेग्य सेवा सक्षम नाहीत. कमला नेहरू हाॅस्पिटल वगळता इतर काेणतेही माेठे हाॅस्पिटल नाही, जेथे किरकाेळ शस्त्रक्रिया हाेऊ शकतील. त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांना या महापालिकेच्या रुग्णालयांत प्राथमिक उपचार घ्यावे लागतात आणि माेठ्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांना लाखाे रुपये स्वत:च्या खिशातून द्यावे लागतात.

आजी-माजी नगरसेवक, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मात्र खासगी रुग्णालये सज्ज असतात. मग, कमला नेहरू हाॅस्पिटलमध्ये काही स्पेशालिटी उपचार जसे- अस्थिराेग शस्त्रक्रिया, प्रसूती, डाेळ्यांचे उपचार व इतरही उपचार हाेतात; तसेच पीपीपी तत्त्वावरील कॅथलॅबमध्येही अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया हाेतात; परंतु तेथे अधिकारी किंवा नगरसेवक जातच नाहीत. कारण, खासगीत सर्व माेफत सुविधा असतात. यावरून महापालिकेचे नगरसेवक, अधिकारी यांना महापालिकेच्या आराेग्य सेवांवर भरवसा नसल्याचे अधाेरेखित हाेते.

एकीकडे सर्वसामान्यांना धड प्राथमिक उपचार, पुरेसी औषधे मिळत नाहीत. दुसरीकडे ‘सीएचएस’मध्ये खासगीत हवे ते उपचार मिळतात. ही परस्परविराेधी परिस्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वास्तव काय?

महापालिकेने एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान ‘सीएचएस’ स्कीमसाठी ११४ काेटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये शहरी गरीब याेजनेतील १४ हजार शहरी गरीब याेजनेतील कुटुंबेही आहेत. शहरी गरीब याेजनेअंतर्गत एकूण बिलाच्या अर्धी रक्कम व त्याचे एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतचे उपचार दिले जातात. आजी-माजी नगरसेवक, अधिकारी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी मात्र एकूण बिलाच्या दहा टक्के रक्कम भरावी लागते.

Web Title: 'Five star treatment' of corporators, officials too! Treatment should be taken in the municipal hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.