वैरणीचे घटले प्रमाण, नगदी पिकांमुळे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:46 AM2018-12-17T01:46:11+5:302018-12-17T01:46:35+5:30

नगदी पिकांमुळे परिणाम : खरीब, रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र घटले

The fall in fodder, the result of cash crops | वैरणीचे घटले प्रमाण, नगदी पिकांमुळे परिणाम

वैरणीचे घटले प्रमाण, नगदी पिकांमुळे परिणाम

Next

पुणे : शेतकऱ्यांकडून अधिकाधिक नगदी पिकांचे उत्पादन घेतले जात असल्याने वैरणपिकांच्या क्षेत्रात घट होत आहे. त्यामुळे वैरणक्षेत्रात वाढ करून वैरणीचे उत्पादन वाढविणे, कडबाकुट्टी यंत्राचा वापर करणे, पावसाळ्यात वैरणीचे अतिरिक्त उत्पादन करून मूरघास स्वरूपात साठवण करणे आणि अपारंपरिक वैरणीचा वापर करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

राज्यातील लागवडयोग्य क्षेत्राचे निवासी क्षेत्रामध्ये रुपांतर होत असल्याने पेरणीक्षेत्र कमी होत आहे. त्याचप्रमाणे शेतकºयांचा कापूस, ऊस, फळझाडे व तेलबिया आदी नगदी पिकांच्या लागवडीकडे कल वाढत चालला आहे. त्यातील काही नगदी पिकांचा वैरणीसाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या आर्थिक पाहणीनुसार राज्यातील प्रमुख पिकांच्या पेरणीक्षेत्रात बदल होत आहे. त्यात खरीप ज्वारीमध्ये १५ टक्क्यांनी घट झाली असून खरीप बाजरीत १९ टक्क्यांनी, मका उत्पादनात ५ टक्क्यांनी, तर रब्बी ज्वारीमध्ये २१ टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच गव्हाच्या उत्पादनात ३९ टक्क्यांनी घट झाली असून सोयाबीन पिकाच्या उत्पादनात १२ टक्क्यांनी, कापसात ५ टक्क्यांनी आणि उसाच्या उत्पादनात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कडबाकुट्टीचा वापर केल्यास वैरणीची ३० टक्के बचत होऊ शकते. परंतु, कडबाकुट्टीचा वापर न करता तशीच वैरण जनावरांना टाकली जाते. परिणामी जनावरांच्या शेणमूत्रामुळे वैरण खराब होते. त्यामुळे वैरण पिकांचे उत्पादन वाढवून आणि अधिकाधिक वैरणीची योग्य प्रकारे साठवणूक करून दिवसेंदिवस होत असणारी वैरणीची तूट भरून काढावी लागणार आहे. त्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी केले आहे.

शेतात उत्पादित होणारा भाजीपाला, फळे आदी विक्रीसाठी शहरात जात असल्यामुळे त्यांचा टाकाऊ भाग वैरण म्हणून उपयोगात न येता शहराच्या कचरा कुंडीत जमा होत आहे. तसेच गावातील सामायिक जमीन, गायरान, देवराई आदीमध्ये अतिक्रमण वाढले आहे. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आगीमुळे गवताच्या व कडब्यांच्या गंज्यांना आग लागून नुकसान होत आहे.
 

Web Title: The fall in fodder, the result of cash crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे