ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 20 -  महिलांच्या सक्षमीकरणाच्या चळवळीचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ बनलेल्या लोकमत माध्यम समूहाने आयोजिलेल्या ‘लोकमत वुमेन समिट’चे भव्य दिव्य उद्घाटनसोहळा सोमवारी पार पडला. यावेळी 'प्रत्येक मुलीने धाकड व्हावे', असं आवाहन कुस्तीपटू गीता फोगट यांनी केलं.  'सध्याच्या काळात प्रत्येक मुलीने 'धाकड' असण्याची गरज आहे.  मुली दुबळ्या नसतात. त्यांनी स्वतःला तसे मानण्याची गरज नाही. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुलींनी मानसिकदृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे', असे आवाहन कुस्तीपटू गीता फोगट यांनी केलं.
 
समाजाची मुलींकडे पाहण्याची दृष्टी आणि मानसिकता हळूहळू बदलत आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मुलींनीच देशाची शान राखली. आम्ही मुली आहोत, म्हणून मुलांपेक्षा कमी आहोत असा विचार न करता आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांकडूनही पाठिंबा मिळायला हवा, असंही त्यांनी यावेळी सांगितले. 
 
'दंगल' चित्रपटाने आम्हाला वेगळी ओळख दिली. वडिलांनी लहानपणापासून आम्हाला मुलांप्रमाणेच वागवले आणि वाढवले. कुस्तीचे प्रशिक्षण घेत असताना मुली म्हणून कोणतीही सूट दिली नाही. आईने नेहमी आमच्या आहाराची काळजी घेतली. चारही बहिणींमध्ये आत्मविश्वास आणि खंबीरपणा रुजवण्यात पालकांचा मोठा वाटा आहे. बरेचदा आई आणि वडिलांचे मुलांना घडवण्याचे विचार वेगवेगळे असतात. दोघांनी एकाच दिशेने प्रयत्न केले तर उज्ज्वल भविष्य घडवता येऊ शकते. 'दंगल' नंतर अनेक पालक मुलींना कुस्तीमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. हरियाणामध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे. यानिमित्ताने हा जन्मदर वाढल्यास ती खूप मोठी अचिव्हमेंट असेल, अशी भावना यावेळी गीता फोगट यांनी व्यक्त केली.  
 
दरम्यान, या उद्घाटन सोहळ्यावेळी लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा, राजेश्वरी चंद्रशेखर, युनिसेफच्या अ‍ॅडव्होकसी व कम्युनिकेशनप्रमुख अलेक्झांड्रा वेस्टरबिक, कुस्तीपटू गीता फोगट,  व्हीयू टेक्नॉलॉजीजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डिझाईन प्रमुख देविता सराफ, यूएसके फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे, सानिया सेठ, हिता अजमेरा, राजकीय समालोचक नीरजा चौधरी, विजय बाविस्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.