डेल्टा सिरॅमिक संशोधनातून नवसंजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 02:24 AM2017-07-24T02:24:14+5:302017-07-24T02:24:14+5:30

गुडघ्याचा नवीन सांधा बसवल्यानंतर काही काळाने झीज होऊन तो बदलावा लागतो. डेल्टा सिरॅमिक, मेटलमध्ये संशोधन सुरू असून, ते यशस्वी

Delta Ceramic Research Negotiations | डेल्टा सिरॅमिक संशोधनातून नवसंजीवनी

डेल्टा सिरॅमिक संशोधनातून नवसंजीवनी

Next

गुडघ्याचा नवीन सांधा बसवल्यानंतर काही काळाने झीज होऊन तो बदलावा लागतो. डेल्टा सिरॅमिक, मेटलमध्ये संशोधन सुरू असून, ते यशस्वी झाल्यास एकदा बसवलेला सांधा ४० वर्षे वापरता येईल. बरेचदा रुग्ण इंटरनेटच्या साह्याने व्याधी आणि उपचार याबाबत माहिती मिळवतात. परंतु, एकाच वेळी २-३ व्याधी असल्यास डॉक्टर एकत्रित विचार करून उपचार करू शकतात. इंटरनेट ते काम करू शकत नाही, असे मत ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांनी वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

माझा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. वडील किराणामालाचे दुकान चालवत असत. मी अभ्यासातही हुशार नव्हतो. दहावीला कमी गुण मिळाले होते. त्यानंतर मात्र करिअरकडे गांभीर्याने पाहायचे ठरवले. आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने प्रवास सुसह्य झाला आहे. आजपर्यंत ५१ वर्षे रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे. वयाच्या ८२व्या वर्षीही रुग्णसेवेचे व्रत अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे.
कोणत्याही कारणाने गुडघ्याचे सांधे खराब झाले की ते बदलणे ही खर्चिक बाब असते. परदेशी तंत्रज्ञानाच्या साह्याने सांधे बदलासाठी १ लाख रुपयाच्या दरम्यान खर्च येतो. या तुलनेत भारतीय बनावटीचा सांधा बसवण्याचा खर्च केवळ २५-३० हजार रुपये असतो. सांधा-बदलाबाबत मी केलेल्या संशोधनाला २००५ मध्ये पेटंट मिळाले. आजवर मी २० हजार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पूर्वी शस्त्रक्रिया करून नवा सांधा बसवल्यानंतर तो वाकत नसे. आता अद्ययावत तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया सुलभ झाली आहे. रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रमाण गेल्या २ वर्षांमध्ये वाढले आहे. यामध्ये सांध्याचा सिटी स्कॅन केला जातो. सॉफ्टवेअरच्या आधारे हाड किती कापायचे अथवा घासायचे, हे रोबोटद्वारे ठरवून अत्यंत सुलभ शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाच्या वेदना कमी होऊन त्याला २ दिवसांमध्ये घरी जाता येते.
पूर्वी लहान-मोठा अपघात झाल्यानंतर प्लास्टर घालून उपचार करता येणे शक्य होते. आता भरधाव वाहनांनी धडक दिल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गंभीर अपघातामुळे ४-५ हाडे मोडतात. अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसतो. अद्ययावत उपकरणांमुळे शस्त्रक्रिया सोपी झाली आहे. सांधेरोपण आणि हाडे बसवण्याच्या शस्त्रक्रियांमध्ये खूप प्रगती झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यावर एक-दोन दिवसांत रुग्णाला घरी जाता येते, त्याच्या प्रकृतीतही झपाट्याने सुधारणा होते. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनाही तंत्रज्ञानामुळे कमी झाल्या आहेत. सध्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.
भारतात गुडघ्यांच्या विकारांचे प्रमाण खूप जास्त आहे. हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये जास्त आहे. कमी चालणे, उन्हात न जाणे यामुळे माझ्याकडे येणाऱ्या एकाआड एक रुग्णांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते. ३० वरून हे प्रमाण १०-१२ पर्यंत घटले आहे. हाडांचे दुखणे लोक गांभीर्याने घेत नाहीत, नियमित व्यायाम, सकस आहार ही आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. केवळ चालण्याचा व्यायाम करून सुदृढ राहता येत नाही. स्नायूंच्या विकासासाठी सूर्यनमस्कार हा जगातील सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळे सर्वांनी व्यायामावर भर द्यायला हवा. बरेचदा हाडांचे दुखणे अंगावर काढले जाते. दुर्लक्ष केल्याने काही कालावधीने मोठे दुखणे उद्भवते. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत.
कंझ्युमर प्रोटेक्शन अ‍ॅक्टमुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील भावनिक नाते कमी झाले आहे. डॉक्टर खूप व्यस्त असल्यामुळे त्यांना रुग्णांशी संवाद साधता येत नाही. डॉक्टर आपल्याकडून पैसा उकळतात, अशी भावना रुग्णांमध्ये वाढीस लागते. एखाद्या डॉक्टरचे मत न पटल्यास सेकंड ओपिनियन घेण्यास प्राधान्य दिले जाते. या सर्व प्रक्रियेमध्ये डॉक्टर आणि रुग्णांमध्ये संवादाचा पूल निर्माण व्हावा. वैद्यकीय शिक्षण घेत असताना खूप पैसा खर्च होत असल्याने प्रत्यक्ष प्रॅक्टिसला सुरुवात केल्यावर डॉक्टर व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारतात. व्यावसायिक व्हायला हरकत नाही, मात्र, रुग्णांशी प्रामाणिक राहणेही गरजेचे आहे. त्यासाठी प्रेम, आस्था निर्माण व्हायला हवी. आत्मचरित्र लिहिण्याचा विचार असल्याचेही संचेती म्हणाले.

Web Title: Delta Ceramic Research Negotiations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.