पुणे : साऊंड, लाइट, जनरेटर्स ही सेवा पुरविणाºया व्यावसायिकांनी पुकारलेला बंद प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर मागे घेतल्यामुळे आता दहीहंडीसह गणेशोत्सवात लाऊडस्पीकरचा आवाज घुमणार आहे. ४ बेस आणि ४ टॉप स्पीकर लावण्याची मुभा दिल्यानंतर, संप मागे घेण्यात आल्याचे साऊंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.
डीजे लावण्यासंदर्भात प्रशासनाचे नियम स्पष्ट नसून शहराच्या विविध भागात वेगवेगळे नियम लावले जात आहेत. त्यामुळे डीजेचालकांना पोलिसांकडून नाहक त्रास होत आहे. पोलिसांकडून होणारी मारहाण, क्षुल्लक कारणावरून साऊंड सिस्टिम जप्तच्या कारवाईच्या निषेधार्थ ११ आॅगस्टपासून हा संप पुकारण्यात आल्याचे साऊंड अँड इलेक्ट्रिक्लस जनरेटर्स असोसिएशनने स्पष्ट केले. या संपास पुणे शहरातील सर्व साऊंड, लाइट आणि जनरेटर मालकांनी, तसेच मुंबईतील पाला या संघटनेनेदेखील पाठिंबा दर्शविला होता. व्यावसायिकांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही मंडळांना दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी स्पीकर पुरवण्यात येणार नाहीत, अशी भूमिका असोसिएशनने घेतली; शिवाय शहरातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांनाही स्पीकर पुरवण्यात येणार नाहीत, असा पवित्रा संघटनेने घेतल्याने शुक्रवारी पुण्यात आयोजित कार्यक्रमांच्या संयोजकांची तारांबळ उडाली. शनिवारी पोलीस प्रशासन आणि साऊंड व्यावसायिकांमध्ये बैठक पार पडली. बैठकीत अनेक तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाली.

पोलीस प्रशासन आणि साऊंड व्यावसायिक यांच्यामध्ये चचेर्तून तोडगा निघाल्याने दहीहंडी आणि गणेशोत्सवात स्पीकरचा आवाज पुन्हा एकदा घुमणार आहे. संप मागे घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण पसरले आहे. परंतू, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी किंवा साऊंड व्यावसायिकांनी कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद पोलिसांकडून देण्यात आली आहे