‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 09:05 PM2017-09-07T21:05:52+5:302017-09-08T11:28:15+5:30

पुरोगामी पुण्यात जातीअंताच्या लढाईची चळवळ सुरू असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime against a cook for 'Sawale breaks', shocking type of progressive Pune | ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा, पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext

लक्ष्मण मोरे
पुणे, दि. 7 - पुरोगामी पुण्यात जातीअंताच्या लढाईची चळवळ सुरू असताना घरकामासाठी आलेल्या बाईवर जात लपवून ‘सोवळे मोडले’ म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे हवामान विभागाच्या माजी संचालिका असलेल्या डॉ. मेधा खोले यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

डॉ.  खोले यांच्या घरी दरवर्षी गौरी गणपती बसतात. घरी आई-वडिलांचे श्राद्ध विधीही असतात. त्यासाठी त्यांना  ‘सोवळ्यातील’ स्वयंपाक करणारी सुवासिनी असलेली ब्राह्मण स्त्री हवी होती. 2016 मध्ये मे महिन्यात त्यांच्याकडे निर्मला कुलकर्णी नावाची एक स्त्री आली होती. देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते असे सांगितले होते. तिच्या माहितीवरुन खोले यांनी प्रत्यक्ष धायरी येथील तिच्या घरी जाऊन चौकशी करून त्या ब्राह्मण आहेत की नाही याची खात्री केली. त्यानंतर लगेचच निर्मला यांना घरच्या धार्मिक कार्याच्या स्वयंपाकासाठी बोलावले.

मे 2016 मध्ये वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी तसेच सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी तसेच 2017 मध्ये वडीलांच्या श्राद्धासह गौरी गणपती आणि आईच्या श्राद्धाच्यावेळी सोवळ्यातील नैवेद्याचा स्वयंपाक केला होता. दोन वर्षात त्यांनी एकूण सहा वेळा स्वयंपाक केला. बुधवारी निर्मला या ब्राह्मण नसून मराठा असल्याचे खोले यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितले. याबाबत खोले यांनी पुन्हा निर्मला यांच्या घरी जाऊन चौकशी केली. त्यावेळी निर्मला यांनी त्यांचे नाव निर्मला यादव असल्याचे सांगितले. त्यावेळी निर्मला यांना त्यांनी कुलकर्णी असे खोटे नाव का सांगितले,  आमच्या घरी केवळा ब्राह्मण समाजातील सुवासिनी बाईने केलेलाच स्वयंपाक चालतो अशी विचारणा केली. यावरून निर्मला यांनी दमदाटी आणि शिवीगाळही केल्याची फिर्याद डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे.

 या प्रकाराची नेमकी तक्रार कशी दाखल करुन घ्यावी असा प्रश्न पोलिसांना पडला होता. तक्रार करू नये यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडून तसेच समाजातील मान्यवरांकडून डॉ. खोले यांची समजूत घातली जात होती. मात्र, फिर्याद दाखल करून घेण्यावर त्या ठाम राहिल्या. त्यामुळे पोलिसांना भारतीय दंडविधान संहिता कलम ४१९ (फसवणूक), कलम ३५२ (हल्ला करणे) आणि कलम ५०४ (धमकी) अन्वये गुन्हा दाखल करून घ्यावा लागला.

खोले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल

जात लपवून स्वयंपाकाचे काम मिळवल्याप्रकरणी वयस्कर महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेल्या डॉ. मेधा खोले यांच्याविरुद्धही याप्रकरणी संबंधित महिलेने मारहाणीचा तसेच धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. निर्मला दत्तात्रय यादव (वय 80, रा. समर्थ अपार्टमेंट, रायकर मळा, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे.

यादव या खोले यांच्याकडे स्वयंपाकाचे काम करीत होत्या. या कामाचे पैसे त्यांनी दिले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. खोले यांनी गुरुवारी त्यांच्या घरी जाऊन तुम्ही मला निर्मला दत्तात्रय कुलकर्णी असल्याचे खोटे का सांगितले असे विचारले. तेव्हा यादव यांनी माझे खरे नावच मी तुम्हाला सांगितले होते असे सांगत असतानाच खोले यांनी शिवीगाळ करीत हाताने मारहाण करायला सुरुवात केली. तसेच बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी मारहाणीचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
----------
खोले यांच्याकडे मला जोशी नावाच्या गुरुजींनी काम मिळवून दिले होते. मी त्यांना कधीही आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले नाही. जोशी यांनीच खोलेंना त्यांना तसे खोटे सांगितले असावे. मला खोलेंनी कधी जात विचारली नाही आणि मी ही कधी सांगितली नाही. जोशी आणि माझ्यामध्ये वाद झाल्याने त्याने जाऊन खोलेंना मी ब्राह्मण नसून मराठा असल्याचे सांगितले. त्यानंतर वादाला सुरुवात झाली आहे. खोले यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल मी पोलिसात तक्रार दिली आहे. 
- निर्मला दत्तात्रय यादव

Web Title: Crime against a cook for 'Sawale breaks', shocking type of progressive Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.