संवादाचे तुटलेले पूल जोडा, तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:50 AM2018-06-15T03:50:35+5:302018-06-15T03:50:35+5:30

‘काहीतरी चुकतंय हे मला कळतंय, पण नेमके काय बिनसले आहे, हे कळायला मार्ग नाही. चांगली नोकरी आहे, प्रेमळ कुटुंब आहे, पैसा-प्रतिष्ठाही आहे; पण तरीही मनात एकटेपणाची भावना ठाण मांडून बसली आहे. कोणीच समजून घेत नाहीये मला, जगणं नकोसं वाटायला लागलंय.

Connect the broken bridge of communication, expert advice | संवादाचे तुटलेले पूल जोडा, तज्ज्ञांचा सल्ला

संवादाचे तुटलेले पूल जोडा, तज्ज्ञांचा सल्ला

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : ‘काहीतरी चुकतंय हे मला कळतंय, पण नेमके काय बिनसले आहे, हे कळायला मार्ग नाही. चांगली नोकरी आहे, प्रेमळ कुटुंब आहे, पैसा-प्रतिष्ठाही आहे; पण तरीही मनात एकटेपणाची भावना ठाण मांडून बसली आहे. कोणीच समजून घेत नाहीये मला, जगणं नकोसं वाटायला लागलंय. एक-दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केलाही...’, एक मैत्रीण अगतिकेने सांगत होती. आयुष्यातील वाढती स्पर्धा, स्वत:कडून आणि इतरांकडून वाढलेल्या अपेक्षा, दुरावलेला माणसे, संवादाचे तुटलेले पूल अशी बरीच कारणं असतील. परंतु, ताणतणाव, नैराश्य आणि त्यातून मनात येणारे आत्महत्येचे विचार यातून समाजाची भयंकर परिस्थितीकडे वाटचाल होत आहे आणि हे वेळीच थांबायला हवं, अशी आर्त साद जाणकारांकडून घातली जात आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये नैराश्यग्रस्त रुग्णांची संख्या २०-२५ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांकडून नोंदवले जात आहे.
आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल, मूलभूत गरजा पूर्ण होत नसतील, उदरनिर्वाहातील अडथळे, अशा अनेक कारणांमधून नैराश्य आल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. परंतु, आताच्या परिस्थितीत नैराश्याने सर्वच स्तरांतील व्यक्तींना ग्रासले आहे.
हिमांशू रॉय, भय्यूजीमहाराज यांच्यासारख्या सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तींनी अवलंबलेल्या आत्महत्येचा मार्गाने सर्वांनाच हादरवून टाकले आहे.
आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी आत्यंतिक असहायता किंवा हतबलतेची भावना मनात घर करते, या समस्येतून मार्गच निघणे शक्य नाही, समाजात माझी प्रतिमा मलीन होईल, अशा विचारांतून टोकाचे पाऊल उचलले जाते.
वाढत्या स्पर्धेच्या युगात स्वत:च्या क्षमता, मर्यादा ओळखणे, प्राधान्यक्रम ठरवणे, आयुष्याचा वाढलेला वेग नियंत्रित करणे, स्वत:शी संवाद असे सकारात्मक मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
समुपदेशक दीपा निलेगावकर म्हणाल्या, ‘आताच्या वाढलेल्या गरजा पूर्ण करताना मनावर, शरीरावर नाहक ताण येतो. त्यातून मनात नकारात्मक भावना उत्पन्न होतात. ताण केवळ ठरावीक स्तरांतील व्यक्तींनाच येतो, असे म्हणता येणार नाही.
लोकांच्या मनात माझ्याविषयी सकारात्मक विचारांचा, इतरांचे ताण समजून घेणारा, समस्या सोडवणारा अशी प्रतिमा असेल आणि मलाच एखाद्या समस्येने ग्रासले असेल, तर ते स्वीकारण्यास त्या व्यक्तीला कमीपणा वाटू शकतो.
मी कायम जिंकलेच पाहिजे, असा काहींचा दृष्टिकोन असतो. अशा वेळी, अपयश स्वीकारणे शक्य होत नाही. त्यातून आजारपण, आत्महत्येचे विचार अशा समस्या उदभवू शकतात. जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळे करणे, आपल्या भावनांचा दुरुपयोग केला जाणार नाही अशी खात्री असणे गरजेचे असते. जवळच्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे शक्य नसेल तर समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणे केव्हाही फायदेशीर ठरते.’
समुपदेशकांकडून सुरुवातीला त्या व्यक्तीच्या समस्या जाणून घेणे, ती व्यक्ती जाणून घेणे, समस्यांचा सर्व कंगोऱ्यांतून विचार करणे, त्या व्यक्तीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीबाबत गुप्तता पाळली जाईल याची खात्री करून देणे अशा विविध टप्प्यांमधून नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.
समुपदेशनाची पद्धत, उपचारपद्धती व्यक्तिपरत्वे बदलते. गरज भासल्यास मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्लाही दिला जातो. आयुष्यातील ताण नियंत्रित करता यावेत, जीवनशैलीत समतोल साधता यावा, यासाठी शाळा, महाविद्यालये, नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव व्यवस्थापनच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. मानसिक आरोग्य कसे संतुलित राखावे, यादृष्टीने प्रशिक्षण दिले जाते, असेही निलेगावकर यांनी सांगितले.

ध्येय, आकांक्षा वाढल्यामुळे आयुष्यातील तणाव वाढला आहे. त्यातून आत्महत्येचे विचार मनात डोकावतात. हे टाळण्यासाठी आपल्या मर्यादा ओळखणे आवश्यक असते. जवळच्या व्यक्तीकडून अथवा पालकांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा, नात्यांमधील तणाव, वाढती स्पर्धा यामुळेही कमालीचे नैराश्य येते. ३० ते ५० वर्षे वयोगटातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात निराशेच्या गर्तेत अडकतात. स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त पाहायला मिळते. स्त्रियांप्रमाणे पुरुषांना भावना व्यक्त करता येत नसल्याने वागण्यात चिडचिडेपणा येणे, कामात लक्ष न लागणे, व्यसनाधीनता, प्रगती खुंटणे अशी लक्षणे दिसू लागतात. सोशल मीडियामुळेही आयुष्यातील निराशा वाढीस लागली आहे. जवळच्या व्यक्तींमधील संवाद खुंटला आहे. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवणे, समुपदेशन आणि मानसोपचार असा दुहेरी उपाय केल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.
- डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

नैराश्याची कारणे :
वाढत्या गरजा आणि स्पर्धा, स्वत:कडून आणि इतरांकडून वाढलेल्या अपेक्षा, सोशल मीडियाच्या आहारी जाणे, खुंटलेला संवाद, प्रगतीसाठी होणारा आटापिटा, व्यक्त न होण्याची मानसिकता, अपयश पचवता न येणे, समाजातील प्रतिष्ठा कायम राखण्याचा आटापिटा.

उपाय काय?
स्वत:च्या क्षमता, मर्यादा ओळखणे
आयुष्यातील प्राधान्यक्रम ठरवणे
कुटुंबीयांशी, जवळच्या व्यक्तींशी
मोकळा संवाद
छंद जोपासणे, निसर्गरम्य वातावरणात सहली.
समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला.
सोशल मीडियाचा मर्यादित वापर

आत्महत्या ही अंत्यत चिंतेची बाब असून, लोकांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला नैराश्यमुक्ती दिन प्रत्येक महिन्याला साजरा केला पाहिजे. कमी गुण मिळाले, योग्य शाळेत प्रवेश मिळाला नाही, पालक रागावले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात. शेतकरी कर्जबारीपणा तर अधिकारी कामाचा ताण तसेच आजारपणा, कौटुंबिक वादामुळे आत्महत्या करतात. हिमांशू राय आणि भय्यूमहाराज देशमुख यांची झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या कामामधून वेळ काढून कला, क्रीडा, ट्रेकिंग, व्यायाम, सहली यासारखे छंद जोपासून स्वत:बरोबरच दुसºयालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वत:ला सामाजिक कामात व्यस्त करून, त्रास होणारा विचार काढून सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. शासनाने डॉक्टरांप्रमाणेच शिक्षण, सामाजिक, औद्योगिक ठिकाणी समुपदेशकांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. - रघुनाथ येमूल गुरुजी, कार्याध्यक्ष, गुरू गोरक्षनाथ सेवा समिती

Web Title: Connect the broken bridge of communication, expert advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.