मंडळांचे व्यवस्थापन : रात्री ढोल-ताशे, सकाळी डीजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:23 AM2018-09-25T02:23:43+5:302018-09-25T02:24:03+5:30

रात्री १२ नंतर ढोल-ताशा व सकाळी ६ वाजल्यानंतर डीजे, असे व्यवस्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचा मान राखला व कार्यकर्त्यांच्या हौसेचीही जाण ठेवली.

 Circle management: night droplet, dawn in the morning | मंडळांचे व्यवस्थापन : रात्री ढोल-ताशे, सकाळी डीजे

मंडळांचे व्यवस्थापन : रात्री ढोल-ताशे, सकाळी डीजे

Next

पुणे  - रात्री १२ नंतर ढोल-ताशा व सकाळी ६ वाजल्यानंतर डीजे, असे व्यवस्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचा मान राखला व कार्यकर्त्यांच्या हौसेचीही जाण ठेवली. काही मंडळांनी मलखांबांची प्रात्यक्षिके व कसरतींचे मानवी मनोरे उभे करून भाविकांचे मनोरंजन केले.
ध्वनिक्षेपकांवर मनाई असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीची सगळी मदार ढोल-ताशांच्या खेळावर अवलंबून आहे. त्यामुळेच बहुसंख्य गणेश मंडळांसमोर ढोल-ताशा वाजवणारी युवकांची पथके होती. ‘शिवयोद्धा’, ‘रणधुरंधर’, ‘वज्र’, ‘संग्राम’, ‘अजिंक्य’ अशी युद्धघोषणाप्रचूर नावे असलेल्या पथकांनी तशाच प्रकारचे वाद्यवादन करून भाविकांचे मनोरंजन केले. ढोल-ताशांच्या तालांवर पथकांच्या पुढे नाचवले जाणारे भगवे ध्वज अत्यंत दिमाखदार दिसत होते.
रात्री बरोबर १२ वाजता सर्वच मंडळांचे ध्वनिक्षेपक बंद झाले. त्यानंतर फक्त ढोल-ताशांचेच वादन सुरू होते. प्रत्येक मंडळासमोर ढोल-ताशांचे पथक होते. लोकमान्य टिळक चौकातील महापालिकेच्या स्वागतकक्षासमोर आले की, त्यांचा १० ते १५ मिनिटांचा खेळ होत होता. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष; तसेच ढोलपथकांचे प्रमुख यांचा श्रीफळ देऊन सत्कार होत होता. महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे आदी पदाधिकारी या वेळी मंडपात उपस्थित होते.
या वेळी बऱ्याच वर्षांनी अखिल मंडई मंडळाचा शारदा गणेश व श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या पथकांचे एकापाठोपाठ एक याप्रमाणे टिळक चौकात मध्यरात्री अडीचच्या सुमारासच आगमन झाले. दोन्ही गणपतींच्या दर्शनासाठी टिळक चौकात येणाºया चारही रस्त्यांवर गर्दी ओसंडून वाहत होती. मंडई तसेच दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती महापौर मुक्ता टिळक तसेच अन्य पदाधिकाºयांच्या हस्ते करण्यात आली. दगडूशेठ हलवाईच्या रथांचे सारथ्यही महापौरांनी काहीवेळ केले. पथकांचे वादन संपल्यानंतर रात्री ३ वाजता व मंडईचा शारदा गणेश शौर्यरथातून मार्गस्थ झाला, त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीचे विद्युत रोषणाईच्या रथातून आगमन झाले. त्याचीही आरती झाल्यानंतर तो विसर्जनासाठी मार्गस्थ झाला.
महत्त्वाचे हे दोन्ही गणपती गेल्यानंतर लगेचच भाविकांची गर्दी कमी होऊ लागली. चारही बाजंूचे रस्ते मोकळे होऊ लागले. फक्त कार्यकर्त्यांची गर्दी शिल्लक राहिली. त्यानंतरही बराच वेळ गणपतींसमोर ढोल-ताशांचे पथकच वाजत होते. सकाळी सहापर्यंत फक्त ढोलांचाच आवाज घुमत होता.
सहा वाजून गेल्यानंतर केळकर रस्त्याच्या बाजूने एका मंडळाचा गणपती पुढे आला तो डीजेचा दणदणाट बरोबर घेऊनच. एलईडी लाईट इफेक्टही त्यावर होते. गाण्यांच्या तालावर तिथे तरुणाई नाच करू लागली. त्यानंतरच्या बहुतेक गणपती मंडळांनी ध्वनिक्षेपक सुरू केले व त्या आवाजातच सहा वाजल्यानंतर म्हणजे, पूर्ण उजाडल्यानंतरही मिरवणूक सुरूच राहिली. दगडूशेठ हलवाई गणपतीचे आगमन झाल्यानंतर स्वागतकक्षातील निवेदकाने भाविकांना त्यांच्या हातातील मोबाईल उंच धरून, त्याचा फ्लॅश लाईट लावून गणपतीचे स्वागत करण्याचे आवाहन केले. उंचावलेल्या हातांमधील लखलखत्या मोबाईलचे ते दृश्य फारच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने मागील वर्षी महापालिकेचा मान स्वीकारला नव्हता. यंदा मात्र त्यांच्या अध्यक्षांनी व पथकांच्या प्रमुखांनीही महापौरांच्या हस्ते श्रीफळ तर स्वीकारलेच, शिवाय महापौरांच्याच हस्ते श्रींची आरतीही केली.
गुलाल हा एकेकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीचा अविभाज्य भाग होता. ते प्रमाण यंदा जवळपास नव्हतेच. त्याऐवजी विद्युत तोफेतून रंगीबेरंगी कागदांचे कपटे एकाचवेळी हवेत उडवण्याचा प्रकार होता. हवेत उडालेल्या या कपट्यांवर रंगीत प्रकाश झोत टाकले जात होते.
महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट रात्री उशिरापर्यंत मंडपात बसून मंडळांचे स्वागत करत होते. बापट काही वेळाने निघून गेले. महापौरही मंडई व दगडूशेठ हलवाई गणपती
मार्गस्थ झाल्यानंतर निघून गेल्या. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, सुशील मेंगडे, प्रवीण चोरबेले, गोपळ चिंतल यांनी नंतर
मंडळाच्या स्वागताची जबाबदारी पार पाडली.
स्वागतकक्षातही नगरसेवकांचे, पदाधिकाºयांचे नातेवाईक यांची मोठीच गर्दी झाली होती. त्यात महिला व लहान मुलांचे प्रमाण जास्त होते. त्या सर्वांना तासा दर तासांनी चहा देण्यात येत होता. महापालिकेचे स्वतंत्र कर्मचारी त्यासाठी नियुक्त करण्यात
आले होते.
स्वागतकक्षासमोर महापौर तसेच अन्य पदाधिकाºयांसमोर आपली कला सादर करण्याचा ढोल पथकांचा आग्रह होता. त्यामुळे मिरवणूक बरीच रेंगाळली. भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोरच्या पथकाने बराच वेळ घेतला. निवेदकाने वारंवार आग्रह करून पथके कक्षासमोरून लवकर हलत नव्हती. त्यामुळे रांगेतील मागचे गणपती रेंगाळत होते.
टिळक रस्त्याने आलेले गणपती नवी पेठ मार्गे तिथूनच मागे फिरवले जात होते. कुमठेकर रस्त्याने आलेल्या छत्रपती राजाराम तसेच अन्य बºयाच मंडळांनी पुलावर न जाता चौकातूनच टिळक रस्त्याने जाणे पसंत केले.
पोलिसांचा बराच मोठा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर होता. मात्र, कोणीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना लवकर पुढे चला वगैरे सांगत नव्हते.
मंडई गणपती व दगडूशेठ हलवाई गणपतींचे यंदा टिळक चौकात यापूर्वीच्या वेळेच्या सुमारे दीडतास आधीच आगमन झाले
ढोल-ताशा वादनाला बरीच मर्यादा येत असल्यामुळे अनेक पथकांनी त्यात नावीन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही पथकांनी मानवी मनोरे उभे करून त्यावरून भगवा ध्वज फडकावला. काहींनी या मानवी मनोºयात संतदर्शन घडवले व श्री विठ्ठलाची प्रचिती दिली, तर काही मंडळांंनी मानवी मनोºयावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावून त्यावर पुष्पवर्षाव घडवला.

लक्ष्मी रस्त्यावरील
मिरवणुकीस उशीर


पुणे : ध्वनिक्षेपकांच्या भिंती लावण्यास न्यायालयाने घातलेली बंदी धुडकाविणारे कार्यकर्ते.. पोलिसांकडून ध्वनिक्षेपक प्रणाली बंद करण्यासाठी करण्यात येणारी कारवाई...पथकांचा दणदणाट.. ध्वनिक्षेपकावरून सार्वजनिक गणेश मंडळांकडून सत्ताधारी पक्षाचा करण्यात येणारा निषेध...अशा घटनांत गुदमरलेली यंदाची लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणूक दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी संपली. गेल्या वर्षीपेक्षा ४९ मिनिटांनी या रस्त्यावरील मिरवणूक संपण्यास उशीर झाला.
मध्यरात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत ध्वनिक्षेपके बंद करण्यात पोलिसांना यश आले. अनेक मंडळांनी सकाळी सहा वाजता ध्वनिक्षेपक पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी मंडळांना ध्वनिक्षेपके लावण्यापासून परावृत्त केले. काही मंडळांच्या कार्यकर्त्यांचे पोलिसांशी वादावीदीचे प्रसंग देखील घडले. पोलीस मोबाईलवर या मंडळांचे फोटो काढत होते. मात्र, पथकांच्या वादनाला आडकाठी नसल्याने सकाळी विसर्जन रस्त्यांवर पथकांचाच दणदणाट जास्त होता. यंदा ध्वनिक्षेपके सकाळी वाजवूच दिली नाहीत. त्यामुळे विसर्जन मिरवणूक विक्रमी वेळेत संपविण्याची संधी होती; मात्र विशेषत: लक्ष्मी रस्त्यावरील दोन मंडळांतील अंतर कमी करण्यात अपयश आले. गेल्यावर्षी लोकमान्य टिळक चौकातून (अलका टॉकीज) ११ वाजून ३६ मिनिटांनी शेवटचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. यंदा मात्र या रस्त्यावरील शेवटचे कासेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळ १२ वाजून २५ मिनिटांनी टिळक चौकातून विसर्जनासाठी
मार्गस्थ झाले.

Web Title:  Circle management: night droplet, dawn in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.