बीएसएनएलची सेवा बंद; बँकेचे व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 02:34 AM2019-03-15T02:34:33+5:302019-03-15T02:34:40+5:30

आदिवासी बांधवांची उपेक्षा; बँकेतील हक्काचे पैसेही नागरिकांना काढता येत नाहीत

BSNL service closed; The bank's jamming behavior | बीएसएनएलची सेवा बंद; बँकेचे व्यवहार ठप्प

बीएसएनएलची सेवा बंद; बँकेचे व्यवहार ठप्प

Next

तळेघर : आयटी हब म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या पुणे शहरापासून साधारण शंभर-सव्वाशे किमीवर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातीलच तळेघरचा (आंबेगाव) विकास मात्र केवळ मोबाईलची रेंज आणि टेलिफोन लाईन व्यवस्थित नाही म्हणून झालाच नाही. केवळ बीएसएनएलचीच मोबाईल सेवेच्या टप्प्यात असणारे तळेघरमधील नागरिक बीएसएनएलच्या ढिसाळ कारभारामुळे कायम नॉट रिचेबल असतात. मात्र, गेल्या एक महिन्यापासून तर दूरध्वनी सेवा विस्कळीत झाल्यामुळे आता बँकेचा कारभारही ठप्प झाला असून, आॅनलाइन बँकिंगचा टेंभा मिरविणाऱ्या बँकांना तळेघरमध्ये आॅफलाइन कारभार करणेही शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या खात्यावरील हक्काचे पैसेही काढता येत नाही.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, डिंभा, शिनोली, अडिवरे, ही गावे शैक्षणिक, राजकीय, व्यापार, उद्योग, बँक या दृष्टीने केंद्र बिंदू बनले आहे. या गावांचा आदिवासी भागातिल ५० ते ६० गावांशी संपर्क जोडला आहे. काही वर्षापूर्वी या आदिवासी भागामध्ये आदिवासी जनतेचा संपर्क इतरत्र व्हावा यासाठी या गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचा मनोरे उभारण्यात आले. यामुळे या भागातील आदिवासी जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला. एकमेव मोबाईल सेवा असल्यामुळे बीएसएनएल कंपनीचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. त्याच प्रमाणे भीमाशंकर पाटण आहुपे खोºयातील आदिवासी जनतेचा आर्थिक प्रश्न कायमचा मिटावा या साठी तळेघर अडिवरे डिंभा येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा काढण्यात आल्या या नंतर या बँका बीएसएनएल कंपनीच्या मनोºयाशी आॅनलाइन जोडण्यात आल्या. त्यामुळे बँकाचे व्यवहार आॅनलाइन झाले. मात्र आत बहुतांशवेळा गावात रेंज नसल्यामुले बँकेचे अधिकारी बँकेचे व्यवहारही बंद ठेवतात. गावात जिल्हा मध्यवर्ती बँक एकच असल्यामुळे मोठ्या बँकेचे व्यवहार करण्यासाठी, पैसे काढण्या व भ रण्यासाठी सुमारे साठ ते सत्तर किमी अंतरावरून पायी चालत आलेल्या लोकांना काम न करताच परतावे लागते.
बीएसएनएल कंपनीच्या या ढिसाळ कारभारात लवकरात लवकर सुधारणा व्हावी अन्यथा घोडेगाव येथील तहसिल कार्यालय व मंचर येथील बीएसएनएल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक देवराम कोकाटे मारुती केंगले तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले माजी सरपंच सखाराम मोहंडुळे तुळशिराम इष्टे आदिवासी सोसायटीचे सचिव तुकाराम मोरमारे राजपुरचे पोलिस पाटील उत्तम वाघमारे शंकर मोहंडुळे मारुती इष्टे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

किरकोळ कारणांमुळे बीएसएनएलची रेंज होते खंडित
केबल तुटणे, लाईट नसणे, मनोरा नादुरुस्त होणे तर कधी किरकोळ बिघाड, यामुळे दूरध्वनी सेवा विस्कळीत होणे अशा समस्या निर्माण होतात. परंतु बीएसएनएल कंपनीचे अधिकारी याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कधीतर चक्क डिझेल नाही त्यामुळे इंजिन बंद आहे, तर कधी लाईटची समस्या. अशा किरकोळ कारणांमुळे बीएसएनएलची रेंज खंडित होते. त्यामुळे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

टॉवर चालू राहण्यासाठी विजेची आवश्यकता आहे. मात्र वीजबिल भरले नसल्याने टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे वीजबिलासाठी वरिष्ठ कार्यालयातून निधी आल्यानंंतर वीजपुरवठा चालू होईल व सेवा पूर्ववत होईल.
वरिष्ठ अधिकारी, बीएसएनएल

Web Title: BSNL service closed; The bank's jamming behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.