पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ज्या तालुक्यात सर्वच्या सर्व जागा पक्षाचे उमेदवार निवडून येतील, त्यांनाचा अध्यक्षपद व उपाध्यक्षपद देण्यात येईल, असे जाहीर आश्वासन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांना येथे दिली. दरम्यान, इच्छुकांची प्रचंड संख्या लक्षात घेता निवडणुकीत ऐकमेकांचे पाय न ओढल्यास राष्ट्रवादी पक्षाचा अन्य कोणी पराभव करू शकत नाही, असेदेखील पवार यांनी येथे स्पष्ट केले.
जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम दोन दिवसांपासून मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयत सुरू आहे. या वेळी शिरूर, बारामती, जुन्नर, खेड, हवेलीसारख्या मोठ्या तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात आहे. एका जागेसाठी एकच उमेदवार द्यावा लागेल, त्यामुळे अन्य इच्छुक उमेदवारांनी नाराज न होता पक्ष देईल, त्या उमेदवाराचे सर्वांनी एक निष्ठेने काम केल्यास राष्ट्रवादीचा पराभव होणे कठीण आहे. यामुळे या निवडणुकीत ज्या तालुक्यात पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील व सर्वाधिक जागा आणणाऱ्यांनाच अध्यक्षपद, उपाध्यक्षपद व अन्य पदाधिकारीपदे दिली जातील, असे पवार यांनी स्पष्ट केले.

निलंबित केलेल्याचा अर्ज कसा स्वीकारला
शिरुर तालुक्यातील शिक्रापूर-सणसवाडी येथील ओबीसी महिला राखीव
गटातून जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा मंगलदास बांदल यांनी इच्छुक म्हणून राष्ट्रवादी काँगे्रसकडे अर्ज केला. या तालुक्याच्या मुलाखती सुरू
झाल्यानंतर रेखा बांदल यांचे नाव पुकारण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश घुले व आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षातून जाहीरपणे हकालपट्टी करण्यात आलेल्या लोकांचा अर्ज तरी
कसे स्वीकारला, असा सवाल उपस्थित केला. यामुळे काही काळ व्यासपीठावर शांतता पसरली.

पुरंदरमध्ये आघाडीबाबत लवकरच निर्णय
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संपूर्ण जिल्ह्यात काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी होणे सध्या तरी कठीणच आहे. परंतु पुरंदर तालुक्यात आघाडीबाबत चर्चा करण्याबाबत निरोप आला आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ, असे अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.

ओबीसीच्या जागेवर त्याच प्रवर्गाला संधी
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सुमारे २७ टक्के जागा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी राखीव आहेत. या जागांवर अनेक बोगस कुणबी दाखले असलेल्या इच्छुकांनी उमेदवारीची
मागणी केली आहे. परंतु याबाबत अजित पवार यांनी सांगितले, की इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविताना आरक्षित जागांसाठी जात प्रमाणपत्रही घेण्यात आले आहे. यामध्ये ओबीसीच्या जागेवर अन्य कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यात मात्र खुल्या गटात अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवार द्यावे लागणार असल्याचे
त्यांनी येथे सांगितले.