कोट्यवधींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:35 AM2017-08-14T00:35:37+5:302017-08-14T00:36:12+5:30

जंगल व १२ विभाग यांना दुहेरी कुंपण घालण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा ‘सुरक्षेच्या’ नावाखाली केला जात आहे.

Billions of slabs | कोट्यवधींचा चुराडा

कोट्यवधींचा चुराडा

Next

दीपक जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ४०० एकराच्या बंदिस्त कॅम्पसमध्ये शेकडो सुरक्षारक्षक व सीसीटीव्हींची २४ तास नजर असताना पुन्हा कॅम्पसच्या अंतर्गत असलेले जंगल व १२ विभाग यांना दुहेरी कुंपण घालण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा ‘सुरक्षेच्या’ नावाखाली केला जात आहे. एकूण ५ किमी अंतराचे दुहेरी कुंपण बांधून त्यावर ६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
प्रचंड मोठे वृक्ष, झाडे, वेली यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कॅम्पस नटलेला आहे. मात्र विद्यापीठातील मन मोहून टाकणाºया निसर्गसौंदर्याने नटलेल्या कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी दगडी बांधकामांची कुंपणे उभी करून ती विद्रूप करण्याचा प्रकार सुरू आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला असलेले कुंपण वगळता इतर कुठेही कुंपणाची आवश्यकता भासलेली नव्हती. मात्र गेल्या २ ते ३ वर्षांत विद्यापीठातील विविध विभाग, पुतळ्यांचा परिसर यांना कुंपण घालण्याचा धडाकाच उघडण्यात आला. इतकेच नव्हे विद्यापीठातील जंगलाचा परिसर, मोठी विहीर यांनाही कुंपण घालण्यात येत आहे.
विद्यापीठामध्ये एक बांधकाम समिती आहे. विद्यापीठाच्या परिसरामध्ये कुठेही बांधकाम
करायचे असल्यास या समितीच्या मंजुरीने ते केले जाते. विद्यापीठामध्ये काही वर्षांपूर्वी एका सुरक्षारक्षकाचा खून झाला होता. त्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करून एकापाठोपाठ एक असे दुहेरी कुंपण बांधण्याचे निर्णय तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या कार्यकाळात घेतले गेले. त्यातील काही
कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे, तर काही कामांना नुकतीच सुरुवात झालेली आहे.
विद्यापीठात बांधण्यात येणाºया कुंपणांनी ऐतिहासिक वारसा
जपावा म्हणून ती जुन्या पद्धतीच्या कोरीव दगडी कामांमध्ये बांधली
जात आहेत. त्यामुळे त्या कुंपणासाठी नेहमीपेक्षा दुप्पट खर्च करावा
लागत आहे.
विद्यापीठ परिसराचे सौंदर्य अबाधित राहावे म्हणून हा
प्रचंड खर्च करण्यात येत आहे.
मात्र या कुंपणाच्या बंदिस्तीकरणामुळे विद्यापीठाचे मूळ रूप हरवत
चालले असल्याची भावना
आजी-माजी विद्यार्थी व प्राध्यापकांकडून व्यक्त करण्यात
येत आहे.
बांधकामाचे
व्हॅल्युएशन काढावे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हेरिटेज कम्पाऊंड वॉल बांधण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे. या संपूर्ण बांधकामाचा खर्च किती आहे, याचे व्हॅल्युएशन काढण्यात यावे. कोणताही मास्टर प्लॅन तयार केलेला नाही. या बांधकामांना पालिकेच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत.
- अतुल बागुल, माजी अधिसभा सदस्य
त्या-त्या वेळच्या गरजांनुसार निर्णय
सुरक्षतेचा प्रश्न, विभागांची मागणी व त्या त्या वेळच्या गरजांनुसार कुंपण बांधण्याचे निर्णय घेण्यात आले. सुरक्षारक्षकाच्या खुनानंतर झाडी असलेला परिसर बंदिस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही विभागांनी त्यांच्या इमारतीला कुंपण घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
- वासुदेव गाडे, माजी कुलगुरू
खर्चात मोठे वसतिगृहे राहिले असते उभे
विद्यापीठात शिकायला येणाºया प्रत्येक विद्यार्थ्याला वसतिगृहात राहण्याची मूलभूत सुविधा अजूनही पुरविता आलेली नाही. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील दुहेरी कुंपणावर खर्च करण्यात आलेल्या ६ कोटी रुपयांच्या रकमेमध्ये मोठे वसतिगृह बांधता येऊ शकले असते अशी भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: Billions of slabs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.