शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:01 PM2024-03-08T13:01:28+5:302024-03-08T13:02:20+5:30

तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात

Baramati is known all over the world because of Sharad Pawar; We should support them - Yugendra Pawar | शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

शरद पवारांमुळेच बारामतीची जगभरात ओळख; आपण त्यांना साथ द्यावी - युगेंद्र पवार

बारामती : नव्या पिढीला वाटते बारामती सुरुवातीपासूनच विकसित आहे. पण, अशी स्थिती नव्हती. शरद पवार यांनी कंपन्या आणल्या, एमआयडीसी आणली. रोजगाराची मोठी संधी निर्माण केली. त्यामुळे येणाऱ्या अडचणीच्या काळात आपण शरद पवार यांच्यासोबत उभे राहणे, त्यांना साथ देण्याची गरज आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे आणि उद्योजक युगेंद्र पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देण्याचे आवाहन केले.

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे गावभेेटीदरम्यान ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, शरद पवार यांच्यामुळेच बारामतीची जगभरात ओळख आहे. तुम्ही महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही जा, शरद पवार यांच्यामुळे लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघतात. त्यामुळे आता त्यांना साथ देण्याची हीच वेळ असल्याचे मत यावेळी युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, मी काही राजकारणी व्यक्ती नाही. सामाजिक कामात मी सक्रिय असतो. शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी या भागाच्या, गावच्या विकासासाठी खूप काही केले आहे. ५० ते ६० वर्षांपूर्वी शरद पवार सुरुवातीला निवडून आले तेव्हाची बारामती आठवा. तेव्हा हा भाग तसा दुष्काळी, जिरायत होता. माझे आजोबा अनंतराव पवार यांच्या गोठ्यात तेव्हा गीर गायी असायच्या. हळूहळू जर्सी गायी आल्या. शेतीत प्रगती झाली. पूर्वी फक्त कापूस येथे व्हायचा. शरद पवार यांनी येथे सुरुवातीला तलाव उभा करण्याचे काम केले, पाणी आणले. पुढे त्यांच्या दूरदृ्ष्टीतूनच या भागाचा कायापालट झाला. भविष्यातील शिक्षण कोणत्या दिशेने असेल, याचा अंदाज आल्यानंतर ५० वर्षांपूर्वी त्यांनी विद्या प्रतिष्ठान व त्या माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळा सुरू केल्या. शारदानगर महाविद्यालयाच्या माध्यमातून मुलींना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शेतकऱ्यांसाठी उभे केले. शिक्षण व कृषी क्षेत्रात २७व्या वर्षी काम सुरू करणारे शरद पवार हे व्हिजन असलेले नेते असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Baramati is known all over the world because of Sharad Pawar; We should support them - Yugendra Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.