तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे उद्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:04 AM2018-12-26T02:04:25+5:302018-12-26T02:05:06+5:30

तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे.

 Bamboo gardens in five acres on Taljai hill | तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे उद्यान

तळजाई टेकडीवर पाच एकरमध्ये बांबूचे उद्यान

Next

पुणे : तळजाई टेकडीवरील सुमारे पाच एकर जागेमध्ये लवकरच बांबूचे विशेष उद्यान उभारण्यात येणार आहे. बांबू वनस्पतीची बहुउपयोगिता पुढील पिढीला समजावी, हा उद्देश ठेवून हे उद्यान पुढील दोन वर्षांत बहरेल, असा विश्वास पुणे महापालिकेचे उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिला.
तळजाई टेकडी पुणे शहराला पर्यावरणदृष्ट्या वरदान ठरलेली आहे. वनविभागाच्या शेकडो एकर जागेमध्ये वनसंपदा टिकून असून ती वृद्धिंगत करण्यासाठी वनविभाग, महापालिका आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचे योगदान लाभले आहे. तसेच या टेकडीचा बराचसा भाग हा महापालिकेच्या ताब्यात असून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पर्यावरणप्रेमींच्या मदतीने तिचे जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आॅक्सिजन पार्क, स्मृतीवन अशा संकल्पना राबवून नवनवीन वृक्षराजींची त्यामध्ये भर घातली असून महापालिकेने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. नुकतेच येथील पठारावर क्रिकेट स्टेडियमसोबत ओपन जिम, जॉगिंग ट्रॅकचीही निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये लवकरच एका बांबू उद्यानाची भर पडणार आहे.
सध्या क्रिकेट स्टेडियम व परिसरातील झाडे जगविण्यासाठी आंबिल ओढ्यातील ग्रे वॉटर वापरण्यात येते. बांबू उद्यान विकसित करण्यासाठीही पाण्याची गरज भासणार आहे. सहकारनगर येथे कात्रज तलावातून निघालेला उच्छ्वास आहे. या उच्छ्वासाचे पाणी पंपिंग करून टेकडीवर पाण्याची टाकी बांधून तेथे घेण्यात येणार आहे.

दैनंदिन जीवनासाठी बहुउपयोगी
यासंदर्भात उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी सांगितले, की कै. स. दू. शिंदे स्टेडियमसमोरील पाच एकर जागेमध्ये हे बांबू उद्यान उभारण्यात येणार आहे. दैनंदिन जीवनातील वापराच्या दृष्टीने बांबू हे बहुउपयोगी आहे. याची माहिती आणि ज्ञान पुढील पिढीला व्हावी, हा यामागील उद्देश आहे.
जगभरात बांबूच्या सुमारे सतराशे प्रजाती आहेत. परंतु आपल्याकडील वातावरणात साधारण १०८ प्रजातींची लागवड होऊ शकते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात साधारण २२ प्रजातींची रोपे खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यानंतर या उद्यानामध्ये पॅगोडा, सीमाभिंतही बांबूचीच असेल. तसेच बांबूच्या विविध प्रजाती आणि उपयोगाची माहितीही देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा खर्च असून या कामासाठी दोन ते अडीच वर्षे लागतील.

Web Title:  Bamboo gardens in five acres on Taljai hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे