Alandi | आळंदीत भाविकांमध्ये संताप; पार्किंग दर ५० रुपये, मात्र आकारले जातायेत १०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 04:21 PM2023-04-03T16:21:48+5:302023-04-03T16:35:05+5:30

विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरी पैसे वसूल...

Anger among concerned devotees; Parking fee is Rs.50 but Rs.100 is charged | Alandi | आळंदीत भाविकांमध्ये संताप; पार्किंग दर ५० रुपये, मात्र आकारले जातायेत १०० रुपये

Alandi | आळंदीत भाविकांमध्ये संताप; पार्किंग दर ५० रुपये, मात्र आकारले जातायेत १०० रुपये

googlenewsNext

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र अलंकापुरीत पालिकेच्या तसेच खाजगी पार्किगवाल्यांकडून भाविकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुटमार केली जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही लुटमार अधिक प्रमाणात फोफावत चालली असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे. खाजगी जागा किंवा त्या जागेच्या शेजारील विनामालकी जागेत भाविकांनी पार्क केलेल्या वाहनांचेही अधिक दर लावून संबंधितांकडून बळजबरी पैसे वसूल केले जात असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे भाविकांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी  राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक अलंकापुरीत येत आहेत. मात्र अलंकापुरीत पार्किंग जागेच्या असलेल्या अभावामुळे भाविक मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंग करून मंदिराकडे मार्गस्थ होत असतात. तर पालिकेच्या पार्किंगच्या जागेची माहिती असलेले भाविक पालिका पार्किंगमध्ये वाहने पार्क करून दर्शनसाठी जातात. परिणामी दर्शनानंतर वाहनस्थळी पार्क जागेची पावती दाखवत खाजगी जागा असल्याचे सांगून भाविकांकडे अव्वाच्या - सव्वा पैश्यांची मागणी केली जात आहे. तर कायदेशीर पार्किंगवाले पालिकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा दुप्पट दराच्या रकमेची पावती भाविकांच्या हातात देत वसुली करत आहेत.

अलंकापुरी किंवा आसपासच्या भाविकांना अल्पदराची पावती दाखवून पार्किंगचे भाडे घेतले जाते. तर अनेकवेळा वाहनांचे पासिंग नंबर पाहून वेगळी पावती देऊन भाविकांकडून जादा रकमेची आर्थिक लुट केली जात असल्याची सत्यस्थिती समोर येऊ लागली आहे. आळंदीत वाहनानुसार ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत पार्क जागेचे भाडे आकारले जात आहे. दोन दिवसांपूर्वी एका वकील व्यक्तीला चाकण चौकाजवळील पार्किंगच्या जागेत दुप्पट पावती दिल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे वाहन दरावरून झालेला वादविवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आळंदीत पार्किंगचे भाडे देण्यास जर भाविकांनी नकार दिला तर संबंधित खाजगी व पालिका पार्किंगवाले   जबरदस्ती भांडून भाडे वसूल करत आहेत. अशा वाढत्या प्रकारांमुळे भाविक हैराण झाले असून भाविकांची आर्थिक लुटमार करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी भाविकांमधून जोर धरू लागली आहे.  

येथे अख्खे गाव लुटत आहे, व्हिडिओ व्हायरल-

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत वकील व्यक्तीने पार्किंगवाल्याला तुमचे नाव काय? तुम्ही कोण आहे ? पालिकेची ऑर्डर आहे का? देवाच्या ठिकाणी दरोडा पाडत आहात तुम्ही लोक? असे सुनावले. तर पार्किंगवाला उत्तर देताना म्हणाला, येथे अख्खे गाव लुटत आहे, नगरसेवकांनी ठराव करून दिलाय. पार्किंगला सोय नसून ७० लाखाला ठेका घेतला आहे.

पार्किंग व्यवस्थेसाठी वार्षिक ठेका बाह्य संस्थेस दिलेला आहे. परंतु त्यांनी नगरपरिषदे मार्फत निश्चित करून दिलेल्या दरानुसारच पार्किंग फी आकाराने गरजेचे आहे. अतिरिक्त दराने आकारणी होत असल्याच्या प्राप्त तक्रारीची चौकशी करण्याचे कार्यालयीन अधीक्षक यांना आदेश दिले असून त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद.

Web Title: Anger among concerned devotees; Parking fee is Rs.50 but Rs.100 is charged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.