पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे होणार निवारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:49 PM2018-12-06T12:49:58+5:302018-12-06T13:01:00+5:30

पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक पोलीस ठाण्यात प्रतिसाद मिळत नाही़.

All complaints will be resolved in Police Station | पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे होणार निवारण

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे होणार निवारण

Next
ठळक मुद्देसेवा कार्यप्रणाली : दररोज ३०० जण देतात भेटतक्रारीचे निवारण झाले की नाही यावर पोलीस आयुक्तालयातून भेट नियंत्रण ठेवण्यात येणार तक्रारीचे दर १५ दिवसांनी सेवा अ‍ॅप समिती बैठक

-विवेक भुसे- 

पुणे : आपली काही तक्रार असेल तर त्यासाठी आपण पोलीस ठाण्यात जातो, अनेकदा आपले योग्य ते समाधान होत नाही अथवा आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही़. पोलीस तक्रार घेत नाही अशी नेहमीच ओरड होते़ .परंतु, आता यापुढे असले होणार नाही़ कारण प्रत्येक पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद घेण्यात येत असून त्यांच्या तक्रारीचे निवारण झाले की नाही यावर पोलीस आयुक्तालयातून भेट नियंत्रण ठेवण्यात येणार आहे़. 
प्रगत व गतिमान महाराष्ट्राचे संकल्पनेस अनुसरुन मुख्यमंत्री कार्यालयाकडून विविध खात्यांना महत्वाचे विषयावर उद्दिष्टे ठरवून दिली होती़. त्यात पोलीस विभागासाठी व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिमची उद्दिष्टपूर्ती ठरवून देण्यात आली होती़. यामध्ये पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान झाले आहे का याची पाहणी केली जाते़. 
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या नागरिकांना स्थानिक पोलीस ठाण्यात प्रतिसाद मिळत नाही़. विशेषत: पोलीस चौकीमध्ये हे अनेकदा दिसून येते़. त्यामुळे पोलीस तक्रार घेत नाही अशी ओरड सातत्याने केली जाते़. त्यातून समाजात पोलिसांविषयी नकारात्मक भावना निर्माण होत असल्याने ही प्रतिमा बदलण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सेवा प्रणालीवर लक्ष केंद्रीत केले होते़. अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांच्या देखरेखीखाली सेवा प्रणाली सर्व पोलीस ठाण्यात राबविण्यात आली आहे़. जे पोलीस ठाण्यात येतात, त्यांची नोंद या सेवा प्रणालीमध्ये घेतली जाते़. 
त्यातील तक्रारीचे दर १५ दिवसांनी सेवा अ‍ॅप समिती बैठक होते़. अपर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, मुख्यालय उपायुक्त स्वप्ना गोरे, नियंत्रण कक्षाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे तसेच अभियानाचे पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी यांच्या बैठकीत या किती नागरिक असमाधानी आहेत, याचा तक्ता सादर केला जातो़. त्यानुसार ५ ते ११ नोव्हेंबरच्या बैठकीत १३ नागरिक असमाधानी असल्याचे दिसून आले़. त्यांच्याशी प्रत्यक्ष दूरध्वनी करुन विचारणा करण्यात आली़. त्यात सासºयाची सूनविरोधात तक्रार होती़. सासºयाचे म्हणणे की सून त्रास देण्याबाबत आत्महत्येची धमकी देते़ माझ्या पतीला बोलवा, मी ८ महिन्याचे मूल घेऊन एकटी राहते़ असे महिलेचे म्हणणे महिला पोलीस उपनिरीक्षकाकडून महिलेचे समुपदेशन होण्याची गरज असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना कळविले आहे़. त्याप्रमाणे तक्रारदारांना सांगून तेथील अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगण्यात आले़. 
एका नागरिकाची जीममधून सोन्याची अंगठी चोरीला गेल्याची तक्रार होती़. त्याचे म्हणणे ऐकून घेऊन पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याविषयी सांगितले व जीममध्ये जाऊन तपासणी करावी ती न मिळाल्यास प्रॉपर्टी मिसिंग दाखल करावी असे सांगण्यात आले़. मारहाण प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंद केला, आरोपींना अटक केली नाही, अशा तक्रारीही असतात़. त्यांना कायद्यातील तरतुदीची माहिती देऊन समाधान केले जाते़. 

.......................
असे चालते सेवा उपक्रमाचे काम
पुणे शहरातील सर्व ३० पोलीस ठाण्यांना प्रत्येकी एक टॅब देण्यात आला आहे़. या कामासाठी दोन महिला व दोन पुरुष कर्मचारी नेमण्यात आले आहेत़. त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़. पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात उपक्रमाचे नाव असलेला फलक लावला आहे़. या टॅबवर त्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचा फोटो काढला जातो़. त्याचे नाव, पत्ता व काय काम आहे, याची माहिती नोंदविली जाते़ त्याच्या कामाच्या स्वरुपानुसार त्या त्या अधिकाऱ्याकडे त्या नागरिकाला पाठविले जाते़. तसेच वाहतूक विभाग, सायबर किंवा आर्थिक गुन्हे शाखेबाबत तक्रार असेल तर त्या तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग केल्या जातात़. या शिवाय अन्य विभागाबाबतच्या तक्रारीही असतील तर त्याबाबत मार्गदर्शन केले जाते़ आवश्यक ती माहिती दिली जाते़. 
़़़़़़़़़़
तक्रारदारांशी संपर्क साधून 
पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या व्हिजिटरची माहिती पोलीस नियंण कक्षातील सेवा प्रकल्प विभागात येते़. या ठिकाणी आदल्या दिवशी ज्या नागरिकांनी पोलीस ठाण्याला भेट दिली आहे़. त्याची माहिती पाहून त्यांच्याशी प्रत्यक्ष मोबाईलद्वारे संपर्क साधला जातो़ त्यांच्या कामाचे नेमके काय झाले़ त्याचे तक्रार घेतली का?, त्याचे समाधान झाले का याची माहिती घेतली जाते व त्याप्रमाणे त्याची नोंद केली जाते़. पुणे शहरात दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे नागरिक पोलीस ठाण्यांना भेट देतात़. पोलीस आयुक्तालयातून त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला जातो़ त्यातील काही जण अनोळखी नंबर पाहून फोन उचलत नाही. काहींचा नंबर अनेकदा लावूनही लागत नाही अशा अडचणी सोडल्या तर दररोज असे १७० ते १८० जणांना संपर्क करण्यात येतो़. 
जर त्या नागरिकाचे समाधान झाले नसेल तर ते का झाले नाही़ याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकारी घेतात़. त्यांच्याकडे विचारणा केली जाते व त्यावर उपाय केले जातात़. 

Web Title: All complaints will be resolved in Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.